---Advertisement---

“शेवटी आई-वडील हे..” ब्रिस्बेन कसोटीतील गिलचे शतक हुकल्याने वडील नाराज, विरूने दिली प्रतिक्रिया

On: गुरूवार, जानेवारी 21, 2021 9:27 AM
---Advertisement---

नुकताच भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा संपला आहे. ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर दोन्ही संघात झालेल्या चौथ्या कसोटी सामन्याद्वारे या दौऱ्याची समाप्ती झाली आहे. या निर्णायक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ३ विकेट्सने मात करत २-१ च्या फरकाने कसोटी मालिका जिंकली आहे. भारताच्या या ऐतिहासिक विजयात युवा खेळाडूंनी खासकरुन शुबमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी मोलाचे योगदान दिले. परंतु या दोन्ही धुरंधरांना या सामन्यात शतक न करता आल्याने त्यांच्या वडीलांनी निराशा व्यक्त केली. यावर माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने प्रतिक्रिया दिली आहे.

अवघ्या ९ धावांनी हुकले शतक

भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर गिल याने ब्रिस्बेन कसोटीतील दुसऱ्या डावात ९१ धावांची महत्त्वपुर्ण खेळी केली होती. सामन्याच्या पाचव्या दिवशी रोहित शर्माची मोठी विकेट गमावल्यानंतर संघाचा डाव सावरताना १४६ चेंडूत २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने त्याने ही धावसंख्या गाठली होती. अखेर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन याने स्टिव्ह स्मिथच्या हातून त्याला झेलबाद केल्याने ९ धावांनी त्याचे शतक हुकले.

शुबमन गिलच्या वडिलांचे वक्तव्य

यानंतर टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना गिलचे वडील लखविंदर सिंग म्हणाले की, “जर गिलने शतक केले तर त्याचा आत्मविश्वास अजून जास्त वाढला असता. तो अतिशय उत्कृष्टपणे फलंदाजी करत होता. परंतु अचानक त्याने स्वत:च्या आवाक्यात नसलेला शॉ खेळला आणि तो बाद झाला.”

“कसोटी मालिकेतील सहा डावात त्याने फलंदाजी केली. दरवेळी मैदानावर फलंदाजी करताना त्याच्या चेहऱ्यावरील तेज मला स्पष्ट दिसत होते. परंतु मला त्याची बाद होण्याच्या पद्धत ही जास्त चितेंत टाकणारी बाब वाटली. तो ऑफ स्टंपच्या बाहेरून शॉट मारत होता आणि मला खात्री आहे की, विरोधी संघाने त्याची ही बाब हेरली असावी. मी अपेक्षा करतो की, तो यामधून काही तरी शिकेल आणि पुढे त्याच चुका करणार नाही.”

लखविंदर सिंग यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय दिग्गज सेहवागने इंस्टाग्रामद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. वृत्तपत्रातील न्यूज क्लिपचा फोटो शेअर करत त्याने लिहिले आहे की, ‘शेवटी आई-वडील हे आई वडिलच असतात.’ सोबतच #100sebadhkarthacontribution असा हॅशटॅग त्याने दिला आहे. याचा अर्थ असा की, गिलचे ब्रिस्बेन कसोटीतील योगदान शतकापेक्षा खूप मोठे राहिले आहे.

https://www.instagram.com/p/CKQi3pFlXvl/?utm_source=ig_web_button_share_sheet

वॉशिंग्टन सुंदरच्या वडीलांनी व्यक्त केली होती निराशा

वॉशिंग्टन सुंदरने ब्रिस्बेन कसोटीतील पहिल्या डावात १४४ चेंडूत ४३.०६च्या स्ट्राईक रेटने ६२ धावा केल्या होत्या. या खेळीसाठी त्याने १ षटकार आणि ७ चौकार मारले होते. अखेर मिचेल स्टार्कने कॅमरॉन ग्रीनच्या हातून त्याला झेलबाद केले होते. सोबतच त्याने शार्दुल ठाकूरसोबत मिळून शतकी भागिदारी रचली होती. यामुळे भारतीय संघ पहिल्या डावात ३३६ धावा करु शकला आणि ऑस्ट्रेलियाला नाममात्र ३४ धावांची आघाडी मिळाली होती.

यानंतर आयएएनएसशी बोलताना सुंदरचे वडील एम सुंदर म्हणाले होते की, “सुंदरने ब्रिस्बेन कसोटीत अतिशय विशेष फलंदाजी केली. परंतु तो त्याची तीच खास खेळी शतकात रुपांतरित न करु शकल्याने मी हताश झालो आहे. कमीतकमी शार्दुल आणि नवदीप सैनी बाद झाल्यानंतर मोहम्मद सिराजसोबत मिळून त्याने जोरदार फटकेबाजी करायला हवी होती. परंतु त्याने पळून एक-दोन धावा घेण्याला प्राधान्य दिले.”

“मला माहिती आहे की, सुंदर पुल शॉट्स आणि जोरदार फटके मारु शकतो. त्याच्या क्षमतेनुसार त्याने मोठी खेळी साकारण्याचा प्रयत्न करायला हवा होता. परंतु त्याने ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला. परिणामत: भारतीय संघाला कमी धावांची आघाडी मिळाली असती,” असे ते पुढे बोलताना म्हणाले.

तसेच शेवटी एम सुंदर यांनी सांगितले की, “तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यापासून दररोज मी त्याला बोलत असतो. मी त्याला फार पुर्वीच सांगितले होते की, जेव्हाही तुला संधी मिळेल, तेव्हा तू मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न कर आणि संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचल.”

महत्त्वाच्या बातम्या-

युवा क्रीडा पत्रकारानं उधळला विजयी गुलाल! तालुक्यात एकच चर्चा, दुप्पट वयाच्या उमेदवाराला चीतपट केलंय पोरानं

“हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण”, ब्रिस्बेन कसोटीतील विजयानंतर रिषभ पंतने व्यक्त केल्या भावना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---