भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्म्रीती मंधाना हिने महिला आयपीएल सुरू करण्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. तिचा असा विश्वास आहे की, देशाकडे इतक्या महिला खेळाडू आहेत की, ते ६ संघांची महिला आयपीएल सुरू करू शकतात. त्यामुळे भारतीय संघाचे ‘बेंच स्ट्रेंथ’ मजबूत होण्यास मदत होईल. २५ वर्षीय मंधानाला वाटते की, टी-२० लीग सुरू झाल्यापासून भारतीय पुरुष संघाच्या देशांतर्गत खेळाडूंची गुणवत्ता सुधारली आहे. हीच गोष्ट महिला क्रिकेटच्या बाबतीतही होऊ शकते.
भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना मंधाना म्हणाली, “भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेट संघांमध्ये राज्यांची संख्या समान आहे. जेव्हा पुरुषांची आयपीएल सुरू झाली, तेव्हा राज्य संघांची संख्या समान होती. पण जसजसा वेळ जात गेला तसतसे या खेळाडूंच्या खेळाचा दर्जा चांगला होत गेला.”
“आज आयपीएल काय आहे. १०-११ वर्षांपूर्वी असे नव्हते. मला वाटते की, महिला क्रिकेटसाठीही याचा फायदा होऊ शकते. आपल्या देशात महिला खेळाडूही पुरुषांच्या बरोबरीने क्रिकेट खेळतात. आता मला वाटते की, बीसीसीआय ५-६ संघांसह महिलांची आयपीएल सुरू करू शकते आणि एक किंवा दोन वर्षात ही लीग ८ संघांचीही बनवू शकते. पण बीसीसीआयने हा बदल करेपर्यंत आम्ही क्रिकेट खेळत राहू की नाही? हे आम्हाला माहित नाही. ”
स्म्रीतीचा असा विश्वास आहे की, या लीगच्या माध्यमातून महिला खेळाडूंना पुढे जाण्यासाठी योग्य वातावरण मिळेल जे त्यांचा खेळ विकसित करण्यास मदत करेल. “५-६ संघांसह आम्ही पुढे जाण्यास तयार आहोत. परंतू, ८ संघांसह जाण्यासाठी मला वाटते की, आम्ही अद्याप तयार नाही. पण जर आपण ५-६ संघांसह सुरुवात केली. तर आम्ही लवकरच ८ संघांच्या स्पर्धेत पोहोचू. माझा विश्वास आहे की, जोपर्यंत या परिवर्तनाची सुरुवात होत नाही. तोपर्यंत, आम्ही महिला क्रिकेटपटूंना खेळाच्या वेगळ्या पातळीवर जाण्यास मदत होऊ शकत नाही,” असेही ती म्हणाली.
“महिला बिग बॅश लीगमुळे ऑस्ट्रेलियन संघाची बेंच स्ट्रेंथ अधिक मजबूत झाली आहे. बीसीसीआयनेही आयपीएलच्या माध्यमातून महिला क्रिकेट संघासाठी अशाचप्रकारे साहाय्य करावे. मी ४ वर्षांपूर्वी बिग बॅश लीगमध्ये खेळले आणि आता त्याची पातळी खूप वेगळी आहे. आपण पाहू शकता की, क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये ४०-५० महिला खेळाडू कोणत्याही वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तयार असतात. मला देखील भारतीय क्रिकेटमध्ये असेच काही घडताना पाहायचे आहे. मला वाटते की, आयपीएल यामध्ये मोठी भूमिका बजावू शकते,” अशा शब्दांत तिने आपल्या मताचा शेवट केला.
सध्या बीसीसीआय महिलांसाठी ३ संघ महिला टी२० चॅलेंज स्पर्धा खेळतातते. यामध्ये ट्रेल ब्लेझर्स, सुपरनोव्हास आणि वेलोसिटी यांच्या संघादरम्यान स्पर्धा आयोजित केली जाते.
महत्त्वाच्या बातम्या-
लॉर्ड्स कसोटीत तब्बल १५ नो बॉल टाकणाऱ्या बुमराहसाठी ‘या’ दिग्गजाचा पुढाकार, सांगितला उपाय
हेडिंग्ले कसोटीत पुनरागमनाच्या इराद्याने उतरणार इंग्लंड, असा असेल फलंदाजी क्रम
‘तू वर्ल्ड क्लास गोलंदाज’; महिला पत्रकार बनली सिराजची चाहती, लॉर्ड्समधील प्रदर्शनाची केली स्तुती