व्हीव्हीएस लक्ष्मण या नावाचे पूर्ण रूप काय ? असा प्रश्न जर कोणी केला, तर त्याचे उत्तर बहुतांशी लोक देतील ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’. भारतीय क्रिकेट संघाचा संकटमोचक म्हणून ज्याला ओळखले जाते त्या लक्ष्मणचा आज (१ नोव्हेंबर) वाढदिवस. खेळपट्टीचे स्वरूप आणि वातावरण कसेही असू दे, वेगवान गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी असो नाहीतर फिरकी गोलंदाजांना साथ देणारी. भारताच्या वरच्या फळीतील फलंदाज बाद झाल्यानंतर, जो फलंदाज भारताला सामन्यात पुनरागमन करून द्यायचा तो फलंदाज म्हणजे लक्ष्मण. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या आपल्या समकालीन संघसहकाऱ्यां इतकी प्रसिद्धी लक्ष्मणला मिळाली नसली तरी; भारतीय क्रिकेट इतिहासातील त्याचे योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे.
माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा नातू
हैदराबादमधील प्रसिद्ध डॉक्टर दांपत्य असलेले डॉ. शांताराम व डॉ. सत्यभामा हे त्याचे आई-वडील. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे नात्याने लक्ष्मणचे आजोबा होते. व्हीव्हीएस लक्ष्मण या नावाचे पूर्ण रूप म्हणजे वेंगीपुरप्पू वेंकट साई लक्ष्मण. हैदराबादमधील लिटल फ्लॉवर या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर, लक्ष्मण मेडिकल स्कूलमध्ये दाखल झाला. आई-वडिलांप्रमाणे त्यालाही डॉक्टर बनायचे होते. मात्र, जेव्हा तो मेडिकल स्कूलमध्ये पोहोचला, तेव्हा मात्र त्याने क्रिकेटर बनण्याचे पक्के केले. सुरुवातीला घरच्यांनी विरोध केला. विरोधानंतरही, त्याने अगदी काही कालावधीत घरच्यांचे मन वळविण्यात यश मिळवले. घरच्यांची परवानगी मिळताच, लक्ष्मण मैदानावर मेहनत करू लागला.
एकोणीस वर्षाखालील संघाकडून केली दमदार कामगिरी
सन १९९२-१९९३ चा रणजी मोसमात त्याने आपले प्रथमश्रेणी पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात तो शून्यावर बाद होऊन परतला. पहिल्या सामन्यात अयशस्वी ठरल्या नंतरही दमदार खेळाच्या जोरावर काही दिवसातच तो, भारताच्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघात निवडला गेला. १९९४ च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून त्याने एकोणीस वर्षाखालील क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याच सामन्यातून ऑस्ट्रेलियाच्या जेसन गिलेस्पी व ब्रेट ली यांनी पदार्पण केले होते. लक्ष्मणने पहिल्या सामन्यात ८८ धावांची लाजवाब खेळी केली. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात १५१ धावांची खेळी करत त्याने सर्वांची मने जिंकली. पाठोपाठ, रणजी ट्रॉफी व दुलीप ट्रॉफीत चमकदार कामगिरी करून त्याने भारतीय संघात निवडीसाठी आपली दावेदारी मजबूत केली.
आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि सुरुवातीचा काळ
देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीने लक्ष्मणने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. शेवटी लक्ष्मणने १९९६ मध्ये अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण केले. दुसऱ्याच मालिकेत त्याला, वेस्ट इंडिजविरुद्ध सलामीवीर म्हणून डावाची करण्यास सांगितले गेले होते. किंगस्टन येथे सलामीवीर म्हणून उतरत त्याने पहिल्या डावात ६४ धावांची खेळी केली.
भारतीय संघ १९९८ साली न्यूझीलंड दौर्यावर गेला असता; त्याची संघात निवड झाली मात्र तो एकही सामना खेळला नाही. लवकरच, त्याला एकदिवसीय संघात संधी दिली गेली. पहिल्याच सामन्यात तो शून्यावर बाद झाला. सलग तीन सामन्यात काही खास करू न शकल्याने, लक्ष्मणला लवकरच एकदिवसीय संघातून डच्चू देण्यात आला.
लक्ष्मण पुन्हा १९९९-२००० हंगामासाठी देशांतर्गत क्रिकेटकडे वळाला. त्याच वर्षीच्या रणजी हंगामात त्याने विक्रमी कामगिरी केली. एका हंगामात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला. लक्ष्मणने ९ सामन्यात १०८ च्या सरासरीने १,४१५ धावा फटकावल्या. त्याच्या कामगिरीची दखल लवकरच घेतली गेली. जानेवारी २००० मध्ये लक्ष्मणला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात पुनरागमनाची संधी देण्यात आली.
पुनरागमनानंतर गाजवले क्रिकेटजगत
भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर, लक्ष्मणच्या खेळात वेगळीच चमक दिसली. सिडनी येथील मालिकेतील तिसऱ्या कसोटीत इतर फलंदाज धावांसाठी झगडत असताना, लक्ष्मणने १६७ धावांची खेळी केली. लक्ष्मणच्या कारकिर्दीतील ‘गोल्डन इनिंग’ म्हणून ज्या खेळीचा उल्लेख केला जातो, ती खेळीदेखील ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली गेली होती. २००१ मध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला असताना, मुंबई कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिकेत आघाडी घेतली होती. दुसऱ्या कोलकाता कसोटीतही भारताला फॉलोऑन मिळालेला. अशावेळी लक्ष्मणने, राहुल द्रविडसोबत ३७६ धावांची विश्वविक्रमी भागीदारी केली होती. दोघांनीही चौथा दिवस पूर्ण खेळून काढत भारताला, आघाडी मिळवून दिली. लक्ष्मणाने त्या डावात २८१ धावांची अजरामर खेळी करत प्रेक्षकांना आपलेसे केले. फक्त लक्ष्मणच्या कारकीर्दीतील नव्हे तर,भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळ्यांपैकी ती एक खेळी होती. पुढे, दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड दौरे गाजवत, त्याने भारतीय संघातील आपली जागा पक्की केली.
आणि व्हीव्हीएस लक्ष्मण ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ झाला
सहा वर्ष कसोटी क्रिकेट खेळत असला तरी, लक्ष्मणला एकदिवसीय संघात नियमित जागा बनवता येत नव्हती. यावेळी देखील, एकदिवसीय संघातील निवडीसाठी त्याने प्रतिस्पर्धी म्हणून ऑस्ट्रेलियालाच निवडले. ग्वाल्हेर येथे त्याने आपले पहिले एकदिवसीय शतक साजरे केले. सन २००३-२००४ चा ऑस्ट्रेलिया दौरा त्याच्यासाठी लाभदायी ठरला. कसोटी मालिकेत दोन आणि एकदिवसीय मालिकेत तीन अशी पाच शतके त्याने त्या दौऱ्यात केली. सिडनी कसोटीत भारताने मिळवलेल्या, ऐतिहासिक विजयात लक्ष्मणचे महत्त्वपूर्ण योगदान होते. याच मालिकेदरम्यान, इयान चॅपल यांनी लक्ष्मणला ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ हे टोपणनाव दिले.
कारकीर्दीतील बॅडपॅच
लक्ष्मणचा फॉर्म पाहता, दक्षिण आफ्रिकेत आयोजित २००३ क्रिकेट विश्वचषकासाठी तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून, त्याची जागा भारतीय संघात नक्की समजली जात होती. मात्र, त्याला यावेळी नाराज व्हावे लागले. त्याच्या जागी दिनेश मोंगियाची निवड केली गेली. २००४-२००५ या काळात लक्ष्मण आपल्या कारकीर्दीतील बॅडपॅचमधून गेला. पाकिस्तान व ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो सपशेल अपयशी ठरला. त्याला फक्त झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी एक शतक करता आले. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत शून्यावर बाद झाल्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले.
कारकिर्दीचा तिसरा आणि निर्णायक टप्पा
लक्ष्मणने २००६ च्या मध्यात वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावून आपण फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जोहान्सबर्ग कसोटीत लक्ष्मणने ७३ धावांची संघर्षपूर्ण खेळी करून भारताला १२३ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. पाकिस्तानविरुद्धच्या घरच्या मैदानावर झालेल्या सलग दोन कसोटी त्यांनी शतके झळकावली. या खेळ्यांमुळे, त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात जागा मिळाली. या दौऱ्यात, आपल्या आवडत्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवर त्याने पुन्हा एकदा शतक ठोकले. पर्थ कसोटी जिंकण्यात देखील लक्ष्मणचा मोलाचा हातभार होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर श्रीलंका दौ-यात त्याला काहीश्या अडचणींचा सामना करावा लागला. अजंता मेंडिसने त्याला सलग पाच डावात आपले शिकार बनवले. मुथय्या मुरलीधरनसमोर देखील तो चाचपडताना दिसला. ऑस्ट्रेलियन संघ २००८ मध्ये भारतात बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळण्यासाठी आला असताना, त्याने दिल्ली कसोटीत द्विशतकी खेळी केली. गौतम गंभीरच्या ‘मॅरेथॉन’ खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या, नेपियर कसोटीत लक्ष्मणनेदेखील नाबाद शतकी खेळी केली होती. दक्षिण आफ्रिका व श्रीलंकेला त्यानंतर लक्ष्मणने पुन्हा शतकी तडाखा दिला.
‘ती’ संघर्षमय खेळी
ऑक्टोबर २०१०, त्याने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा फडशा पाडला. मालिकेतील पहिल्या, मोहाली कसोटीत ऑस्ट्रेलियन संघ विजयाकडे सहजरीत्या आगेकूच करत होता. ऑस्ट्रेलियाचा विजय आणि भारताच्या पराभवात लक्ष्मण पहाडासारखा घेऊन उभा राहिला. लक्ष्मण पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता. त्यामुळे सुरेश रैना त्याचा रनर म्हणून मैदानात आला. २१६ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ १२४-८ अशा अडचणीत आलेला. लक्ष्मणने वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या साथीने नवव्या गड्यासाठी ८१ धावांची अमूल्य भागीदारी केली. भारताचा अखेरचा फलंदाज प्रज्ञान ओझाने लक्ष्मणला साथ देत भारताला विजय मिळवून दिला. शेवटपर्यंत टिकून राहिला. लक्ष्मणने या डावात नाबाद ७३ धावा केल्या. भारताला विजय मिळाला असला तरी; लक्ष्मणला दुखापतीमुळे मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडावे लागले.
लक्ष्मणने २०१०-२०११ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर डर्बन कसोटीत डेल स्टेन, मॉर्नी मॉर्कल यांच्या वेगवान माऱ्याला तोंड देत, ३८ धावांची खेळी केली होती. त्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ३०३ धावांचे आव्हान ठेवले. दक्षिण आफ्रिकेला हे आव्हान पेलवले नाही आणि त्यांचा संघ २१५ धावांवर बाद झाला. या सामन्यात सामनावीर म्हणून लक्ष्मणला निवडले गेले. २०११ च्या वेस्टइंडीज दौ-यात देखील त्याने संमिश्र कामगिरी केली.
खराब कामगिरी आणि निवृत्ती
भारतीय संघाने २०११ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर चार आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार असे आठ कसोटी सामने खेळले. भारताला या सर्व सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागले. लक्ष्मणची वैयक्तिक कामगिरी देखील अत्यंत निराशाजनक राहिली. तो या आठ कसोटीच्या १६ डावात फक्त ४ अर्धशतके करू शकला. भारतीय संघाच्या गचाळ कामगिरीसाठी, वरिष्ठ खेळाडूंना लक्ष केले गेले. याच उद्वीग्नेतून लक्ष्मणने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्यावेळी, लक्ष्मणची निवड न्यूझीलंड दौऱ्यासाठी झाली होती. मात्र, आपण यापुढे भारतीय संघासाठी खेळणार नसल्याचे त्याने जाहीर केले. लक्ष्मणसोबत राहुल द्रविडदेखील त्याच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. १०० पेक्षा जास्त कसोटी खेळूनही लक्ष्मणला एकदाही एकदिवसीय विश्वचषक मात्र खेळता आला नाही. शंभर कसोटी सामने खेळून, विश्वचषक न खेळलेल्या काही मोजक्या खेळाडूंत त्याचा समावेश होतो.
ऑस्ट्रेलियावर गाजवले वर्चस्व
लक्ष्मणने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीदरम्यान ऑस्ट्रेलियन संघावर एकहाती वर्चस्व गाजवले. त्याच्या १७ कसोटी शतकांपैकी ६ तर; ६ एकदिवसीय शतकांपैकी ४ शतके ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध आली आहेत. इडन गार्डन्सवरील २८१ धावांची सर्वाच्च खेळीदेखील त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध केली. ऑस्ट्रेलियाचे सर्व गोलंदाज आजही, जाहीररित्या मान्य करतात की, लक्ष्मणइतका त्रास त्यांना जगातील कोणत्याही फलंदाजाने दिला नाही. त्याला बाद करण्यासाठी आम्हाला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत.
आयपीएल आणि निवृत्तीनंतरचा काळ
लक्ष्मणने आयपीएलमध्ये पहिली तीन वर्ष डेक्कन चार्जर्स या संघाचे प्रतिनिधित्व केले. आयपीएलच्या पहिल्या हंगामात तो डेक्कन चार्जर्सचा कर्णधार होता. त्यानंतर तो एक वर्ष कोची टस्कर्स केरला या संघात खेळला. सन २०१३ पासून तो सातत्याने सनरायझर्स हैदराबाद संघाचा सल्लागार म्हणून कार्यरत आहे. यासोबतच, बीसीसीआयच्या सल्लागार समितीचा सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीसोबत तो तिसरा सदस्य आहे. प्रशिक्षणासोबतच लक्ष्मण आपल्या हिंदी समालोचनासाठी देखील चांगलाच प्रसिद्ध आहे. भारतीय संघाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांवेळी तो नियमितपणे समालोचन कक्षात दिसतो.
पद्मश्री व्हीव्हीएस लक्ष्मण
लक्ष्मणला २००१ यावर्षी भारत सरकारकडून अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मश्री पुरस्काराने त्याला २०११ मध्ये गौरविण्यात आले.
आपल्या मनगटी कौशल्ययुक्त फलंदाजीने जगभरातील गोलंदाजांची शिकवण घेणारा लक्ष्मण, ऑस्ट्रेलियाला एकटाच नडणारा लक्ष्मण आणि संघ अडचणीत असताना संघाला सावरणारा संकटमोचक लक्ष्मण या खूब्यांमुळे तो, क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात कायम स्थान करून राहील यात शंका नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
भारताचा ‘तो’ एक दौरा केला नसता तर क्रिकेटला ‘हेडन’ मिळाला नसता…
अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला