कसोटी आणि वनडे मालिकेत वेस्ट इंडिजला धूळ चारल्यानंतर भारतीय संघ टी20 मालिकेचीही विजयी सुरुवात करेल असे सर्वांना वाटले होते. मात्र, गुरुवारी (दि. 03 ऑगस्ट) त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडिअमवर पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताला 4 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पराभूत होताच हार्दिक पंड्याने मोठी प्रतिक्रिया दिली. आता त्याच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
काय म्हणाला हार्दिक पंड्या?
पहिल्या टी20 सामन्यात 150 धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) निराश झाला. तो म्हणाला की, “सामन्यात आम्ही एका वेळेपर्यंत चांगल्याप्रकारे आव्हानाचा पाठलाग करत होतो. मात्र, आम्ही काही चुका केल्या आणि त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागले. हा एक युवा संघ आहे आणि चुका होऊ शकतात. यातून आम्हाला शिकण्याची गरज आहे. अजूनही मालिकेतील 4 सामने शिल्लक आहेत. जर तुम्ही विकेट्स गमावल्या, तर तुमच्यासाठी आव्हान गाठणे कठीण होऊन बसते. काही मोठे फटके सामना पलटू शकतात. आम्ही काही विकेट्स लवकर गमावल्या, ज्यामुळे आमचे नुकसान झाले.”
यावेळी पुढे बोलताना तो असेही म्हणाला की, “आम्हाला या सामन्यात 2 मनगटी फिरकीपटूंना संधी द्यायची होती. मुकेशने या सामन्यात खूप चांगली गोलंदाजी केली आणि तिन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पण केले आहे. तिलकनेही चांगली सुरुवात केली आणि पहिल्याच सामन्यात आक्रमक खेळ दाखवला. त्याच्यात मला आत्मविश्वास दिसला, जो भारतीय संघासाठी चांगला मानला जाऊ शकतो.”
तिलकची भारतीय संघासाठी मोठी खेळी
वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून तिलक वर्मा (Tilak Varma) एकटाच चमकला. त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात 22 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 39 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादवने 21, तर हार्दिक पंड्याने 19 धावांची खेळी साकारली. भारतीय संघ निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत फक्त 145 धावाच करू शकला.
अशात वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघातील दुसरा टी20 सामना 6 ऑगस्ट रोजी गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यातून भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. (skipper hardik pandya statement after india losing 1st t20i match against west indies read)
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! पाकिस्तानच्या दिग्गज माजी क्रिकेटपटूचे निधन, क्रिकेटविश्वावर दु:खाचा डोंगर
पहिल्या टी20 मध्ये वेस्ट इंडिजची सरशी! 150 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची घसरगुंडी