भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना आज (18 जुलै) आपला 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या काही वर्षांपासून स्मृती भारतीय संघातील प्रमुख खेळाडू बनली आहे. या आठवड्यात इंग्लंडविरुद्ध टी20 मध्ये तिने अर्धशतक झळकावले होते. स्मृतीने 51 चेंडूत 70 धावा केल्या होत्या. परदेशात टी20 मध्ये हे स्मृतीचे सातवे अर्धशतक होते. कोणत्याही भारतीय महिला क्रिकेटपटूने इतक्या वेळा परदेशात 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा अजूनही केलेल्या नाहीत.
स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिचा महाराष्ट्रापासून ते भारतीय संघापर्यंतचा प्रवास मनोरंजक राहिला आहे. वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी स्मृतीने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. दोन वर्षांनंतर महाराष्ट्र 19 वर्षाखालील संघात तिची निवड झाली. चार वर्षांनंतर या स्मृतीने उत्कृष्ट कामगिरी करत वरिष्ठ संघात स्थान मिळवले होते. वयाच्या 17 व्या वर्षी स्मृतीने एकदिवसीय स्वरूपातील क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. ऑक्टोबर 2013 मध्ये 19 वर्षांखालील संघातून वेस्ट झोन स्पर्धेत स्मृतीने हा डाव खेळला होता. तिने 150 चेंडूत नाबाद 224 धावा केल्या होत्या. तिने हे दुहेरी शतक 32 चौकाराच्या साहाय्याने झळकावले होते.
द्रविडच्या बॅटने केले द्विशतक –
स्मृतीने ज्या बॅटने दुहेरी शतक ठोकले होते, ती बॅट भारतीय संघाचे माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची होती. गौरव कपूरच्या कार्यक्रम ‘ब्रेकफास्ट विथ चँपियन्स’मध्ये स्वतः स्मृतीने याचा खुलासा केला होता. खरतर द्रविड यांनी आपली स्वाक्षरी केलेली बॅट स्मृतीचा भाऊ श्रावणला दिली होती. पण ती बॅट शेवटी स्मृतीला मिळाली आणि तिने त्या बॅठने ऐतिहासिक कामगिरी करत द्विशतक झळकावले होते.
या कार्यक्रमादरम्यान स्मृतीने बॅट मिळण्याची संपूर्ण कहाणी सांगितली होती. ती म्हणाली होती की, “माझा भाऊ श्रावणने माझ्यासाठी द्रविड सरांना त्यांची स्वाक्षरी असलेली बॅट मागितली होती. द्रविड सरांनी मनाचा मोठेपणा दाखवत बॅटही दिली. मला ही बॅट सांभाळून ठेवायची होती. पण ही बॅट हातामध्ये घेताच त्याचा बॅलेन्स पाहून मला खरच खूप आश्चर्य वाटले. या बॅटचे वजन आणि संतुलन आश्चर्यकारक होते. त्यानंतर मी त्या बॅटने खेळायला सुरुवात केली. एकदिवसीय क्रिकेट स्वरूपात मी पहिले द्विशतक झळकावले ते मी राहुल सरांची स्वाक्षरी असलेल्या बॅटनीच झळकावले होते.”
स्मृतीची कारकीर्द –
स्मृतीने आतापर्यंत भारतीय संघासाठी 78 एकदिवसीय सामने तर 119 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत आतापर्यंत 4 सामने खेळण्याचा योग तिला आला आहे. स्मृतीने 2017 मधील एकदिवसीय विश्वचषक आणि 2020 मधील टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संघाला पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या टी20 बिग बैश लीगमध्ये स्मृतीने सहभाग घेतला होता. इंग्लंडमध्ये होणार्या द हंड्रेडसाठीही स्मृतीची निवड झाली आहे.
तिने 78 एकदिवसीय सामन्यात 42.83 च्या सरासरीने 3084 धावा केल्या आहेत. तिने यामध्ये एकूण 5 शतके आणि 25 अर्धशतके झळकावली आहेत. भारताकडून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत स्मृतीचा पहिल्या 5 फलंदाजांमध्ये समावेश आहे. त्याचबरोबर तिने 119 टी20 सामन्यांमध्ये 27.44 च्या सरासरीने 2311 धावा केल्या आहेत. तसेच चार कसोटी सामन्यांमध्ये 46.42च्या सरासरीने 325 धावा साकारल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडीजसाठी युवा स्पिनर करणार कसोटी पदार्पण! दुसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा
एशियन ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीयांनी केली पदकांची लयलूट! एशियन गेम्स-ऑलिम्पिकसाठी उंचावल्या अपेक्षा