मुंबई। रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये बुधवारी दक्षिण आफ्रिका लिजंड्सने शानदार विजयी सलामी दिली. बुधवारी जगप्रसिद्ध क्षेत्ररक्षक जाँटी ऱ्होडसने फलंदाजीतील कौशल्यही सादर केले. त्याने कर्णधारपदास साजेशी खेळी केली आणि त्याला अल्बी मॉर्कलची साथ मिळाली. त्यामुळे आफ्रिकेने वेस्ट इंडिज लिजंड्सला सहा विंकेट राखून हरविले.
डी. वाय पाटील स्टेडियमवरील लढतीत आफ्रिकेसमोर 144 धावांचे आवाक्यातील लक्ष होते. त्यांनी नऊ चेंडू राखून बाजी मारली. जाँटीने अष्टपैलू अल्बी मॉर्कलच्या साथीत पाचव्या विकेटसाठी 104 धावांची भागिदारी रचली. दोघांनी नाबाद अर्धशतके झळकाविली. त्यांनी आवास्तव धोका न पत्करता विजय साकार केला. मॉर्कलने कार्ल हुपरला चौकार मारून विजयावर धडाक्यात शिक्कामोर्तब केले.
आफ्रिकेची मदार हर्शल गिब्जवर होती, पण दुसऱ्या षटकात टिनो बेस्टच्या चेंडूवर तो चकला आणि पायचीत झाला. तेव्हा त्याची एकच धाव झाली होती. नवव्या षटकात 4 बाद 42 अशी घसरण झाली असताना आफ्रिकेवर दडपण आले होते. अशावेळी जाँटी-मार्कल यांची जोडी जमली.
त्याआधी विंडीजच्या डावाची सुरवात नाट्यमय झाली. योहान वॅन डर वॅथने डॅरेन गंगाला टाकलेले पहिले षटक निर्धाव गेले. दुसऱ्या षटकात गार्नेट क्रुगरला चंदरपॉलने तीन चौकार मारले. गंगाने चौथ्या षटकात अल्बी मॉर्कलचे सलग तीन चेंडू सीमापार केले.
या मालिकेत चांगला फॉर्म गवसलेल्या चंदरपॉलला बाद करून पॉल हॅरीसने आफ्रिकेला पहिले यश मिळवून दिले. पुढील षटकात हॅरीसने गंगाचा त्रिफळा उडविला. प्रतिस्पर्धी कर्णधार ब्रायन लाराचा बचावही भेदत त्याने दांडी गुल केली. रिकार्डो पॉवेलने मग प्रतिआक्रमण रचले. त्याने अँड्रयू हॉल, हॅरीस आणि क्रुगर या तिघांना षटकार खेचत विंडीजची आगेकूच कायम ठेवली.
मॉर्कलने टाकलेले 15वे षटक सनसनाटी ठरले. पहिल्या चेंडूवर हयात परतला. दुसरा चेंडू पॉवेलने सीमापार केला. तिसऱ्या चेंडूवर तो धावचीत झाला, तर चौथ्या चेंडूवर रिडली जेकब्ज शून्यावर परतला.
संक्षिप्त धावफलक।
वेस्ट इंडिज लिजंड्स। 20 षटकांत 8 बाद 143 (डॅरेन गंगा 31-32 चेंडू, 5 चौकार, शिवनारायण चंदरपॉल 21-17 चेंडू, 4 चौकार, ब्रायन लारा 4, रिकार्डो पॉवेल 30-17 चेंडू, 1 चौकार, 2 षटकार, कार्ल हुपर नाबाद 2318 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, टिनो बेस्ट 11, अल्बी मॉर्कल 31-2, पॉल हॅरीस 21-3) पराभूत विरुद्ध दक्षिण आफ्रिका लिजंड््स ः 18.3 षटकांत 3 बाद 146 (जाँटी ऱ्होडस नाबाद 53-40 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार, अल्बी मॉर्कल नाबाद 54-30 चेंडू, 6 चौकार, 2 षटकार, टिनो बेस्ट 12-2, सुलेमान बेन 21-1)
स्पर्धेत आतापर्यंत
-वेस्ट इंडिजचा सलग दुसरा पराभव
-सलामीला भारताविरुद्ध हार
-दक्षिण आफ्रिका पहिल्या सामन्यात विजयी
-भारत सलग दोन सामने जिंकून आघाडीवर
-भारताचे सर्वाधिक चार गुण
-आफ्रिकेची दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर झेप
-श्रीलंका 2 सामन्यांत एक विजय-एक पराभव अशा कामगिरीसह तिसरा
-ऑस्ट्रेलियाचे खाते एका परभवामुळे अद्याप रिकामे