भारतातील सर्वात मोठी फर्स्ट क्लास क्रिकेट टूर्नामेंट असलेल्या रणजी ट्रॉफीचा 87 वा सिझन 10 जुलै, 2022मध्ये संपला. कोरोनामूळे इतिहासात प्रथमच ही स्पर्धा वर्ष दोन वर्षे रद्द करावी लागलेली. मात्र, 2022 मध्ये पुन्हा रणजी ट्रॉफीने आपली तीच ‘परंपरा प्रतिष्ठा आणि अनुशासन’ जपत भारतीय क्रिकेटला समृद्ध केले. फायनलमध्ये रणजी जायंट मुंबई आणि मध्य प्रदेश उभे ठाकलेले. फेवरेट मुंबईला मागे टाकत मध्य प्रदेशने पहिल्यांदा रणजी ट्रॉफी उंचावली. पूर्वी होळकर संस्थानाच्या नावाने खेळणाऱ्या मध्य प्रदेशने 1952-1953 मध्ये आपली चौथी आणि अखेरची रणजी ट्रॉफी जिंकलेली. मध्य प्रदेश नावाने त्यांची ही पहिलीच ट्रॉफी. मात्र, मध्य प्रदेशला हा सोन्याचा दिवस दाखवण्यात सर्वात मोठा वाटा एका मुंबईकराचा आहे. हा मुंबईकर ड्रेसिंग रूममध्ये बसून मुंबई विरोधातच रणनीती आखत होता. त्याची रणनीती सफल ठरली आणि मध्य प्रदेश रणजी चॅम्पियन बनली. हा मुंबईकर होता मध्य प्रदेशचे हेड कोच चंद्रकांत पंडित.
चंद्रकांत पंडित पक्के मुंबईकर. क्रिकेटचे धडे गिरवले शिवाजी पार्कात. गुरु साक्षात रमाकांत आचरेकर. सवंगडी सचिन तेंडुलकर, लालचंद राजपूत, प्रवीण आमरे. असलं भरभक्कम प्रोफाईल आणि टॅलेंट असल्यावर मुंबईसाठी रणजी खेळण्यात त्यांना कसलीच अडचण आली नाही. विकेटकीपर म्हणून करिअर करताना मुंबईपासून टीम इंडियापर्यंतचा प्रवास केला. टीम इंडियासाठी पाच टेस्ट आणि 36 वनडे असं छोटंसं इंटरनॅशनल करियर. मात्र, 21 रणजी सीजनचा भक्कम अनुभवही त्यांच्या पाठीशी होता. खेळाडू म्हणून खेळताना मुंबईच्या चार रणजी ट्रॉफी विजयात सिंहाचा वाटा उचलला. मध्य प्रदेशसाठीही 23 वर्षांपूर्वी फायनल त्यांनी खेळली. तिथं मात्र ट्रॉफी उंचवायची राहिली. रिटायरमेंट घेतली आणि सेकंड इनिंग कोच म्हणून सुरू केली.
चंद्रकांत पंडितांनी ज्या दिवशी कोच बनायचा निर्णय घेतला असेल, त्या दिवशी त्यांना स्वतःलाही वाटले नसेल की, काही वर्षातच आपण भारतातील सर्वात महागडे आणि सर्वात यशस्वी कोच बनू. त्यांनी सुरुवात अर्थातच मुंबईपासून केली. पहिल्याच झटक्यात 2002-2003 मध्ये मुंबईला रणजी चॅम्पियन बनवून त्यांनी आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवले. पुढच्या वर्षीही रणजी ट्रॉफी मुंबईकडून गेली नाही. मुंबईने सलग दोन रणजी ट्रॉफी जिंकल्यावर त्यांनी महाराष्ट्राचा रस्ता धरला. दोन सिझन तिकडे राहिले. मात्र, ट्रॉफी आली नाही. केरळमध्ये जाऊन केरळ क्रिकेट सुधारण्यातही त्यांचा मोठा वाटा राहिला. या काळात चंद्रकांत पंडित यांची कोचिंग स्टाईल देशभरात चर्चिली जाऊ लागलेली. टास्क मास्टर म्हणून त्यांची ओळख झाली. पुढे राजस्थानने त्यांना डायरेक्टर ऑफ क्रिकेट बनवलं आणि राजस्थान सलग दोनदा रणजी ट्रॉफी जिंकली. चंद्रकांत पंडितांचा लोहा सारे जण मानू लागलेले. मुंबईने त्यांना पुन्हा बोलावलं आणि मुंबई 2015- 2016 मध्ये मुंबई पुन्हा चॅम्पियन बनली. पुढच्या सीजनला मुंबई फायनलमध्ये.
मुंबईची साथ सोडल्यावर त्यांनी विदर्भाचा हात धरला आणि आपला जलवा दाखवला सलग दोन वर्ष कोणाच्याही खिजगणतीत नसलेल्या विदर्भाला रणजी ट्रॉफी विजेते होण्याचा मान मिळवून दिला. मधल्या काळात इंडिया अंडर नाईन्टीन कोच आणि सिलेक्टर म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
एवढा कामाचा माणूस म्हटल्यावर त्याला सगळीकडे मागणी असणारंच. 2020मध्ये मध्य प्रदेशने तब्बल दीड कोटी वार्षिक पॅकेज देत त्यांना करारबद्ध केलं. ध्येय एकच रणजी ट्रॉफी. पहिला सीजन ग्रुप स्टेजमध्ये आटोपला. मात्र, रिझल्ट द्यायचे आव्हान त्यांच्यापुढे होतेच. दोन वर्षातील 405 दिवस जवळपास 150 खेळाडूंवर ते लक्ष देवून होते. एज ग्रुप क्रिकेट, महिला क्रिकेट आणि सीनियर क्रिकेटर्स साऱ्यांवर त्यांची घारीसारखी नजर होती. असोसिएशनने कोणाच्या नावाची शिफारस केली, तर थेट राजीनामा देण्याची धमकी त्यांनी दिली. एखादा खेळाडू टॅलेंटेड वाटला की, त्याला कॅम्पमध्ये आणले. शिस्त आणि शिस्त ही एकच सवय त्यांनी सर्वांना लावली.
Of captain-coach's solid partnership & Madhya Pradesh's maiden #RanjiTrophy triumph. 👏 🏆
DON'T MISS as Aditya Shrivastava & Chandrakant Pandit chat after the team's historic title win. 👍 👍 – By @ameyatilak
Full interview 🎥 🔽 @Paytm #Final #MPvMUMhttps://t.co/NzPgncmV8Z pic.twitter.com/1gPpzvRsm1
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 26, 2022
सीनियर खेळाडूंना भैय्या म्हणायची पद्धत त्यांनी सर्वात पहिल्यांदा बंद केले. जे काही असेल ते नावाने बोलायचे. इतकंच काय कधी कधी रात्री बारा वाजताही खेळाडूंना ग्राऊंडवर बोलाविण्यात ते मागेपुढे पाहत नव्हते. महुच्या आर्मी कॅम्पमध्ये जाऊन मेंटली टफ होण्यासाठी त्यांनी खेळाडूंना ट्रेनिंग दिले. याचंच फळ आज मिळतंय. ज्या मध्य प्रदेशसोबत 23 वर्षापूर्वी कॅप्टन म्हणून रणजी ट्रॉफी उंचवायची हुकलेली संधी, त्यांनी यावेळी कोच म्हणून साधलीये. योगायोगाने ग्राउंडही तेच चिन्नास्वामी स्टेडियम. एकेकाळी चंद्रकांत पंडितांचा सहकारी आणि नंतर शिष्य राहिलेला वासिम जाफर त्यांच्या यशाचे गमक सांगताना म्हणतो,
“चंदू कभी प्यार से समझाता है कभी डाट के.”
आज देशभरात चंदू सर म्हणून आपलं आदरयुक्त स्थान बनवलेल्या, कोच म्हणून सहा रणजी ट्रॉफी जिंकलेल्या चंद्रकांत पंडितांना, लवकरच इंटरनॅशनल लेव्हलवर एखाद्या टीमने कोचिंगची संधी दिल्यास कोणाला बिल्कुल आश्चर्य वाटायला नको.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतक ठोकल्यानंतर चंदू बोर्डेंना ‘या’ 3 दिग्गजांनी खांद्यावर घेतलेलं उचलून, पंतप्रधानांचाही समावेश
विंडीजमध्ये 15 वर्षांनी जिंकली टेस्ट, आफ्रिकेत रचला इतिहास; तरीही द्रविडला का म्हणतात अपयशी कॅप्टन?