आयपीएलदरम्यान जखमी झालेला भारताचा प्रमुख फलंदाज आणि वनडे व टी२० संघाचा नियमित उपकर्णधार रोहित शर्मा याच्या तंदुरुस्तीवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर, रोहित आयपीएलमधील तीन सामने खेळला होता. मात्र, त्या वेळीही तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले होते. रोहितला दुहेरी आणि तिहेरी धावा काढताना त्रास होत होता. याच विषयावर, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुली याचे महत्त्वपूर्ण वक्तव्य समोर आले आहे. रोहित अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे गांगुलीने स्पष्ट केले आहे.
रोहित केवळ ७० टक्के तंदुरुस्त
एका कार्यक्रमावेळी गांगुलीला रोहितच्या तंदुरुस्तीविषयी प्रश्न विचारला गेला. त्याला उत्तर देताना गांगुली म्हणाला, “रोहित शर्मा केवळ ७० टक्के तंदुरुस्त आहे. तुम्ही स्वतः का त्याला विचारत नाही? रोहित अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही. याच कारणाने, त्याचा समावेश वनडे व टी२० संघात समावेश केला गेला नाही. मात्र, त्याचा समावेश कसोटी संघात केला गेला आहे.”
आयपीएलवेळी झाली होती दुखापत
रोहितला आयपीएल दरम्यान किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यावेळी हॅमस्ट्रींगचा त्रास झाला होता. त्यानंतर रोहितने विश्रांती घेतली होती. या दरम्यान त्याला तीन सामन्यांना मुकावे लागले होते. विश्रांतीनंतर परत आल्यावर, त्याने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आणि संघाला विजेतेपद देखील मिळवून दिले.
रोहितला संपूर्ण दौऱ्यासाठी डावलले गेले होते
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ज्यावेळी भारताचा संघ घोषित झाला, त्यावेळी रोहितला एकाही संघात स्थान दिले गेले नव्हते. या निर्णयामुळे वाद निर्माण झाल्याने, अखेरीस रोहितला कसोटी संघात निवडले गेले.
गांगुलीला ३ नोव्हेंबर रोजी रोहितच्या तंदुरुस्तीविषयी विचारले गेले होते, तेव्हा त्याने उत्तर दिले होते की, “रोहित संघाचा उपकर्णधार आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही म्हणून त्याला संघात निवडले गेले नाही. रोहितसारखा खेळाडू कोणाला संघात हवा नसतो? आपल्याला रोहितच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवावे लागणार आहे. आमची जबाबदारी आहे की, देशाचा सर्वोत्तम संघच मैदानावर उतरायला हवा. रोहित वेळेवर तंदुरुस्त झाला, तर त्याचा नक्कीच संघात समावेश करण्यात येईल.”
भारतीय संघ आगामी दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. मात्र, रोहित शर्मा संघासोबत गेलेला नाही. बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रोहितची तंदुरुस्ती चाचणी झाल्यानंतर, वनडे व टी२० संघातील त्याच्या समावेशाचा निर्णय घेण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या-
-“विराट कसोटी मालिकेत नसणे हे निराशाजनक, परंतु तरीही भारताकडे सुपरस्टार्स आहेत”
-संघ महत्त्वाचा की कुटुंब? विराटने पालकत्व रजा घेतल्याने चाहत्यांमध्ये पडले दोन गट
ट्रेंडिंग लेख-
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
-ज्याच्या गोलंदाजीवर जखमी होत फिलीप ह्युजेस देवाघरी गेला, तोच गोलंदाज भारताविरुद्ध करतोय पदार्पण
-रामराम आणि पुन्हा भेटू! आयपीएल २०२० ला अलविदा करत असताना एक नजर या स्पर्धेतील महत्वाच्या घटनांवर