भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान शुक्रवारपासून (१२ मार्च) पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात झाली. हे सर्व सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येतील. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ बाद १२४ धावा उभारल्या. भारतासाठी श्रेयस अय्यरने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. यासह, अय्यरने या अर्धशतकासह एका खास आकडेवारीची नोंद आपल्या नावे केली.
श्रेयसने झळकावले अर्धशतक
पहिल्या टी२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची खराब सुरवात झाली. पाचव्या षटकात शिखर धवनच्या रूपाने भारताला २० या धावसंख्येवर तिसरा धक्का बसला. त्यानंतर, पाचव्या क्रमांकावर श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी उतरला. संघ अडचणीत असताना त्याने एक बाजू लावून धरली. अष्टपैलू हार्दिक पंड्यासोबत त्याने पाचव्या गड्यासाठी ५४ धावांची भागीदारी केली. अय्यरने भारतासाठी सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली.
अय्यरने केली रोहितची बरोबरी
या सामन्यातील अर्धशतकासह अय्यरने भारताचा सलामीवीर रोहित शर्माच्या एका खास कामगिरीची बरोबरी केली. आघाडीचे तिन्ही फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाल्यानंतर भारतासाठी टी२० क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकवणारा तो केवळ दुसरा फलंदाज ठरला. या सामन्यात केएल राहुल, शिखर धवन व विराट कोहली हे अनुक्रमे १,४ व ० धावांवर बाद झाले.
अशी कामगिरी भारतासाठी सर्वप्रथम रोहित शर्माने २०१० टी२० विश्र्वचषकात केली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ १८५ धावांचा पाठलाग करत होता. त्यावेळी, मुरली विजय ५, गौतम गंभीर ९ व सुरेश रैना ५ धावांवर बाद झाले होते. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या रोहितने नाबाद ७९ धावांची खेळी केली होती. भारताला ४९ धावांनी पराभव पत्करावा लागलेल्या या सामन्यात रोहित व्यतिरिक्त फक्त हरभजन सिंग दुहेरी धावा काढू शकला होता.
इंग्लंडने मिळवला विजय
शुक्रवारी पहिल्या टी२० सामन्यात इंग्लंडने ८ विकेट्सने विजय मिळवला. भारताने अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावप प्रथम फलंदाजी करत २० षटकात ७ बाद १२४ धावा केल्या होत्या आणि इंग्लंडला १२५ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान इंग्लंडने १५.३ षटकात २ बाद १३० धावा करत सहज पूर्ण केले आणि सामना जिंकला. याबरोबरच ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
दसहजारी मनसबदारांसाठी मार्च महिना आहे खास, जुळून आला ‘हा’ खास योगायोग
“हेल्मेट घालूनही तुम्ही शून्यावर बाद होऊ शकता, त्यामुळे…”, उत्तराखंड पोलिसांनी केले कोहलीला ट्रोल
भारताच्या ‘या’ खेळाडूने गाठला १०० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा पल्ला, बीसीसीआयने केले अभिनंदन