भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर कसोटी मालिका सध्या खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये यजमान भारताने ऑस्ट्रेलियाला मात दिली आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. सलग दोन सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने वैयक्तिक कारण देत मायदेशात जाण्याचा निर्णय घेतला. कमिन्स तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतात परतणार नसल्यामुळे इंदोरच्या होळकर स्टेडियममध्ये स्टीव्ह स्मिथ पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
मागच्या वर्षी टिम पेन (Tim Paine) याला ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधारपदावर हटवण्यात आल्यानंतर पॅट कमिन्स (Pat Cummins) संघाचा नवीन कर्णधार बनला. त्याने दरम्यानच्या काळात वैयक्तिक आणि संघाच्या कर्णधाराच्या रूपात चांगली कामगिरी केली. पण वर्षाच्या पहिल्या भारत दौऱ्यात मात्र कमिन्सच्याच नेतृत्वातील ऑसट्रेलियन संघाने शरणागती पत्करल्याचे दिसले. यावर्षीच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. दुसरा सामना दिल्लीत खेळला गेला असून ऑस्ट्रेलियाला या सामन्यात 6 विकेट्सने हार पत्करावी लागली.
सलग दोन पराभवांनंतर संघाची लाज राखण्यासाठी पुढच्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाला चांगली कामगिरी करणे भाग आहे. पण त्यापूर्वीच कमिन्सच्या रूपात संघाला धक्का बसला. कमिन्स त्याच्या आईची तब्येत बिघडल्यामुळे मायदेशात परतला आहे. इंदोरमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसर्या कसोटीपूर्वी तो संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. पण “मी सध्या भारतात न परतण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती कमिन्सकडून मिळाल्यानंतर संघाला आगामी सामन्यासाठी नवीन कर्णधाराची आवश्यकता होती. अशात स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) ही जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. स्टीव स्मित मोठ्या काळानंतर भारतात कर्णधाराच्या रूपात खेळताना दिसेल.
स्मिथला ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करण्याचा मोठा अनुभव आहे. त्याने 2014 ते 2018 दरम्यान संघाच्या नियमित कर्णधाराची भूमिरा पार पाडली. यादरम्यान एकूण 34 कसोटी सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केल, तर मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध एक आणि 2021 मधील ऍशेस मालिकेती एका सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. अशात त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या एकूण कसोटी सामन्यांची संख्या 36 आहे. यापैकी 20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय, तर 10 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला आहे. राहिलेले 6 सामने अनिर्णित झाले आहेत.
दुसरीकडे कमिन्सने ऑस्ट्रेलियाचे कसोटी कर्णधारपद स्वीकारल्यानंतर आतापर्यंत 15 कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे. यापैकी 8 सामने ऑस्ट्रेलियान जिंकले, तर 3 सामने गमावले आहेत. राहिलेले चार सामने अनिर्णित होते. तिसऱ्या कसोटीतून माघार घेणारा कमिन्स चौथ्या कसोटीत खेळणार की नाही, याविषयी देखील अद्याप कुठली ठोस माहिती मिळाली नाहीये. (Steve Smith will lead Australia in the third Test of the Border Gavaskar Trophy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पराभवाचं दु:ख पचवू शकली नाही हरमनप्रीत, दिग्गज खेळाडूच्या गळ्यात पडून रडली ढसाढसा; तुम्हीही व्हाल भावूक
जर्सी नंबरपासून ते रनआऊटपर्यंत धोनी अन् हरमनमध्ये आहे बरेच साम्य, करिअरबाबतही तसंच होणार का?