संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे सुरु असलेल्या टी२० विश्वचषकात गुरुवारी (४ नोव्हेंबर) पहिल्या सामन्यात अ गटातील ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे संघ आमने-सामने आले. दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा मोठा पराभव केला. ऑस्ट्रेलिया संघाने या विजयासह उपांत्य फेरीत जाण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने एक नवा विक्रम आपल्या नावे जमा केला.
स्टार्कने पुन्हा ओकली आग
ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क गोलंदाजांना काहीशा मदतगार खेळपट्टीवर अक्षरशः आग ओकत होता. त्याने आपल्या पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बांगलादेशचा सलामीवीर लिटन दास याला शून्यावर त्रिफळाचीत केले. दास याचा हा पहिलाच चेंडू होता. स्टार्क याने यासह आयसीसी स्पर्धांमध्ये चौदाव्यांदा कोणत्याही फलंदाजाला शून्यावर त्रिफळाचीत केले. अशा प्रकारच्या विक्रमात त्याच्या आसपासही कोणता गोलंदाज नाही. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा व पाकिस्तानचा वसीम अक्रम हे आहेत. या दोघांनीही प्रत्येकी ९ वेळा फलंदाजांना शून्यावर बाद करताना त्रिफळा उडवला होता.
ऑस्ट्रेलियाचा शानदार विजय
उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा सामना जिंकण्याचे लक्ष्य ऑस्ट्रेलियन संघासमोर होते. स्पर्धेतून यापूर्वीच बाहेर झालेल्या बांगलादेश संघाने या सामन्यात देखील आपली गचाळ कामगिरी सुरू ठेवली. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे सपशेल लोटांगण घालत केवळ ७३ धावा धावफलकावर लावल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाला कर्णधार ऍरॉन फिंच व डेव्हिड वॉर्नर यांनी संघाला वेगवान सलामी दिली. फिंचच्या २० चेंडूतील ४०, वॉर्नरच्या १८ व मिचेल मार्शच्या ५ चेंडूतील १६ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हे आव्हान ६.२ षटकात पूर्ण केले. पाच बळी मिळवणाऱ्या ऍडम झंपाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
हिंदी बोलायला नकार दिलेला ईश सोधी जेव्हा पंजाबी मधे करतो कॉमेंट्री, व्हिडिओ व्हायरल
पाकिस्तानला पोटशूळ! म्हणे भारत-अफगाणिस्तान सामना फिक्स; भारतीय चाहत्यांनी केली तोंडे बंद
‘वेल ‘पेड’ इंडिया!’ भारत-अफगानिस्तान सामन्यानंतर ‘फिक्समॅच’ हॅशटॅग होतोय ट्रेंड






