त्याने कसोटी पदार्पण करण्याआधीच व्हीव्हीएस लक्ष्मणला सांगितले होते तू २००१ ला कोलकाता कसोटीमध्ये त्रिशतक करण्याची संधी गमावली, पण मी अशी संधी गमावणार नाही. मी कसोटीत त्रिशतक करणारच. त्याने केलेली ही भविष्यवाणी पुढच्या तीन वर्षांत पूर्ण करुन दाखवली. तो भारताकडून कसोटीत त्रिशतक करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला. तो क्रिकेटपटू अर्थातच नजफगढचा नवाब म्हणून ओळखला जाणारा विरेंद्र सेहवाग.
कायम आपल्याच धूंदीत असणारा आलेला चेंडू फक्त लांब टोलवायचा हे माहित असलेल्या वीरुचा जन्म २० ऑक्टोबर १९७८ ला झाला. त्याचा जन्म धान्य व्यापार करणाऱ्या कुटुंबात झाला होता. त्यावेळी त्याच्या वडिलांना वीरुने मोठे होऊन आपला हाच व्यावसाय पुढे चालवावा असे वाटत होते. पण क्रिकेटची आवड असलेल्या वीरुला हे काही मान्य नव्हते. त्याने त्याच्या आईच्या मदतीने क्रिकेट खेळणे सुरुच ठेवले. वडीलांनी किटबॅग पाहू नये म्हणून तो घराच्या गच्चीवर किटबॅग लपवून ठेवायचा. पण त्याच्या वडीलांना त्यांच्या मागे वीरुच्या या चाललेल्या करामतींची जाणीव होती. पण त्यांनी त्याला नंतर त्याबद्दल रोखलं नाही.
वीरुने १९९७-९८ च्या मोसमात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दिल्ली संघाकडून पदार्पण केले. त्याने हरियाणा विरुद्ध रणजी ट्रॉफीतील त्याचा पहिला डाव खेळताना खणखणीत ११८ धावांची शतकी खेळी केली होती. तीही त्याने ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत.
त्याच्या पुढच्याच मोसमात त्याला दुलीप ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाकडून खेळण्याची संधी मिळाली. या मोसमात तो दुलीप ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचव्या क्रमांकाचा फलंदाज ठरला. त्यानंतर त्याला एप्रिल १९९९ मध्ये भारताकडून पाकिस्तानविरुद्ध मोहालीला झालेल्या वनडे सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. पण त्या सामन्यात तो १ धावेवर शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यात भर म्हणजे त्याने गोलंदाजी करताना ३ षटकात ३५ धावा दिल्या. त्यामुळे अखेर नंतर त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले. यानंतर वीरुला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी तब्बल २० महिने वाट पहावी लागली. या काळात त्याने देशांतर्गत क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. त्याने १९९९-०० च्या मोसमात दुलिप ट्रॉफीमध्ये ६५.६० च्या सरासरीने ३२८ धावा केल्या. यामध्ये त्याच्या २७४ धावांच्या खेळीचाही समावेश आहे. त्यावेळी ही त्या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी होती. त्यानंतर त्याने पंजाबविरुद्धच्या रणजी सामन्यात १७५ चेंडूत १८७ धावांची तुफानी खेळी करताना सर्वांचे लक्ष वेधले. या मधल्या काळात तो १९९८ला १९ वर्षांखीलील विश्वचषकात भारतीय संघाकडूनही खेळला.
सेहवागने एएन शर्मा यांच्याकडून सुरुवातीला क्रिकेटचे धडे गिरवले होते. त्यांनी सेहवागमधील आक्रमक फलंदाजीची गुणवत्ता हेरली होती. त्यामुळे त्यांना त्याच्यातील आक्रमकपणा न बदलता त्यातच त्याला तयार केले.
क्रिकेटचे प्रशिक्षण घेत असतानाचीच एक गोष्ट म्हणजे आशिष नेहरा आणि वीरु जूने मित्र ते दोघेही एकत्र सरावाला जायचे. त्यावेळी वीरु नेहराच्या घरी यायचा आणि मग नेहराच्या स्कूटीवर ते दोघे एकत्र मैदानात जायचे.
देशांतर्गत क्रिकेट गाजवत असताना सेहवागची डिसेंबर २०००मध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली. त्याच्या निवडीमागील एक किस्सा असा की निवड समितीत उत्तर विभागातील मदन लाल निवड समीतीच्या बैठकीत नेहमी सेहवागचे नाव पुढे करायचे पण अन्य सदस्य त्याकडे दुर्लक्ष करायचे. पण एकदा त्यांनी जयवंत लेलेंना विश्वासात घेऊन निवड समिती अध्यक्ष असलेल्या चंदू बोर्डेंना मनवण्यास सांगितले. अखेर लेलेंनी बोर्डेंचे मन वळवले आणि सेहवागची भारतीय संघात निवड झाली.
सेहवागनेही त्यानंतर मागे वळुन पाहिले नाही. तो २००१ च्या मध्यापर्यंत भारताच्या वनडे संघाचा नियमीत सदस्य झाला होता. याच दरम्यान नोव्हेंबर २००१ मध्ये त्याला कसोटीतही पदार्पणाची संधी मिळाली. सुरुवातीला केवळ मर्यादीत षटकांचा खेळाडू म्हणून समजल्या जाणाऱ्या सेहवागचे कसोटी पदार्पण दणक्यात झाले. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण करताना ६ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत १७३ चेंडूत १०५ धावांची शतकी खेळी केली होती. त्यावेळी शॉन पोलाक, जॅक कॅलिस, मखाला एनटीनी, लान्स क्लुसेनर असे आफ्रिकेचे गोलंदाजी आक्रमण होते. विशेष म्हणजे या सामन्यात भारताची आवस्था ४ बाद ६८ धावा अशी असताना सेहवाग फलंदाजीला आला होता.
पुढे गांगुलीने २००२ च्या दरम्यान सेहवागला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सेहवाग सलामीला फलंदाजीसाठी तयार नव्हता, परंतू गांगुलीने त्याला समजावून सलामीला फलंदाजी करायला सांगितली. सेहवागनेही त्याला नाराज न करता सलामीवीर म्हणून खेळताना पहिल्या डावात ८४ आणि दुसऱ्या डावात १०६ धावांची खेळी केली.
पुढे सेहवागने २००४ मध्ये मुलतानमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळताना भारताकडून कसोटीत पहिले त्रिशतक झळकावले आणि लक्ष्मणला दिलेला शब्द पाळला. त्यावेळी त्याने ३०९ धावांची खेळी करताना भारताने पाकिस्तानमध्ये पहिला कसोटी विजय मिळवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. त्यानंतर ४ वर्षांनी २००८मध्ये चन्नईला दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळताना सेहवागने सर्वात जलद कसोटीतील त्रिशतक ठोकलं. त्यावेळी त्याने २७८ चेंडूत त्रिशतक केले होते. तर ३०४ चेंडूत ३१९ धावांची खेळी त्याने त्यावेळी केली होती. आजही सेहवाग कसोटीमध्ये दोनवेळा त्रिशतक करणारा भारताचा एकमेव क्रिकेटपटू आहे. याबरोबर त्याने कसोटीत एका डावात ५ विकेट्स घेण्याचीही कामगिरी केली आहे. त्यामुळे एका डावात ५ विकेट्स, त्रिशतके कसोटी करणारा पहिलाच क्रिकेटपटू आहे.
एवढेच नाही तर सेहवागने २००९मध्ये वनडेत न्यूझीलंडविरुद्ध हेमिल्टन येथे खेळताना ६० चेंडूत शतकी खेळी केली होती. त्यावेळी तो भारताकडून वनडेत सर्वात जलद शतक करणारा फलंदाज ठरला होता. पुढे हा विक्रम विराट कोहलीने २०१३मध्ये ५४ चेंडूत शतक करत मोडला. पण सेहवाग म्हणजे वादळ होता. एकदा त्याला चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात ३८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याआधी सयंमाने खेळ असे सांगण्यात आले होते. कारण त्यावेळी भारताला चौथ्या डावात फलंदाजी करायची होती आणि अजून २ दिवस शिल्लक होते. त्यावेळी सेहवागने गंभीरला सांगितले की तो अप्परकट मारणार नाही. पण इंग्लंडचा कर्णधार पॉल कॉलिंगवूडने त्याक्षेत्रात कोणताच क्षेत्ररक्षक ठेवला नसल्याने सेहवागला मोह आवरला नाही. त्याने अखेर अप्परकटचे शॉट मारायला सुरुवात केली. बघता बघता ६८ चेंडूत ८३ धावा केल्या. त्यावेळी चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत १ बाद ११७ धावा अशा भक्कम स्थितीत होता. त्यानंतर गंभीर, सचिन, युवराज यांनी पुढील आव्हान सहज पार केले.
सेहवागचे आक्रमण काय होते, याचा आणखी एक किस्सा म्हणजे लीसेस्टरशायरकडून मिडलसेक्स संघाविरुद्ध सेहवाग खेळत होता. त्यावेळी तो तळातील फलंदाज जेरेमी स्नेपबरोबर फलंदाजी करत असताना पाकिस्तानी गोलंदाज अब्दुल रझ्झाक गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेले चेंडू रिव्हर्स स्विंग होत होते. त्यामुळे तो आणखी आक्रमक होत होता. त्यामुळे स्नेप सेहवागला म्हणाला की तूला काहीतरी करावे लागेल. हा खूप घातक वाटत आहे. त्यावर सेहवाग त्याला म्हणाला, माझ्याकडे एक योजना आहे आणि पुढच्याच षटकात सेहवागने एवढा जोरात चेंडू फटकावला की चेंडू स्टेडियमबाहेर गेला. त्यामुळे पंचांना दुसरा चेंडू घेऊन यावा लागला. त्यावेळी सेहवाग स्नेपला म्हणाला आता काहीवेळासाठी काळजी नाही.
सेहवाग हा एखादा षटकार मारल्याशिवाय राहुच शकत नव्हता. एकदातर त्याने पाकिस्तानचा कर्णधार इंजमाम उल हकलाच षटकार मारण्यासाठी क्षेत्ररक्षणात बदल करण्यासाठी सांगितले होते. झाले असे की २००५ ला भारत दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तान संघाविरुद्ध बंगळुरुला तिसरा कसोटी सामना सुरु होता. या सामन्यात सेहवागला पाकिस्तानचा गोलंदाज दिनेश कनेरियाने जखडून ठेवले होेते. त्यामुळे त्याला षटकारच मारता येत नव्हता. सेहवागने जवळजवळ १५० धावांपर्यंत मजल मारली होती, पण एकही षटकार मारला नव्हता. त्यावेळी अखेर त्याने त्यावेळीचा पाकिस्तानचा कर्णधार इंजमामला विनंती केली की एका चेंडूसाठी लाँग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला हलवण्याची विनंती केली. त्याच्या अनेक विनवण्यानंतर इंजमामने त्याला सांगितले मी जर खेळाडू हलवला तर तू षटकार मारुन दाखवायचा. सेहवागने हे मान्य केले आणि इंजमामने क्षेत्ररक्षक हलवल्यानंतर पुढच्याच चेंडूवर सेहवागने कनेरियाला षटकार ठोकला आणि १५० धावा पूर्ण केल्या. त्यावेळी लाँग ऑनचा क्षेत्ररक्षक हलवला म्हणून इंजमामवर कनेरिया चिडला होता. पण इंजमामने त्याला परत पाठवले. त्या सामन्यात सेहवागशिवाय अन्य भारतीय खेळाडूंनी मोठ्या खेळी करण्यात अपयश आल्याने सामना पाकिस्तानने पुढे जाऊन जिंकला.
२००६ ला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सेहवागला प्रचंड अपयश आले. परिणामी सेहवाग १ वर्षासाठी भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आले. पण या दरम्यान सेहवाग २००७ चा वनडे आणि टी२० विश्वचषकही खेळला. त्यानंतर त्याची २००७ ला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची भारतीय कसोटी संघात अखेर निवड झाली. त्याने पर्थ कसोटी विजयात महत्त्वाचा वाटा उचलला आणि तो पुन्हा परतल्याची झलक त्याने दिली.
पण २००९ च्या दरम्यान त्याला आयपीएल खेळताना खांद्याची दुखापत झाली. त्यामुळे त्याला टी२० विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, श्रीलंकेतील तिरंगी मालिका अशा मोठ्या स्पर्धांना मुकावे लागले. त्यातच २०११ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघाची संघबांधणी सुरु झाली होती. पण सेहवागने हार मानणारा थोडीच होता. त्याने दुखापतीनंतर पुन्हा दमदार पुनरागमन केले आणि २०११ च्या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात १७५ धावांची खेळी करत त्याने आम्ही विश्वचषकासाठी तयार आहोत हा इशारा सर्वांना दिला.
२०११ च्या अंतिम सामन्यातील एक खास किस्सा आहे. वीरु आणि सचिन त्यावेळी स्वस्तात माघारी परतले होते. भारतासमोर २७५ धावांचे आव्हान होते. त्यामुळे सचिनने देवाचे नाव घ्यायला सुरुवात केली होती. त्यावेळी त्याच्याशेजारी त्याचा शिष्य सेहवाग बसला होता. जसजसा भारत आव्हान पूर्ण करण्याच्या दिशेने जात होता. तसे सचिनने सेहवागला जागेवरुन उठण्यास बंदी घातली. त्याबद्दल सेहवाग सांगतो, जर सचिनच तिथे हात जोडून बसला होता, तर माझी काय बिशाद. मग मीही बसलो त्याच्याबरोबर.
२०११ चे विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर मात्र सेहवागच्या धावांच्या गतीला लगाम लागला. पण असे असले तरी त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी या विश्वचषकानंतरच केली. त्याने ८ डिसेंबर २०११ ला वेस्ट इंडिजविरुद्ध १४९ चेंडूत २१९ धावांची खेळी केली. त्यावेळी तो वनडेत द्विशतक करणारा सचिन तेंडुलकरनंतरचा दुसराच फलंदाज ठरला होता. विशेष म्हणजे धोनीच्या अनुपस्थिती तो त्यावेळी संघाचे नेतृत्वही करत होता.
यांनंतर मात्र सेहवाग जास्त दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला नाही. मार्च २०१३ ला तो शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध हैद्राबाद येथे खेळला. पुढे आयपीएलमध्येही त्याला खरेदी करताना फ्राचायझी पुढे-मागे पाहू लागल्याने अखेर त्याने २० ऑक्टोबर २०१५ ला त्याच्या ३७ व्या वाढदिवसाच्या दिवशी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
सेहवाग एक असा क्रिकेटपटू होता जो कोणाचेही ऐकायचा नाही. आपल्याच धूंदीत तो असायचा. बाद झाला तरी तो कूल ऍटीट्यूडमध्ये येऊन ड्रेसिंगरुममध्ये बसायचा. एकदा तर त्याच्या बाद होण्याच्या पद्धतीमुळे जॉन राईट यांनी त्याची कॉलर पकडून त्याला जाब विचारला होता. नंतर त्यांनी त्याची माफीही मागितली होती. तर एकदा २००६ ला वेस्ट इंडिज दौऱ्यात ग्रेग चॅपेल भारताचे प्रशिक्षक असताना त्यांनी सेहवागने फुटवर्कवर काम करावे असे वाटत होते. त्यामुळे ते त्याला तसा सराव करण्यास सांगितला. पण सेहवागने यासाठी नकार दिला. अखेर त्यांच्यातील वाद इतका वाढला होता की कर्णधार द्रविडने मध्यस्थी केली आणि सेहवागला समजावले. पण अखेर सेहवागने दुसऱ्यादिवशी सामन्यात जे करायचे तेच केले. त्याने कसोटीत १९० चेंडूत १८० धावांची तुफानी खेळी केली. ती खेळी पाहून पुन्हा चॅपेल यांनी सेहवागला पुन्हा काही सांगण्याचा प्रयत्न केला नाही.
गोलंदाजांना झोडपणाऱ्या सेहवागबद्दल एक आणखी किस्सा म्हणजे २०१० ला श्रीलंकेविरुद्ध वनडे सामना खेळत असतानाची ही गोष्ट. त्या सामन्यात भारताला विजयासाठी ५ धावांची गरज होती आणि सेहवाग ९९ धावांवर खेळत होता. तेव्हा सुरज रणदीव गोलंदाजी करत होता. त्यावेळी त्याने टाकलेल्या एका चेंडूवर सेहवागचा फटका चूकला आणि यष्टीरक्षक कुमार संगकारालाही ही हा चेंडू आवडवता आला नाही. त्यामुळे तो चेंडूने बाऊंड्री लाईन पार करुन गेला. त्यामुळे भारताला बाईजच्या ४ धावा मिळाल्या. आता भारताला केवळ १ धावेची गरज होती आणि सेहवागलाही १ धाव हवी होती. पण रणदीवने पुढचा चेंडू नो बॉल टाकला. सेहवागनेही षटकार खेचला. मात्र नो बॉल असल्याने भारत तर जिंकला मात्र सेहवागचे शतक हुकले. याबद्दल सेहवाग प्रचंड चिडला. त्याच म्हणण होत, मुद्दामच नो बॉल टाकण्यात आला. पुढे हे प्रकरण वाढले आणि खरंच तो चेंडू रणदीवला दिलशानने नो बॉल टाकायला सांगितलं असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर आयसीसीकडून कारवाई देखील केली गेली.
वीरु बाद होऊन आला की ड्रेसिंगरुमध्ये येऊन काहीतरी सतत बोलत असायचा म्हणून अनेकदा फलंदाजीला पुढे जाणारे खेळाडू त्याच्याशेजारी बसायचं टाळायचे. एकदातर सेगवागमुळे अनिल कुंबळेचं कसोटीतील दुसरं शतक हुकलं होतं. झालं असं की जानेवारी २००८ ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ऍडलेडला झालेल्या कसोटी सामन्यात कुंबळे त्याच्या दुसऱ्या कसोटी शतकाच्या जवळ होता. मात्र चहापानाची विश्रांती झाल्यानंतर पहिल्या डावात ८६ धावांवर खेळणाऱ्या कुंबळेला सेहवागने आक्रमक खेळण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे सेहवागचे ऐकून आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केलेला कुंबळे ८७ धावांवर बाद झाला होता. त्यामुळे कुंबळे त्याचे दुसरे कसोटी शतक न होण्यासाठी सेहवागला जबाबदार धरतो.
.@anilkumble1074 talks of the hazards of taking @virendersehwag's advice on #KentCricketLive only on Star Sports! pic.twitter.com/AVp2dGZNdo
— Star Sports (@StarSportsIndia) October 2, 2016
सेहवाग असाच होता बेफिकीर. पण त्याच्या फलंदाजीतील बेफिकीरी हीच त्याची ओळख होती. तो कायम तसाच खेळला आणि त्याने तोच ऍटीट्यूड पुढेही कायम ठेवला. आता सेहवाग बऱ्याचदा समालोचन करताना दिसतो. त्याचबरोबर अनेकदा तो ट्विटरच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टींवरही व्यक्त होत असतो. या सगळ्यामध्येही त्याने त्याचा बिंधास्तपणा, त्याचा मनमोकळेपणा स्वभाव सोडलेला दिसत नाही. तो सुटेल असंही वाटतं नाही कारण हीच त्याची ओळख राहिली आहे. तो बिंधास्तपणा त्याने सोडला तरच लोकांना विशेष वाटेल.
याच लेखमालेतील अन्य लेख-
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण