आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाचे खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली धावांचा पाऊस पाडण्यासोबतच गोलंदाजीतही हात आजमावताना दिसले. विशेष म्हणजे, स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल पाचमध्ये विराट आणि रोहितचा समावेश आहे. विराट 711 धावांसह पहिल्या, तर रोहित 550 धावांसह पाचव्या स्थानी आहे. अशात हे दोघे अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धही कमाल फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात असतील, पण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याला त्यांची चिंता नाहीये. ऑस्ट्रेलियाला भारताच्या वेगळ्याच खेळाडूचा धोका असल्याचे तो म्हणाला आहे.
काय म्हणाला पॅट कमिन्स?
विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यापूर्वी (CWC 2023 Ind vs Aus Final) कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने मोठे विधान केले. त्याने म्हटले की, त्याच्या संघासाठी सर्वात मोठा खतरा इतर कुणी नसून मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा आहे. कमिन्सला विचारले गेले की, ऑस्ट्रेलिया संघासाठी कोणत्या भारतीय खेळाडूचे आव्हान आहे. यावर उत्तर देताना त्याने म्हटले की, “भारतीय संघ खूपच चांगला संघ आहे. मोहम्मद शमी एक मोठा धोका आहे.”
खेळपट्टीविषयी कमिन्सची प्रतिक्रिया
याव्यतिरिक्त कमिन्सने अहमदाबादच्या खेळपट्टीविषयीही चर्चा केली. विश्वचषक उपांत्य सामन्यापूर्वी असे वृत्त आले होते, ज्यात सांगितले होते की, आयसीसीचे खेळपट्टी सल्लागार एटकिन्सन यांनी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील उपांत्य सामन्यासाठी यजमान देशावर खेळपट्टी बदलण्याचा आरोप लावला होता. मात्र, आयसीसीने नंतर स्पष्टीकरण दिले होते की, असा कोणताही नियम नाही की, बादफेरीतील सामने नवीन खेळपट्टीवरच आयोजित केले गेले पाहिजे. तसेच, एटकिन्सन यांना आधीच याबाबत सांगण्यात आले होते.
कमिन्स अहमदाबादच्या खेळपट्टीविषयी बोलताना म्हणाला की, “हे स्पष्टरीत्या दोन्ही संघांसाठी समान आहे. आम्हाला यात कोणतीही शंका नाही की, आपल्या देशात आपल्या खेळपट्टीवर खेळण्याचे काही फायदे आहेत. मात्र, आम्ही इथे खूप क्रिकेट खेळतो.”
अशात रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामन्याची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. (skipper pat cummins says india is a pretty well rounded side this is a big threat ind vs aus world cup 2023 final read)
हेही वाचा-
CWC23 Final Toss: ‘रोहित असाच टॉस कर…’, पाकिस्तानला ट्रोल करत दिग्गजाने सांगितली मजेदार पद्धत, पोट धरून हसाल
World Cup 2023: Final पूर्वी मैदानी पंचाचे नाव ऐकूनच भारतीय चाहत्यांना भरली धडकी; म्हणाले, ‘पनवती अंपायर’