भारतीय उपखंडात क्रिकेट इतका दुसरा कोणताही खेळ प्रसिद्ध नाही. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांनी वेगवेगळ्या काळात क्रिकेटवर अक्षरशः राज्य केले. या तिन्ही देशातील क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळाच मानसन्मान मिळतो. मात्र, 21 व्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय उपखंडातील आणखी एका देशाने क्रिकेटमध्ये आपले हातपाय मारण्यास सुरुवात केली. नियमितपणे नाही पण, ठराविक अंतरात ते एखाद-दुसऱ्या बड्या संघाला चितपट करत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बेभरवशी म्हणून ज्या संघाला सर्वप्रथम उपाधी मिळाली तो देश म्हणजे बांगलादेश. परंतू पुढे मिळालेले चांगले खेळाडू व सातत्य यामुळे हा एक भक्कम संघ होत गेला. बांगलादेश क्रिकेट संघाकडे सध्या जगातील सर्व संघांना पाणी पाजण्याचा दम आहे. हा दम ज्या काही मोजक्या खेळाडूंमुळे या संघात आला आहे त्यापैकी एक खेळाडू म्हणजे शाकिब अल हसन.
हॉकी आणि कबड्डीनंतर बांगलादेशमध्ये क्रिकेट खेळणारी एक नवी पिढी उदयाला येत होती. मैदाने क्रिकेटपटूंनी भरायची. रबरी अथवा टेप बॉलने क्रिकेट खेळले जायचे. अशाच टेप बॉलने मगुरा या गावात शाकिब क्रिकेट खेळत. असे म्हणतात की, शाकिब 14-15 वर्षाचा असताना विविध संघ त्याला आपल्या संघात खेळण्यासाठी पैसे देत. आपल्या धोनीसारखं. अगदी कमी वयात त्याच्याकडे अफाट प्रतिभा होती. शेजारपाजारच्या गावातील मुलेदेखील त्याला आपल्या संघात सामील करून घेण्यास उत्सुक असायची.
अशाच एका स्पर्धेवेळी एका पंचांची नजर त्याच्यावर पडली आणि त्यांनी त्याला क्रिकेटचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेण्याविषयी सांगितले. त्याच पंचांनी त्याचा एका क्लबमध्ये दाखला करून दिला. आक्रमक फटकेबाजी आणि वेगवान गोलंदाजी करणाऱ्या शाकिबने नंतरच्या काळात फिरकी गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. एका स्थानिक स्पर्धेत त्याने इस्लामपूर पॅरा क्लबसाठी खेळताना पहिल्या चेंडूवर बळी मिळवला. विशेष म्हणजे कोणत्याही सामन्यात त्याने लेदर बॉलने टाकलेला तो पहिलाच चेंडू होता. सहा महिने क्रिकेटचे प्रशिक्षण घेतल्यानंतर तो बांगलादेशच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघात जागा मिळवण्यात यशस्वी ठरला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
एकोणीस वर्षाखालील संघात दमदार कामगिरी केल्यानंतर, वयाच्या १९ व्या वर्षी त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली. 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर बांगलादेश क्रिकेटमधील अशी एकही गोष्ट राहिली नाही, ज्यामध्ये शाकिबचा सहभाग नव्हता. भारतीय संघाला 2007 विश्वचषक सामन्यात पराभूत करणाऱ्या बांगलादेश संघाचा तो भाग होता. 2009 मध्ये वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी तो राष्ट्रीय संघाचा कर्णधार बनलेला. खरा अष्टपैलू कसा असतो याची प्रचिती जॅक कॅलिसनंतर शाकिबने दिली. 2015 मध्ये तो कसोटी, वनडे व टी20 अशा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानी होता. अशी कामगिरी करणारा तो अजूनही एकटाच क्रिकेटपटू आहे.
आयपीएलचा मोठा खेळाडू
आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात त्याने सर्वप्रथम आयपीएल लिलावात नाव नोंदवले होते. दुर्दैवाने त्या वेळी त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. 2011 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यावर बोली लावली. त्या हंगामात त्याला पुरेशा संध्या मिळाल्या नाहीत. मात्र, 2012 व 2014 अशा दोन्ही वेळी केकेआरने उंचावलेल्या आयपीएलचे चषकात त्याचे मोलाचे योगदान होते. 2018 आयपीएलवेळी केकेआरने करारमुक्त केल्यानंतर त्याला सनरायझर्स हैदराबादने खरेदी केले. त्या संघासाठी देखील त्याने तितक्याच इमानदारीने प्रयत्न केले आणि संघाला अंतिम फेरीपर्यंत मजल मारून दिली. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मात्र तो दिसला नाही, लिलावात त्याला कोणत्याही संघाने पसंती दाखवलेली नाही. आयपीएळ 2023 मध्ये शाकिब केकेआरसाठी खेळताना दिसेल.
2019 विश्वचषकाचा नायक
आपल्या मोठ्या कारकिर्दीत दिग्गज म्हणून शाकिबने नाव कमावले होते. मात्र आपल्या कारकिर्दीवर कळस चढवण्याचे काम त्याने 2019 क्रिकेट विश्वचषकात केले. या विश्वचषकात बांगलादेश संघाची कामगिरी राहिली असली तरी, शाकिबने आपल्या नावारूपाला साजेसा खेळ दाखवला. या विश्वचषकात त्याने 8 सामने खेळताना 2 शतके व तब्बल 5 अर्धशतकांसह 606 धावा ठोकल्या. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसर्या स्थानी राहिला. सोबत 11 बळी त्याच्या खात्यावर जमा होते.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शाकिब अल हसनला खूप गर्व असल्याचे सांगत 2014 साली 6 महिन्यांची बंदी टाकली होती. अशी कारवाई होणारा कदाचीत तो जगातील पहिलाच क्रिकेटपटू असेल. त्याचे संघाच्या प्रशिक्षकांबरोबरही अनेक वेळा वाद झाले. कॅरेबियन प्रीमीयर लीगमध्ये खेळू न दिल्याने शाकिबने एकदा निवृत्तीची धमकी बांगलादेश क्रिकेट बोर्डाला दिली होती.
बुकींची माहिती भ्रष्टाचार विरोधी पथकापासून लपवल्यामुळे त्याच्यावर दोन वर्षं निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुनरागमन करताना त्याने पहिल्या मालिकेत मालिकावीर पुरस्कार आपल्या नावे केला. मोयना या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला शाकिब बांगलादेश क्रिकेटचा आजवरचा सर्वात मोठा क्रिकेटपटू आहे. उर्वरित कारकिर्दीत तो बांगलादेश क्रिकेटला असेच योगदान देत राहील, याची खात्री सर्वांना आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंड क्रिकेटचे वार्षिक पुरस्कार जाहीर! एमेलिया- मिचेल ठरले सर्वोत्तम, पाहा संपूर्ण यादी
आयपीएल 2023 मध्ये धोनी दिसणार नवीन भूमिकेत! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल