---Advertisement---

शिवसैनिकांनी जेव्हा खोदून टाकलेलं वानखेडेचं पिच; वाचा शिवसेनेचे क्रिकेटच्या मैदानावरही गाजलेले वाद

On: मंगळवार, जुलै 12, 2022 4:32 PM
Balasaheb-Thackrey-Wankhede-Stadium
---Advertisement---

राजकारण आणि क्रिकेट यांचा भारतामध्ये खूपच जवळचा संबंध आहे. भारतातील अनेक स्टेट असोसिएशनमध्ये राजकारण्यांचे वर्चस्व असलेले दिसून येते. त्याचप्रमाणे, शरद पवार यांनी बीसीसीआय सोबतच आयसीसीचे देखील अध्यक्षपद भूषवले. त्याचप्रकारे भारतातील क्रिकेटवर बारीक लक्ष ठेवून असणारा राजकीय पक्ष म्हणजे शिवसेना. शिवसेना सातत्याने चर्चेत असते. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे तर क्रिकेटचे सुपर फॅन. त्यांना क्रिकेट खेळायला आणि क्रिकेट पहायला आवडायचे. त्यांचे अनेक क्रिकेटर्सशी अत्यंत घरोब्याचे संबंध होते. असे असले तरी, याच शिवसेनेने क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा राडेही घातले आहेत. आज त्याच राड्यांचा मागोवा आपण घेऊयात…

१९९१ मध्ये बऱ्याच दिवसानंतर पाकिस्तान टीमने इंडियाचा दौरा करायचा निर्णय घेतला. पहिली टेस्ट व्हायची होती मुंबईत. पण शिवसेनेने भूमिका घेतली की, पाकिस्तानला मुंबईत खेळू देणार नाही. काही शिवसैनिकांनी सरळ वानखेडे स्टेडियमच पिच खोदून टाकलं. असाच प्रकार पुढे होऊ नये म्हणून दोन्ही बोर्डानी ती सिरिजच रद्द करायचा निर्णय घेतला.

अगदी अशाच प्रकारची ही दुसरी घटना ८ वर्षांनी घडली. नेमके त्यावेळी महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार होते. १९९९ च्या त्या टूरवेळी वानखेडे स्टेडियमवर मॅच होणार असल्याची कुणकुण शिवसेनेला लागली. त्यांनी आपली जुनीच भूमिका कायम ठेवली आणि कोणत्याही परिस्थितीत भारत-पाकिस्तान मॅच मुंबईत होऊच देणार नाही, असे ठणकावून सांगितले. हजारो शिवसैनिकांनी मुंबईस्थित बीसीसीआयच्या हेड ऑफिसवर मोर्चा काढला. काही शिवसैनिक त्यावेळी आतपर्यंत घुसले. तेव्हा चुकून काहींचा हात १९८३ वर्ल्डकप ट्रॉफीला लागल्याने त्या ट्रॉफीचे थोडेसे नुकसान झाले. अखेर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांनी सामंजस्याची भूमिका घेत, बीसीसीआयला ती मॅच इतरत्र खेळविण्यास सांगितले.

ती टेस्ट मुंबईवरून दिल्लीला शिफ्ट करण्याचा निर्णय झाला. मात्र, शिवसैनिकांच समाधान झालं नाही. ते थेट दिल्लीच्या फिरोझशाह कोटला स्टेडियमवर पोहोचले आणि तिथले‌ही पीच खराब केले. त्याच मॅचला शिवसेनेने स्टेडियममध्ये विषारी साप सोडण्यात येईल अशी धमकी दिली. या भीतीने बीसीसीआय आणि दिल्ली क्रिकेट असोसिएशनने तब्बल ४० सर्पमित्र स्टेडियममध्ये तैनात केलेले. विशेष म्हणजे ही तीच मॅच होती जिच्यात अनिल कुंबळेने एकाच इनिंगमध्ये पाकिस्तानचे दहा बॅटर आउट करून ‘परफेक्ट टेन’ मिळवलेला.

याच्या मधला एक लक्षात राहणारा किस्सा म्हणजे, २००४ ला भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी चक्क शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटर जावेद मियांदाद यांची भेट घडवून आणली. मुंबईतील ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी ही भेट झाली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी मियादाद यांचे योग्य आदरातिथ्य करत त्यांच्या खेळाचे कौतुक केलेले.

तसेच २००३ मध्ये भारत-पाकिस्तानच्या माजी क्रिकेटर्सची एक चॅरिटी मॅच आग्र्यात खेळायचं ठरलेलं. पण, तिथेही शिवसेनेने आक्षेप घेतला आणि ती मॅच होऊ शकली नाही. २००५ मध्ये जेव्हा पाकिस्तान टीम भारत दौऱ्यावर आली तेव्हातर, शिवसैनिकांनी पाकिस्तानला देशभरात कुठेही खेळू न देण्याची शपथच खाल्ली होती. तेव्हा दिल्ली वनडेत शिवसेनेची शाखा असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेने स्टेडियमबाहेर तीव्र निदर्शने केली.

शिवसेनेचे क्रिकेटच्या मैदानावर ही गाजलेले काही वाद | Shiv Sena | Cricket | Riots | Pakistan

जुलै २००६ मध्ये, मुंबईच्या लोकलमधील साखळी बॉंबस्फोटांच्या मालिकेत पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेचा हात असल्याने, शिवसेनेने पाकिस्तानला भारतात खेळवण्यास विरोध केला. नेमके त्याचवर्षी भारतात चॅम्पियन्स ट्रॉफी झाली तेव्हा मोहाली व जयपूर येथील पाकिस्तानच्या मॅचवेळी निदर्शने केली गेली. २००८ च्या २६/११ मुंबई हल्ल्यानंतर शिवसेनेने सर्वात आक्रमक भूमिका घेतली होती. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आयपीएलमध्ये कोणताही पाकिस्तानी क्रिकेटर खेळला नाही पाहिजे असे ठणकावून सांगितले. तेव्हापासून आजतागायत पाकिस्तानी क्रिकेटर्स आयपीएलमध्ये कधीही दिसले नाहीत. बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान आणि आयपीएलमध्ये कोलकाता टीमचा मालक असलेल्या शाहरुख खानने जेव्हा, पाकिस्तानी क्रिकेटर्सची पाठराखण केली, तेव्हादेखील शिवसेनेने त्याच्या माय नेम इज खान चित्रपटाचे अनेक शो बंद पाडले.

शिवसेनेने पाकिस्तान‌ विरोधाची ही भूमिका कधीही सोडली नाही. २०११ वर्ल्डकप फायनलला पाकिस्तान आली तर त्यांना आम्ही मुंबईत खेळू देणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला होता. मात्र टीम इंडियाने पाकिस्तानला सेमीफायनलमध्येच हरवल्याने ही नामुष्कीच आली नाही. शिवसेनेच्याच भीतीने बीसीसीआयने २०१२ मध्ये पाकिस्तान टीम भारताच्या टूरवर आली असताना, एकही मॅच महाराष्ट्रात खेळवली नाही. इतकच काय २०१५ ला भारत-पाकिस्तान सिरीज बाबतची मिटींगही शिवसैनिकांनी होऊ दिली नव्हती.

शिवसेनेने इतक्या वेळा विरोधाची भूमिका घेतली असली तरी, अगदी माधव मंत्रींपासून रोहित शर्मापर्यंत सगळ्यांना सर्वात जास्त प्रेमही शिवसेनेने दिले हे नाकारून चालणार नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला ‘मुनाफ पटेल’

वाढदिवस विशेष: परिपूर्णतेचा ध्यास घेतलेला शापित

मराठीत माहिती- क्रिकेटर मुनाफ पटेल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---