गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या टी20 वर्ल्डकपसाठी अखेर टीम इंडियाची निवड झाली. निवडसमितीने कोणताही धक्का न देता ट्राय आणि टेस्टेड खेळाडूंवर भरोसा ठेवला. सॅमसन आणि शमी यांना थेट 15 मध्ये संधी मिळण्याच्या शक्यता हवेत विरल्या. इतके सर्व होत असताना 2022 हे वर्ष ज्याच्यासाठी एखाद्या स्वप्नाप्रमाणे ठरलं, त्या दीपक हुडाला मात्र मागील सात आठ वर्षापासून केलेल्या कष्टाचं फळ मिळालं. अवघ्या सहा-सात महिन्यात त्याने मारलेली ही मजल नक्कीच कौतुकास्पद म्हणावी लागेल.
भारतीय क्रिकेटची सर्वात वाखाण्याजोगी गोष्ट म्हणजे आपलं डोमेस्टिक क्रिकेटचा स्ट्रक्चर. बीसीसीआय अगदी पंधरा-सोळा वर्षाच्या मुलांना तयार करायला सुरुवात करते. त्याचच एक प्रोडक्ट दीपक हुडा म्हणता येईल. हुडा जन्माने हरियाणवी. वडील सैन्यात असल्याने ती शिस्त अंगी होतीच. वडिलांची पोस्टिंग बडोद्यात असल्यापासून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अगदी तेरा-चौदा वयापासून तो केंद्रीय विद्यालयाच्या संघात खेळायचा. त्याला पाहणारे सांगतात, बॅटिंग बॉलिंग या गोष्टी क्रिकेटमध्ये तर आहेतच, पण दीपकला युएसपी होता त्याची फिल्डिंग. लोक आवर्जून त्याची फिल्डिंग पाहायला येत. पार्टटाइम बॉलिंग आणि हार्ड हिटिंग बॅटिंग हे त्याचे संघात जागा बनवण्याचे कारण ठरले.
दीपक हुडा नाव भारतीय क्रिकेटमध्ये चर्चेत आले 2014 च्या अंडर नाईन्टीन वर्ल्डकपमधून. आज भारतीय संघात मानाचे स्थान असलेले कुलदीप यादव, श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन हे देखील त्या संघात होते. मात्र, नजरेत भरला तो दीपक हुडा. दुसऱ्या सर्वाधिक रन आणि दुसऱ्या सर्वाधिक विकेट्स. एक परफेक्ट ऑलराउंड कामगिरी त्याच्याकडून झाली. नाण खणखणीत वाजवून दाखवल्यावर सध्या टीम इंडियाचे दार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलमध्ये त्याला संधी मिळणारच होती. आणि हा संघ देखील होता नेहमीच युवा खेळाडूंवर विश्वास दाखवणारा राजस्थान रॉयल्स. 2014 च्या सिझनला संधी मिळाली नाही. पण, पुढच्या वर्षी संधी मिळताच पहिल्याच इनिंगमध्ये 15 बॉलमध्ये 30 रन्सचा तडाखा दिला. पुढच्या मॅचला दिल्लीविरुद्ध तर 25 बॉल 54 ची मॅचविनिंग इनिंग त्याच्या बॅटमधून आली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल हे नाव साऱ्यांच्या तोंडी होते. अनेकांनी दीपकला ‘इंडियाचा मॅक्सवेल’ अशी पदवी देऊन टाकली.
डोमेस्टिक क्रिकेटमध्येही त्याचा फॉर्म राहिला आणि रणजीत डबल सेंचुरी झळकावली. इकडे आयपीएलमध्ये राजस्थान बॅन झाली आणि सनरायझर्स हैदराबादने दीपकला 4 कोटींपेक्षा जास्त किंमत देत आपल्या संघात सामील करून घेतले. तीन वर्ष एक्के-दुक्के परफॉर्मन्स त्याच्याकडून येत होते. अशात 2018 मध्ये त्याला टीम इंडियात निवडले गेले. स्वप्नपूर्तीच्या तो अगदी जवळ होता. निळी जर्सी त्याने अंगावर चढवलीही, मात्र ती केवळ इतर खेळाडूंना पाणी पाजण्यापूरती. तो दोन सिरीज संघात राहिला आणि एकही मॅच न खेळता संघाबाहेर झाला. परफॉर्मन्स अजून डाउन झाला. सनरायझर्स हैदराबादने त्याला रिलीज केले. केवळ डोमेस्टिक क्रिकेटच्या थोड्याफार चांगल्या इनिंग्समुळे 2020 ला पंजाबने अवघ्या 50 लाखात त्याला आपल्या संघात घेतले.
दीपकच्या क्रिकेट करिअरला कलाटणी देणारं वर्ष होतं 2021. जगात कोविडने हाहाकार माजवलेला. क्रिकेट बंद झालेलं. अशात बीसीसीआयने मागील वर्षीचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी खेळवण्याचा निर्णय घेतला. दीपकची बडोद्याच्या संघात निवड होणारच होती. मस्तपैकी संघाचे ट्रेनिंग वगैरे सुरू होते. आणि अगदी स्पर्धा सुरू होण्याच्या एक दिवस आधी ती घटना घडली.
बडोद्याचा कॅप्टन कृणाल पंड्या आणि दीपक हुडामध्ये वाद झाला. कृणालने आपल्याला सर्वांसमोर अपमानित केले आणि करिअर खराब करण्याची धमकी दिल्याचे हुडा म्हणाला. त्याने संघाची साथ सोडली. संघातून बाहेर गेला म्हणून असोसिएशनने त्याला सस्पेंड केले. तो घरी आला आणि स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले. सारे मित्र ग्राउंडवर खेळत असताना दीपक नैराश्यात गेला होता. आता सारं संपलं अशीच त्याची भावना होती. अशाच त्याच्या मदतीला पुढे आले नेहमीच त्याच्यामागे खंबीरपणे उभे राहिलेले इरफान आणि युसुफ हे पठाण बंधू. भारतीय क्रिकेटची अनेक वर्ष सेवा केलेल्या या भावांनी दीपकला पुन्हा एकदा उभारी दिली. त्याच्याकडून अधिक मेहनत करून घेतली. त्याला निराशातून बाहेर काढले आणि पुन्हा एकदा मैदानावर पाठवले.
दीपकला संधी देण्याचा निर्णय राजस्थान क्रिकेट असोसिएशनने घेतला. विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याचे सिलेक्शन केले. इथेच तो चमकला. आयपीएलमध्ये एका नव्या उमेदीने गेला. अनिल कुंबळे यांनी विश्वास दाखवला आणि पंजाबसाठी अनेक महत्त्वाच्या मॅचेस त्याने काढून दिल्या. दीपक आजवरच्या आपल्या करिअरच्या पीकवर पोहोचला होता.
अशात 26 जानेवारी 2022 च्या रात्री त्याला एक कॉल आला. कॉलवर सांगण्यात आलं की, वेस्ट इंडिजविरूद्धच्या वनडे सिरीजसाठी तुझी टीम इंडियात निवड झालीय. चार वर्षांपूर्वी हुकलेली संधी यावेळी मिळणार याचा त्याला विश्वास होता. लवकरच वनडे आणि टी20 डेब्यू झाला. भारतीय क्रिकेटपटू होण्याच स्वप्न पूर्ण झालेल. आयपीएलमध्ये ही कोट्यावधींची बोली लागली. परफॉर्मन्सही एकदम टॉप. आयर्लंड टूरवर गेला आणि पठ्ठ्याने थेट टी20 शतक ठोकल. तेही केवळ आपल्या तिसऱ्या टी20 मध्ये. त्याने खेळलेल्या आपल्या पहिल्या सलग 17 इंटरनॅशनल मॅचेसमध्ये टीम इंडिया अपराजित राहीली. हा देखील एक वर्ल्ड रेकॉर्ड बनला.
आता थेट टी20 वर्ल्डकपसाठी त्याची निवड झालीये. रवींद्र जडेजा संघात नाही. आता त्या ऑलराऊंडरच्या जागेसाठी त्याची थेट लढत होईल अक्षर पटेलशी. सध्या तरी दोघांची जागा 19:20 आहे. यात 19 कोण 20 कोण हे येणारा काळ ठरवेल. मात्र, आजवर मिळालेल्या संधीचे सोने करणारा दीपक 15 वर्षांपासून भारतीयांचं टी20 वर्ल्डकपचे स्वप्न पूर्ण करण्यात कोणतीच कसर ठेवणार नाही हे नक्की!
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा –
महत्वाच्या बातम्या –
वयाच्या 19 व्या वर्षी अल्कारझचे घवघवीत यश, यूएस ओपन जिंकत एटीपी क्रमवारीत पोहोचला अव्वलस्थानी
सर्वात भीषण आतंकवादी हल्ल्यात मरण पावलेला एकमेव क्रिकेटपटू, लाराविरूद्ध केलेले नेतृत्व