वयाच्या ६ व्या वर्षी मुले बाराखडी शिकत असतात किंवा टेलिव्हिजनवर कार्टून पाहत असतात. परंतु, एक पुणेकर मुलगी या वयात क्रिकेटच्या मैदानावर खेळत होती. अगदी लहान वयातच तिने आपल्या क्रिकेट प्रवासाला सुरुवात केली, वयाच्या १५ व्या वर्षी भारतीय क्रिकेटच्या प्रमुख वर्तुळात तिने प्रवेश केला होता. १७ वर्षाची असताना विमेंन्स चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत, इंडिया ग्रीन संघाची कर्णधार म्हणून तिची निवड करण्यात आली होती. इतक्या लहान वयात वरिष्ठ खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाचे नेतृत्व करायला मिळणे, ही गोष्ट त्या मुलीच्या प्रतिभेची जाणीव करून देत होती. त्या मुलीचे नाव देविका वैद्य. तिचा आज २३ वा वाढदिवस.
घरातील सर्वांनाच क्रिकेटची खूप आवड होती. २००३ विश्वचषकात ब्रेट लीला गोलंदाजी करताना पाहून तिलाही क्रिकेटर होऊ वाटले. सहा वर्षाची असली तरी तिला क्रिकेटबद्दल खूप आकर्षण होते. ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉ फाडफाड इंग्रजी बोलतो म्हणून तो देखील तिला आवडत असे. आपल्या आवडत्या ब्रेटली प्रमाणे तिलाही वेगवान गोलंदाजी करायची इच्छा असे. तिची क्रिकेटबद्दलची आस पाहता तिच्या आईने तिला पुण्यातील एक प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक पवन कुलकर्णी यांच्याकडे नेले. कुलकर्णी यांनी तिच्यातील गुणवत्ता हेरली.
अशातच एकदा तिने मुलांच्या संघात खेळण्याचा हट्ट केला. त्यामागे तिने, ‘ दिल बोले हडिप्पा ‘ या चित्रपटातील राणी मुखर्जीच्या भूमिकेचे उदाहरण सर्वांना दिले. ती डोक्यावर टोपी घालून मुलांसोबत खेळत असे.
काही कालावधीनंतर देविका, अतुल गायकवाड यांच्या क्लबमध्ये सामील झाली. तिथे गायकवाड यांना देविका ही वेगवान गोलंदाजीपेक्षा फलंदाजी उत्तम करते असे जाणवले. त्यांनी तिला गोलंदाजी सोडण्यास सांगितले, मात्र ती तयार झाली नाही. तिला पालक आणि प्रशिक्षक गायकवाड यांनी हर तऱ्हेने समजवायचा प्रयत्न केला मात्र ती ऐकेना. अखेरीस, तिला सचिन तेंडुलकरचे उदाहरण देण्यात आले. तिला सांगितले गेले की, सचिन सुद्धा वेगवान गोलंदाज बनणार होता मात्र, डेनिस लिलीने त्याच्यातील खरी प्रतिमा ओळखून त्याला फलंदाज होण्यास सांगितले. लहानग्या देविकाला हे पटले. पुढे, ती भारतीय अ संघात खेळलेल्या निरंजन गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली काही वेळ खेळली.
स्मृती मंधाना हे नाव माहित नाही असा एकही क्रिकेटचाहता भेटणार नाही. मिताली राज, झुलन गोस्वामी आणि हरमनप्रीत कौर यांच्यासमवेत तिने स्वत: ची खास ओळख बनवली आहे. स्मृती मंधाना देविकाची खास मैत्रीण. देविका आणि स्मृती वयाच्या १२ वर्षापासून मैत्रिणी आहेत. महाराष्ट्राकडून पदार्पण करताना त्या संघातील सर्वात कमी वयाच्या खेळाडू होत्या. स्मृती अजूनही देविकाची सर्वात चांगली मैत्रीण आहे. २०१७ विश्वचषकात एकत्र खेळण्याचे या दोघींनीही स्वप्न पाहिले होते. मात्र, या स्पर्धेपूर्वी, दुखापतीमुळे देविका स्पर्धेतून बाहेर झाली.
तत्पूर्वी, २०१४ मध्ये, वयाच्या १७व्या वर्षी द. आफ्रिकेविरुद्ध टी२० सामन्याद्वारे तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतरही, देविकाने देशांतर्गत क्रिकेटही चांगलेच गाजवले. २०१५ च्या हंगामात हैदराबाद व बडोदा विरुद्ध अर्धशतके झळकावून महाराष्ट्राला विजयी केले होते. हिमाचल विरुद्ध तर ११५ धावा व पाच बळी अशी दमदार कामगिरी तिने केली. देविका ही एक उदयोन्मुख खेळाडू म्हणून पुढे येत होती. टी२० आंतरराज्य स्पर्धेत ती सर्वाधिक बळी घेणारी आणि आंतरराज्य एकदिवसीय स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणारी खेळाडू ठरली. २०१५-१६ हंगामात तिने ५ सामन्यात २५८ धावा जमविल्या आणि ९ बळी मिळविले.
ती १७ व्या वर्षी, विमेंन्स चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत इंडिया ग्रीन संघाची कर्णधार बनली. बीसीसीआयने तिला २०१५ सालची सर्वोत्कृष्ट युवा महिला क्रिकेटर म्हणून सन्मानित केले. २०१८ च्या महिला टी२० विश्वचषकात देखील तिची निवड झाली. मात्र, यावेळीसुद्धा नशिबाने साथ दिली नाही व तिला दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावे लागले. दुखापतीमुळे दोन विश्वचषक खेळायची संधी ठोकलेली ती कदाचित एकमेव क्रिकेटपटू असेल.
डाव्या हाताने फलंदाजी व लेगस्पिन गोलंदाजी करणाऱ्या देविकाने भारतासाठी आत्तापर्यंत एक टी२० सामना खेळला आहे तर ९ एकदिवसीय सामन्यात खेळताना १६९ धावा काढल्या आहेत. यात श्रीलंकेविरुद्ध केलेल्या आक्रमक ८९ धावांच्या खेळीचा समावेश आहे. गोलंदाजी देखील तिने ६ बळी मिळविले आहेत.
२०१९ मध्ये आयपीएलच्या धर्तीवर सुरू केलेल्या विमेंन्स टी२० चॅलेंज स्पर्धेत मिताली राजच्या नेतृत्वात ती वेलोसिटी संघासाठी खेळली. सध्या ती भारतीय अ संघाची कर्णधार आहे व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाचा प्रयत्न करतेय.
वाचा- पुण्याच्या अनाथालयातील पोरगी, जीने ४ वेळा ऑस्ट्रेलियाला केले विश्वविजेते