सन 1950 च्या दशकातील मुंबईतील शिवाजी पार्कवर बापू नाडकर्णी, मधुसूदन पाटील, रमाकांत देसाई यासारखे मुंबई क्रिकेटमधील दिग्गज सामने खेळत अथवा सराव करत. तेव्हा एक तरुण दुसऱ्या तरुण खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी नेहमी शिवाजी पार्कवर येत. तो क्रिकेटचा चाहता तरुण होता बाळ ठाकरे, जो पुढे जाऊन भारताच्या इतिहासात बाळासाहेब ठाकरे या नावाने अजरामर झाला अन् तो खेळाडू तरुण सुद्धा भारतीय क्रिकेट जगतात तितकाच आदरार्थी व्यक्तिमत्त्व बनला. ते आदरार्थी क्रिकेटपटू म्हणजे मुंबई व भारताचे यष्टिरक्षक फलंदाज ‘माधव मंत्री’. आज मंत्री यांची आठवी पुण्यतिथी. 23 मे 2014 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता.
मंत्री एक यष्टीरक्षक व सलामीवीर फलंदाज होते. मुंबई क्रिकेट वर्तुळात नाव कमावल्यानंतर 1948-49 रणजी ट्रॉफीमध्ये त्यांची फलंदाजी नव्या उंचीवर पोहोचली. सलग तीन सामन्यात त्यांनी बंगालविरुद्ध ईडन गार्डन्सवर 117, चेपॉक येथे मद्रास विरुद्ध (उपांत्यपूर्व फेरीत) 116, तर पुणे येथे (उपांत्य फेरीत) महाराष्ट्राविरुद्ध 200 धावा केल्या. ब्रेबॉर्न स्टेडियमवरील अंतिम सामन्यात ते 70 आणि 30 धावा करू शकले. त्या रणजी हंगामात मुंबईने विजेतेपद पटकावले.
1952 चा इंग्लंड दौऱ्यावर भारताला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी, डॉन ब्रॅडमन यांना अनेकदा चकवणारे डग राईट गोलंदाजी करत होते. तेव्हा मंत्री यांनी राइट यांना पुढे सरसावत षटकार ठोकला. तो षटकार प्रेक्षकांत गेला. त्यांनी मारला षटकार ब्रिटनच्या आयुक्तांनी झेलला होता. माजी भारतीय खेळाडू विनू मंकड यांनी मंत्री यांचे टोपणनाव “जॉर्ज” असे ठेवले होते. इंग्लंडचे महान यष्टीरक्षक जॉर्ज डकवर्थ यांच्यासारखे यष्टीरक्षण मंत्री करतात असे मंकड यांना वाटत.
1954-55 मध्ये पाकिस्तानच्या भूमीवर झालेल्या पहिल्या कसोटीत त्यांनी पंचांना टोमणे मारल्याची घटना क्रिकेट वर्तुळात प्रसिद्ध आहे. भारताचे दिग्गज फिरकीपटू सुभाष गुप्ते हे गोलंदाजी करत असताना पंच असलेल्या इद्रीस बेग यांनी एक नोबॉल दिला होता. तेव्हा, मंत्री बेग यांच्या जवळ जाऊन म्हटले, ” तुम्हाला कदाचित विस्डेनमध्ये नाव नोंदवून घ्यायचे आहे वाटतं. सुभाष कधीही नोबॉल टाकत नाही. ”
यष्ट्यांच्या दोन्ही बाजूंना मंत्री यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. 33.86 च्या सरासरीने 4403 प्रथमश्रेणी धावा करताना, यष्टीरक्षक म्हणून 192 गडी त्यांनी बाद केले. दुर्दैवाने, प्रबीर सेन आणि नरेन ताम्हाणे यांच्या आव्हानामुळे मंत्री केवळ चार आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळू शकले.
मंत्री हे सुनील गावसकर यांचे मामा तर गुंडाप्पा विश्वनाथ यांचे नात्याने काका लागत. सुनील गावसकर आपल्या ‘सनी डेज’ या पुस्तकात लिहितात, ” एकदा लहान असताना मी मामांकडे गेलो होतो. मामा त्यावेळी नुकतेच क्रिकेटपासून खेळाडू म्हणून बाजूला झाले होते. त्या ठिकाणी त्यांची मुंबई संघासाठीची तसेच भारतीय संघाकडून खेळलेली टोपी होती. मी त्यांना ती टोपी हवी आहे असे म्हटले. तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार देत सांगितले, सुनील या टोप्या भेट दिल्या जात नाहीत, तर कमवायच्या असतात.”
खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर मंत्री दादर क्रिकेट युनियनचे काम पाहू लागले. दिलीप वेंगसरकर व संजय मांजरेकर यांसारख्या खेळाडूंना शोधण्याचे श्रेय मंत्री यांना जाते. 1990 च्या इंग्लंड दौऱ्यावेळी ते भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. या दौर्यात सचिन तेंडुलकरला त्यांनी अधिक संधी दिली होती. याव्यतिरिक्त ते भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष तसेच बीसीसीआयचे खजिनदार राहिले. 2014 मध्ये त्यांचे निधन झाले तेव्हा ते 92 वर्ष 264 दिवसांचे होते. मृत्यूवेळी ते भारताचे सर्वात वयस्कर हयात असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final। रवी शास्त्रींनी निवडली भारत-ऑस्ट्रेलियाची संयुक्त प्लेईंग इलेव्हन, फक्त चार भारतीयांना संधी
महाराष्ट्र प्रीमियर लीग । 15 जूनपासून पुण्यात सुरू होणार क्रिकेट सामन्यांचा थरार