---Advertisement---

श्रेयस अय्यरच्या वडीलांनी गेल्या ४ वर्षांपासून बदलला नव्हता व्हॉट्सअप डीपी, ‘हे’ होतं मोठं कारण

---Advertisement---

कानपूर। गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ग्रीनपार्क स्टेडियमवर कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यातून भारताकडून २६ वर्षीय श्रेयस अय्यरने कसोटी पदार्पण केले आहे. याबद्दल त्याचे वडील संतोष अय्यर यांनी प्रतिक्रिया देताना आपल्या मुलाला कसोटी क्रिकेटसाठी कसे प्रेरित ठेवले हे सांगितले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केल्यानंतर श्रेयसला कसोटी पदार्पणासाठी जवळपास ४ वर्षे वाट पाहावी लागली. पण, त्याला त्याच्या प्रतिक्षेचे फळ मिळाले असून तो भारताकडून कसोटी पदार्पण करणारा ३०३ वा खेळाडू ठरला आहे. त्याच्या पदार्पणानंतर मिड-डेशी बोलताना त्याच्या वडीलांनी सांगितले केली त्यांनी २०१७ पासून श्रेयसला कसोटी क्रिकेटसाठी प्रेरित ठेवण्याच्या हेतूने व्हॉट्सअप डीपी बदलला नव्हता.

संतोष अय्यर म्हणाले, ‘कसोटी क्रिकेट खरे क्रिकेट आहे. मला नेहमी त्याने (श्रेयसने) कसोटी खेळावे, असे वाटायचे, ते स्वप्न आता पूर्ण झाले आहे. माझी पत्नी आणि मी आज खूप आनंदी आहोत.’ श्रेयसला दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकरांच्या हस्ते कसोटी पदार्पणाची कॅप देण्यात आली.

विशेष म्हणजे श्रेयसने कसोटी पदार्पण गाजवताना सामन्याच्या पहिल्याच दिवशी अर्धशतकाला गवसणी घातली. पहिल्या दिवसाखेर तो ७५ धावांवर माघारी परतला.

चार वर्षांपासून बदलला नाही व्हॉट्सअप डीपी
खरंतर २०१६-२०१७ दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत श्रेयसला भारतीय संघात संधी मिळाली होती. मात्र, त्याला अंतिम ११ जणांमध्ये संधी न मिळाल्याने त्याला कसोटी पदार्पण करता आले नव्हते. पण ती मालिका भारताने धरमशाला येथे २-१ अशा फरकाने जिंकली होती.

त्यावेळी त्या मालिकेची ट्रॉफी हातात घेतलेला श्रेयसचा फोटो त्याच्या वडीलांनी गेले ४ वर्षे त्यांच्या व्हॉट्सअप डिस्पेला (डीपी) ठेवला आहे. विशेष म्हणजे त्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात भारत  अ संघाकडून खेळताना श्रेयसने नाबाद २०२ धावांची खेळी केली होती.

संतोष अय्यर यांनी पुढे सांगितले की, ‘मी तेव्हापासून (२०१७) तोच डीपी ठेवला आहे. मी तो बदलला नाही, कारण मला त्याला (श्रेयसला) नेहमी आठवण करुन द्यायची होती, की कसोटी क्रिकेट खेळणे, हे त्याचे अंतिम ध्येय आहे. अखेर ही गोष्ट खरी होत आहे, त्याचा मला खूप आनंद आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘आम्हाला नेहमीच त्याने कसोटी क्रिकेट खेळावे असे वाटत होते. मी श्रेयसला कसोटी संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न कर, असे सांगत असे. तो मला नेहमी म्हणायचे असं नक्की होईल. आता त्याचे कसोटी पदार्पण झाले आहे. खरं सांगायचं, तर आम्हाला अपेक्षित नव्हतं की, तो न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण करेल. आम्हाला तो चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे. अनेक दिग्गज खेळाडू संघात नसताना त्याच्यासाठी ही मोठी संधी आहे.’

बहिणीने देखील व्यक्त केला आनंद
श्रेयस अय्यरने कसोटी पदार्पण केल्यानंतर त्याची धाकटी बहिण श्रेष्ठा हिने देखील आनंद व्यक्त केला. तिने गावसकर श्रेयसला कसोटी पदार्पणाची कॅप प्रदान करतानाचा फोटो इंस्टाग्राम स्टोरीला ठेवला असून त्यावर ‘माय हार्ट’, असं कॅप्शन दिले आहे.

Screengrab: Instagram/Shresta Iyer

श्रेयस अय्यरची प्रथम श्रेणी कारकीर्द
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करत असेलल्या श्रेयसची आत्तापर्यंतची प्रथम श्रेणी कारकीर्द चांगली राहिली आहे. त्याने ५४ प्रथम श्रेणी सामने खेळताना ५२.१८ च्या सरासरीने ४५९२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या १२ शतकांचा आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘या’ प्रकरणी वॉनविरुद्ध बीबीसीची कठोर कारवाई, पण इंग्लंडच्या माजी कर्णधाराने आरोपांना म्हटले निराधार

दुखापतींचा शनी पाठ सोडेना! विजय हजारे ट्रॉफीपूर्वी विजेत्या तमिळनाडूला मोठा धक्का, नटराजन स्पर्धेबाहेर

बीबीएलची ‘प्लेयर ऑफ द ईयर’ राहिलेल्या हरमनप्रीतला आहे विश्वास, लवकरच सुरू होईल महिलांची आयपीएल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---