भारतीय संघाने जेव्हापासून क्रिकेट खेळायला सुरवात केली, अगदी तेव्हापासून खऱ्या अर्थाने ‘वेगवान’ असलेल्या वेगवान गोलंदाजाची कमतरता भारतीय संघाला भासत राहिली आहे. भारतीय खेळपट्ट्या फिरकीला पूरक असल्याने, तितकेसे वेगवान गोलंदाज भारतात कधी घडले नाहीत. अनेक वर्ष भारतीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून; अष्टपैलू असलेल्या कपिलदेव यांचे नाव अग्रभागी होते. देवशिष मोहंती, आशिष नेहरा, मुनाफ पटेल आणि श्रीसंत ही अशी काही नावे; ज्यांना भारतीय क्रिकेटमधील वेगवान गोलंदाज मानले जाते. परंतू सन २०१० मध्ये वेगवान गोलंदाज म्हणून; दोन क्रिकेटपटू भारतातील देशांतर्गत क्रिकेट गाजवत होते. हे दोघेही सातत्याने १४५ किमी/प्रतितास पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करायचे. यातील एक होता विदर्भाचा उमेश यादव तर दुसरा होता झारखंडचा वरूण ऍरॉन.
शाळेत खेळायचा अनेक खेळ
जमशेदपूर सारख्या क्रिडाप्रेमींच्या शहरात वाढलेल्या वरूणला लहानपणापासूनच खेळांची प्रचंड आवड होती. त्याची आई बिहारसाठी बास्केटबॉल तर आजोबा हॉकी खेळलेले. जमशेदपूरमध्ये जेआरडी टाटा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण आहे. याठिकाणी प्रत्येक खेळाचे खेळाडू कायमच घाम गाळत असतात. वरूण आपल्या शाळेच्या दिवसात क्रिकेटसोबत अमेरिकन शैलीचा हॅन्डबॉल, व्हॉलीबॉल तसेच फुटबॉल ही खेळायचा. आपल्याला क्रिकेटमध्ये अधिक संधी मिळेल असा विचार करून त्याने क्रिकेटकडे कटाक्षाने लक्ष द्यायला सुरुवात केली. जमशेदपूरच्या किनन स्टेडियमवर तो क्रिकेटचा सराव करायचा.
डेनिस लिली यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली वरूणची कारकीर्द
वरूणच्या गोलंदाजीवर सर्वप्रथम नजर पडली ती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या युवा खेळाडूंचा शोध घेणाऱ्या टीआरडीओ पदाधिकाऱ्यांची. १४ वर्षाच्या वरूणची गोलंदाजी पाहून ते निवडकर्ते खुश झाले. एका वर्षात त्याची रवानगी, चेन्नईतील एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये करण्यात आली. भारतातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांना या अकादमीत प्रशिक्षित केले जाते. ऑस्ट्रेलियाचे महान गोलंदाज डेनिस लिली हे त्या अकादमीचे संचालक होते. येथूनच खऱ्या अर्थाने सुरू झाला वरुणच्या क्रिकेट कारकिर्दीचा प्रवास.
एका चेंडूने आला प्रकाशझोतात
लवकरच त्याचा समावेश भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघात करण्यात आला. एका वर्षात भारतीय संघाकडून तो इंग्लंड वगळता प्रत्येक देशात मालिका खेळला. त्यातून त्याला पुरेसा अनुभव मिळाला. वरूनने २००८-२००९ च्या हंगामात झारखंडकडून आपले प्रथमश्रेणी पदार्पण केले. त्याच वर्षी तो दुलीप ट्रॉफीसाठी पूर्व विभागाच्या संघात निवडला गेला. वरून देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांची वाहवा मिळवत होता. २०१०-२०११ रणजी हंगामात १५३.४ किमी/प्रतितास इतक्या वेगाचा चेंडू टाकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०११ मध्य ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या उदयोन्मुख खेळाडूंच्या संघात त्याचा समावेश केला गेला. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजीला पोषक असल्याने तेथे त्याची कामगिरी समाधानकारक राहिली. वरूण ऍरॉन हे नाव भारतीय क्रिकेट वर्तुळात चांगलेच गाजू लागले होते.
आंतरराष्ट्रीय पदार्पणात विरोधी संघाचे तीन फलंदाज केले ‘बोल्ड’
इंग्लंडचा संघ २०११ च्या भारत दौऱ्यावर आला असता, वरुणचा समावेश भारताच्या एकदिवसीय व टी२० संघात करण्यात आला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्याद्वारे त्याने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पहिल्या सामन्यात २४ धावा देत, त्याने तीन गडी बाद केले. विशेष म्हणजे तिन्ही फलंदाज त्याने त्रिफळाचीत केले होते. एकदिवसीय मालिकेनंतर, वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने आपला पहिला कसोटी सामना खेळला. हा सामना देखील वानखेडे स्टेडियमवरच झाला होता. वरूणने आपले प्रथमश्रेणी, कसोटी व एकदिवसीय पदार्पण हे योगायोगाने वानखेडे स्टेडियमवरच केले होते.
दुखापतीनंतर पुनरागमन
वरूणला कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पाठीच्या गंभीर दुखापतीने ग्रासले. तो जवळपास तीन वर्ष संघाबाहेर राहिला. त्याने, २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यावर मँचेस्टर कसोटीद्वारे पुनरागमन केले. पुढे, तो श्रीलंका व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये खेळला. वरूण सातत्याने दुखापतग्रस्त झाल्याने राष्ट्रीय संघात त्याची निवड होत नव्हती. अशातच जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार या गोलंदाजांनी भारतीय संघातील आपली जागा मजबूत केली होती. वरूण २०१५ नंतर कधीही भारतीय संघात खेळला नाही. वरूणने भारतासाठी आतापर्यंत प्रत्येकी नऊ कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्याच्या नावे १८ तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११ बळींची नोंद आहे.
आयपीएल आणि लग्न
वरूणने आयपीएलमध्ये आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली डेअरडेविल्स, किंग्स इलेव्हन पंजाब व राजस्थान रॉयल्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. वरूण २०१४ व २०१८ अशी दोन वर्ष काउंटी क्लब डरहॅम व लिसेस्टरशायर या संघांसाठी खेळला आहे.
वरूणने २०१६ मध्ये आपली बालपणीची मैत्रीण रागिनी सिंह हिच्यासोबत विवाह केला. सामाजिक सुधारण्याचा संदेश देत अवघ्या साडेसात रुपयात त्याने कोर्ट मॅरेज करत; त्यांनी एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला.
अगदी काही वर्षांपूर्वी भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून नावाजला गेलेला वरूण सततच्या दुखापतींमुळे; राष्ट्रीय संघातून बाहेर पडला. त्याचा वेग कमी झाला असला तरी स्थानिक क्रिकेटमध्ये तो तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसतो. याचवर्षीच्या ऑगस्ट महिन्यात त्याने त्याचा झारखंड क्रिकेट सोबतचा 18 वर्षाचा प्रवास थांबवला. तो 2022चे देशांतर्गत क्रिकेट तो बडोदा संघाकडून खेळला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचा ‘तो’ एक दौरा केला नसता तर क्रिकेटला ‘हेडन’ मिळाला नसता…
पंतला मिळाली पाहिजे प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी, ‘ही’ आहेत तीन प्रमुख कारणे






