भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर हा गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. त्याला इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात खांद्याची दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला त्या मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. इतकेच नव्हे तर तो खांद्याच्या सर्जरीमुळे आयपीएल २०२१ हंगामालाही मुकला होता. क्रिकेटपासून इतके दिवस दूर असणाऱ्या श्रेयस अय्यरला भारतीय संघात पुनरागमन करण्याची ओढ लागली आहे. त्यामुळे तो आपल्या तंदुरुस्तीवर प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे.
श्रेयस जर पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर तो आगामी श्रीलंका दौऱ्यावर संघात स्थान मिळवू शकतो. कारण विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. जिथे त्यांना विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची मालिका खेळायची आहे. या संघात अय्यरला संधी मिळालेली नाही.
परंतु जुलै महिन्यातील श्रीलंका दौऱ्यावर श्रेयसची निवड केली जाऊ शकते. त्यातही त्याला या दौऱ्यावरील भारतीय संघाच्या नेतृत्तवपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्या अनुशंगाने श्रेयस घरी व्यायाम करताना दिसत आहे.
त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर घरामध्येच कसरत करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो वेगवेगळ्या प्रकारे व्यायाम करताना दिसत आहे. या व्हिडिओला त्याने ‘वर्क इन प्रोग्रेस’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओनंतर क्रिकेट चाहत्यांना त्याच्या पुनरागमनाची ओढ लागली आहे. अनेकांनी त्याला लवकर फिट होत पुनरागमन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
वनडे आणि टी२० मालिकेचे आयोजन
भारताच्या श्रीलंका दौर्यात सर्वप्रथम वनडे मालिका खेळवली जाणार आहे. १३ जुलै रोजी वनडे मालिकेतील पहिला सामना खेळवला जाईल. त्यानंतर १६ आणि १९ जुलै रोजी वनडे मालिकेचे उर्वरित दोन सामने खेळवले जातील.
येथे पाहा व्हिडिओ –
https://www.instagram.com/reel/COzzr53jXi3/?igshid=12qqttnpapxsy
वनडे मालिका संपल्यानंतर टी२० मालिकेची सुरुवात होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना २२ जुलै रोजी खेळवला जाईल. तर उर्वरित दोन सामने अनुक्रमे २४ आणि २७ जुलै रोजी खेळवले जातील. अशाप्रकारे तीन वनडे सामने आणि तीन टी२० सामने या दौऱ्यावर खेळवण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या श्रीलंका दौऱ्याचा वाढणार रोमांच, ३ नव्हे ‘इतक्या’ सामन्यांची होणार टी२० मालिका!
फक्त कोहली-आझम असे फलंदाज आहेत, ज्यांची फलंदाजी शैली सर्वजण फॉलो करतात; ‘आशियाई ब्रॅडमन’चे बोल