---Advertisement---

भारताच्या ऐतिहासिक विजयाचे ६ नायक, ज्यांनी गाजवली लॉर्ड्स कसोटी

---Advertisement---

भारतीय संघाने सोमवारी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इतिहास रचला. भारताने ही कसोटी १५१ धावांनी जिंकत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने हा विजय संपादन केला. असे असले तरी, या सामन्यात काही खेळाडूंचे अतुलनीय योगदान होते, ज्यामुळे हा सामना भारत आपल्या नावे करू शकला.

केएल राहुलचे रेकॉर्डब्रेक शतक
लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी जेम्स अँडरसनचा चेंडू हवेत स्विंग होत असताना केएल राहुल खेळपट्टीवर नांगर टाकून उभा राहिला. राहुलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावताना १२९ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. राहुलने सुरुवातीला आपला सलामीचा साथीदार रोहित शर्मासोबत १२६ धावांची आणि नंतर कर्णधार विराट कोहलीसोबत ११७ धावांची भागीदारी केली. राहुलला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

रोहित शर्माची शानदार सुरुवात
कसोटीच्या पहिल्या दिवशी रोहित शर्माने आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजी करताना भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला. रोहितचे शतक हुकले तरी, त्याच्या १४५ चेंडूतील ८३ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने ३६४ धावांचा टप्पा गाठला.

पुजारा-रहाणेने दाखवली ताकद
भारताच्या दुसऱ्या डावात जेव्हा राहुल, रोहित आणि विराट कोहलीसारखे फलंदाज लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले असताना चेतेश्वर पुजारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेने संघाला आधार दिला. या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या दिवशी संयमाने फलंदाजी करत २९७ चेंडूत १०० धावा जोडल्याने भारतीय संघ सामन्यात टिकून राहिला. रहाणेने ६१ तर, पुजाराने ४५ धावांचे योगदान दिले.

बुमराह आणि शमीने दाखवले फलंदाजीतील कसब
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना भारतीय संघाच्या विजयाचे सर्वात मोठे नायक म्हटले गेले तरी वावगे ठरणार नाही. या दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या डावात नवव्या गड्यासाठी फक्त १२० चेंडूत ८९ धावांची अतुलनीय भागीदारी करत भारताला २९८ धावांवर नेले. त्यांच्या फलंदाजीमुळे भारताच्या सामना जिंकण्याच्या आशा खूप वाढल्या. बुमराहने नाबाद ३४ तर शमीने नाबाद ५६ धावा केल्या. गोलंदाजीत बुमराहने दुसऱ्या डावात ३ बळी घेतले.

मोहम्मद सिराजची भेदक गोलंदाजी
भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या गोलंदाजीने टीकाकारांची बोलती बंद केली. मोहम्मद सिराजने दोन्ही डावात ८ बळी घेतले. सिराजने पहिल्या डावात सिब्ली, हसीब हमीद, बेअरस्टो आणि रॉबिन्सनचे बळी घेतले. दुसऱ्या डावातही सिराजने जोस बटलर, मोईन अली, सॅम करन आणि जेम्स अँडरसन यांना तंबूचा रस्ता दाखवला. सिराजने सलग दोन चेंडूंवर मोईन अली आणि सॅम करनला बाद करत भारतीय संघाचा विजय निश्चित केला.

महत्त्वाच्या बातम्या – 

“इंग्लंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांना घाबरले”, सचिन तेंडूलकरची यजमानांवर जहरी टीका

टी२० विश्वचषकासाठी ‘हा’ दिग्गज खेळाडू असणार न्यूझीलंडचा गोलंदाजी प्रशिक्षक, मुंबई इंडियन्सची आहे खास नातं

खेळाडू आणि चाहत्यांनी एकत्र येत लॉर्ड्स कसोटी दरम्यान रूथ स्ट्रॉस फाऊंडेशनसाठी गोळा केला इतक्या कोटींचा निधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---