पुढील काही महिन्यात इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसू शकतो. त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटॉन डिकॉकच्या यंदाच्या आयपीएलमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
डिकॉकने पुढील काही आठवड्यांसाठी मानसिक विश्रांती (मेंटल हेल्थ ब्रेक) घेण्याचा निर्णय घेतला आहे. याच कारणाने तो दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या देशांतर्गत टी२० स्पर्धेतही खेळणार नाही. त्याच्या या निर्णयाबाबत दक्षिण आफ्रिका क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष अँड्र्यू ब्रित्झके यांनी माहिती देत त्याच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ नुकताच पाकिस्तान दौरा करुन परतला आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व २८ वर्षीय क्विंटॉन डिकॉकने केले. मात्र या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेला २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० असा पराभव स्विकारावा लागला. यावेळी डिकॉकने तो कसोटीत केवळ तात्काळ कर्णधारपद सांभाळत असल्याचेही सांगितले होते. याबरोबरच त्याने कोविड-१९ मुळे बायोसिक्यूअर बबलमध्ये रहाणे कठीण असल्याचे म्हटले होते. त्याने सांगितले होते की अशा वातावरणात राहण्याने ताण येत आहे.
आता यानंतर डीकॉकने विश्रांती घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो १९ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी दरम्यान डर्बन येथे होणाऱ्या टी२० स्पर्धेत खेळणार नाही. त्याच्या विश्रांती घेण्याच्या निर्णयाबद्दल ब्रित्झके यांनी सांगितले की ‘दक्षिण आफ्रिका क्रिकेटर्स असोसिएशन आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड त्याला या प्रक्रियेत पूर्ण पाठिंबा देईल.’
फाफ डू प्लेसिसही खेळणार नाही टी२० मालिका
शुक्रवारपासून (१९ फेब्रुवारी) सुरु होत असलेली देशांतर्गत टी२० मालिका दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसही खेळणार नाही. त्याच्या न खेळण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, त्याचे नाव स्पर्धेत सहभागी झालेल्या एकाही संघात समाविष्ट नाही.
मुंबई इंडियन्सकडून ख्रिस लीनला मिळू शकते संधी
आक्रमक फलंदाज ख्रिस लीन मागीलवर्षी मुंबई इंडियन्स संघात सामील झाला. मात्र त्याला मागील हंगामात एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यावेळी मुंबई इंडियन्सकडे डीकॉक सलामीला फलंदाजीसाठी असल्याने लीनसाठी जागा रिक्त नव्हती. पण आता जर डीकॉकने आयपीएलही न खेळण्याचा निर्णय घेतला, तर लीनला मुंबईकडून आयपीएलचा १४ वा हंगाम खेळण्याची संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
“भारताने आम्हाला तिन्ही आघाड्यांवर मात दिली असली तरी…”, इंग्लिश कर्णधार जो रूटची प्रतिक्रिया
आयपीएल लिलावात ‘या’ चौघांवर असेल चेन्नईची नजर, एका विदेशी खेळाडूचा समावेश






