वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या महाकुंभमेळ्यातील 14वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जाणार आहे. हा सामना लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तत्पूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक प्रभारी कर्णधार कुसल मेंडिस याने जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला.
श्रीलंका संघाचा नियमित कर्णधार दसून शनाका (Dasun Shanaka) दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला आहे. अशात त्याच्या जागी संघाचे नेतृत्व कुसल मेंडिस (Kusal Mendis) याच्याकडे आले आहे. या सामन्यात श्रीलंकेने दोन बदल केले आहेत. शनाका आणि मथीशा पथिराना सामन्यात खेळत नाहीयेत. त्यांच्या जागी चमिका करुणारत्ने आणि लाहिरू कुमारा यांचा समावेश केला आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघात कोणताही बदल नाहीये.
स्पर्धेतील कामगिरी
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका (AUS vs SL) संघांची विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरी पाहायची झाली, तर दोन्ही संघ एकाच होडीत आहेत. म्हणजेच दोन्ही संघांनी स्पर्धेत 2 सामने खेळले आहेत. त्यात दोघांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. मात्र, नेट रनरेटमध्ये मोठे अंतर आहे. श्रीलंका संघ आठव्या स्थानी असून त्यांचा नेट रनरेट -1.161 आहे, तर ऑस्ट्रेलिया दहाव्या स्थानी असून त्यांचा नेट रनरेट -1.846 इतका आहे.
ऑस्ट्रेलिया संघ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताविरुद्ध 6 विकेट्सने पराभूत झाला होता. तसेच, दुसऱ्या सामन्यातही त्यांना बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाने तब्बल 134 धावांनी पराभवाचा धक्का दिला होता. तसेच, श्रीलंकेविषयी बोलायचं झालं, तर त्यांनाही पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने तब्बल 102 धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांना पाकिस्तानने 6 विकेट्सने नमवले होते. अशात दोन्ही संघ विश्वचषकातील पहिल्या विजयाचं खातं उघडण्यासाठी प्रयत्नशील असतील.
विश्वचषकातील आमने-सामने कामगिरी
उभय संघांची विश्वचषकातील आमने-सामने कामगिरी पाहायची झाली, तर दोन्ही संघ 10 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यावेळी 8 सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी ठरला आहे, तर 1 सामना श्रीलंकेने जिंकला आहे. तसेच, 1 सामना अनिर्णित राहिला होता. (Sri Lanka opt to bat against australia )
विश्वचषकाच्या 14व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया
डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेझलवूड, ऍडम झम्पा
श्रीलंका
पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, महेश थीक्षणा, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका
हेही वाचा-
विराटकडून जर्सीवर ऑटोग्राफ घेताच बाबरवर संतापला वसीम अक्रम; म्हणाला, ‘कॅमेऱ्यापुढे असे करण्याची…’
अरे…आवरा! बाबरची विकेट पडताच चाहत्याने बॉटल मारून फोडली टीव्ही? नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया एकदा वाचाच