भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्यांची ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दोन्ही तुल्यबळ संघ असल्याने मालिका चुरशीची होऊ शकते. सध्या या मालिकेची जोरदार तयारी दोन्ही संघ करत आहेत. त्याचवेळी, ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्त्व पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथने करावे, अशी मागणी केली जात आहे. त्यासंबंधी, आता स्वतः स्मिथने प्रतिक्रिया दिली आहे.
स्मिथने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व करावे, अशी मागणी होत आहे
ऑस्ट्रेलियाचे अनेक माजी खेळाडू स्टीव्ह स्मिथला पुन्हा राष्ट्रीय संघाचा कर्णधार करावे, असे म्हणत आहेत. भारताविरुद्धच्या टी२० मालिकेवेळी यष्टीरक्षक मॅथ्यू वेडनेदेखील याबाबत वक्तव्य केले होते.
याबाबत स्मिथला विचारले असता तो म्हणाला, “हो, मीदेखील ही चर्चा ऐकली आहे. प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांनी म्हटल्याप्रमाणे, ही एक प्रक्रिया आहे आणि मला त्या प्रक्रियेतून जावे लागेल. संघ देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास मी कायमच सज्ज असतो. आता मी ज्या ठिकाणी आहे ती जागादेखील योग्य आहे. मात्र, संघाच्या चांगल्यासाठी केले जाईल ते सर्व करण्याचा मी प्रयत्न करेल.”
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केला आहे भविष्याचा विचार
सध्या ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे कर्णधारपद ३६ वर्षीय टीम पेन, तर मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद ऍरॉन फिंच सांभाळत आहे. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दोन्ही संघांचा उपकर्णधार असतो. क्रिकेट ऑस्ट्रेलिया भविष्यातील कर्णधार म्हणून मार्नस लॅब्यूशाने व ट्रॅविस हेड यांच्याकडे पाहत आहे. नुकत्याच संपलेल्या टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने ऍरॉन फिंचच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व केले होते.
चेंडू छेडछाड प्रकरणानंतर काढून घेतले होते स्मिथचे कर्णधारपद
सन २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातील चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळल्यानंतर स्मिथची कर्णधार पदावरून हकालपट्टी करत त्याला एक वर्षासाठी निलंबित केले होते. तसेच, दोन वर्षासाठी तो ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व करू शकणार नव्हता. आता मात्र, स्मिथ ऑस्ट्रेलियाचे पुन्हा नेतृत्त्व करण्यास पात्र आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात ‘या’ खेळाडूने करावे भारतीय संघाचे नेतृत्त्व; पार्थिव पटेलने मांडले मत
तब्बल १० खेळाडू कसोटी मालिकेपूर्वी परतणार भारतात, पाहा संपूर्ण यादी
ट्रेंडिंग लेख-
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ
अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’
अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेल खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात