लाहोर। ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचा तिसरा सामना गद्दाफी स्टेडियम, लाहोर येथे सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्याच डावात ऑस्ट्रेलिटचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथने एक मोठा विक्रम केला आहे.
स्मिथच्या नावावर मोठा विक्रम
या सामन्यात (Pakistan vs Australia) ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या सामन्याचा पहिला डाव हा स्टीव्ह स्मिथच्या (Steve Smith) कसोटी कारकिर्दीतील १५० वा डाव ठरला. त्यानेही या डावात चांगली फलंदाजी करताना १६९ चेंडूत ६ चौकारांसह ५९ धावांची खेळी केली.
या खेळीमुळे तो पहिल्या १५० कसोटी डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याच्या पहिल्या १५० डावात ६०.०९ च्या सरासरी ७९९३ धावा झाल्या आहेत. त्याने हा विक्रम करताना कुमार संगकाराला मागे टाकले आहे. संगकाराने त्याच्या पहिल्या १५० कसोटी डावात ७९१३ धावा केल्या होत्या (Most Test runs in the first 150 innings).
विशेष म्हणजे स्मिथने या डावात आणखी ८ धावा केल्या असत्या, तर त्याने कसोटी कारकिर्दीत ८००० धावांचा टप्पाही पूर्ण केला असता. तसेच तो पहिल्या १५० कसोटी डावात ८००० धावा पूर्ण करणारा पहिला क्रिकेटपटूही बनू शकला असता.
पहिल्या १५० कसोटी डावात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
७९९३ धावा – स्टीव्ह स्मिथ
७९१३ धावा – कुमार संगकारा
७८६९ धावा – सचिन तेंडुलकर
७६९४ धावा – विरेंद्र सेहवाग
७६८० धावा – राहुल द्रविड
७६२६ धावा – गॅरी सोबर्स
सचिनला स्मिथने टाकले मागे
स्मिथचे लाहोर कसोटीतील पहिल्या डावातील अर्धशतक हे त्याच्या कारकिर्दीतील ३६ वे अर्धशतक होते, तर त्याने २७ शतकेही केली आहेत. त्यामुळे कसोटीत ५० धावांचा टप्पा पार करण्याची स्मिथने ही ६३ वी वेळ ठरली. त्यामुळे त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिल्या १५० डावांमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा कारनामा केला आहे. त्याने हा कारनामा करताना सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.
सचिनने (Sachin Tendulkar) त्याच्या पहिल्या १५० कसोटी डावांमध्ये ६० वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली होती. या यादीत सुनील गावसकर (५९) तिसऱ्या आणि जो रुट (५८) चौथ्या क्रमांकावर आहेत.
कसोटीत पहिल्या १५० डावांत ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारे क्रिकेटपटू
६३ वेळा – स्टिव्ह स्मिथ
६० वेळा – सचिन तेंडुलकर
५९ वेळा – सुनील गावसकर
५८ वेळा – जो रुट
महत्त्वाच्या बातम्या –
INDW vs BANW | ‘करा अथवा मरा’ लढतीसाठी उतरणार टीम इंडिया, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही
पंजाब किंग्जमधून वेगळे होण्याच्या निर्णयावर केएल राहुलचे स्पष्टीकरण, संघ सोडण्यामागचे सांगितले कारण
प्रशिक्षक मलिंगाने दाखवला धाकड फॉर्म, नेट्समध्ये यॉर्करने उडवली दांडी; Video होतोय व्हायरल