इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. त्यातील पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या दिवशी चांगले पुनरागमन करत सामना १५१ धावांनी जिंकला, ज्यामुळे भारतीय संघाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तसेच भारतीय गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी करत दुसऱ्या सामन्याच्या विजयात मोठे योगदान दिले. मात्र, असे असले तरीही या दरम्यान संघासाठी एक चिंतेची बाब ठरली. ते म्हणजे जसप्रीत बुमराहचे नो बॉल.
दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहने एकूण १५ नो बॉल टाकले, ज्यामध्ये पहिल्या डावातील एका षटकात ४ नो बॉल टाकले होते. यामुळे बुमराहचे ते षटक तब्बल १५ मिनिटे चालले होते. यातील एक चेंडू जेम्स अँडरसनच्या हेल्मेटला देखील लागला होता. त्यामुळे त्याला कनक्शन नियमाच्या प्रक्रियेतून जावे लागले.
अशात तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मोंडे जोंडेकी यांनी बुमराहला त्याच्या नो बॉलमध्ये सुधारणा करायची असल्यास, त्याच्या रनअपमध्ये सुधारणा करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्यानुसार यामुळे बुमराहला नो बॉल बाबत अडचण होणार नाही. जोंडेकी यांनी त्यांच्या रनअपमध्ये केलेल्या सुधारणांचे देखील अनुभव सांगितले. त्यांना त्यांच्या कारकिर्दीत रनअपसाठी खूप मेहनत घ्यावी लागली होती.
याबाबत बोलताना जोंडेकी म्हणाले, “माझ्या मते, एका षटकात १० चेंडू टाकणे असे दृष्य क्वचितच पाहायला मिळते. त्यामुळे या गोष्टीवर काम करणे अत्यंत गरजेचे ठरते. त्यासाठी बुमराहला आपल्या रनअपवर काम करावे लागेल. कारण माझ्या कारकीर्दीत मी एका षटकात ४ नो बॉल टाकलेले, मला तरी आठवत नाही. हा. मात्र, पुढे जाऊन मला माझ्या रनअपच्या अडचणींना दूर करण्यासाठी त्यावर खूप मेहनत घ्यावी लागली. बुमराह हा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्यामुळे मला आशा आहे की, तो ही अडचण दूर करण्यासाठी यावर भरपूर मेहनत घेईल.”
दरम्यान, भारतीय संघाने इंग्लंडवर लॉर्ड्सच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असेल. २५ ऑगस्टपासून हेडिंग्लेच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळविण्यात येणार आहे. यासाठी दोन्ही संघाची जोरदार तयारी चालू आहे. तसेच इंग्लंडच्या संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्यांचा १५ सदस्यीय संघ देखील जाहीर केला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला नमवून भारतीय संघाने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या –
–हेडिंग्ले कसोटीत पुनरागमनाच्या इराद्याने उतरणार इंग्लंड, असा असेल फलंदाजी क्रम
–‘तू वर्ल्ड क्लास गोलंदाज’; महिला पत्रकार बनली सिराजची चाहती, लॉर्ड्समधील प्रदर्शनाची केली स्तुती
–भारतीय खेळाडूंनी इंग्लंडच्या क्रिकेटरचा अडवला रस्ता, मैदानावर जात असताना मुद्दाम उभे राहिले रस्त्यात!