साल २००८ मध्ये पहिल्यांदाच आयपीएलचा घाट घातला गेला होता. जगातील एकापेक्षा एक क्रिकेटपटू एकाचवेळी भारतात खेळत होते. शहरांचे संघ होते आणि चाहत्यांना होती उत्सुकता. पैसा, मनोरंजन, पार्टी कल्चर या सर्वांनी दीड महिना अक्षरशः भारतीय क्रिकेट दुथडी भरून वाहत होते. अखेर १ जून रोजी २००८ रोजी जगाला पहिला आयपीएल विजेता मिळाला. मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर आयपीएलची ट्रॉफी उंचावणारा हा संघ होता राजस्थान रॉयल्स.
‘ते आले…त्यांनी पाहिले… त्यांनी जिंकले…’ ही उक्ती खरी करून दाखवली ती राजस्थान रॉयल्स संघाने. मात्र, त्यांचा हा प्रवास किती खाचखळग्यांनी भरला होता. याची अनेकांना कल्पनाही नसेल. त्यांच्या याच प्रवासावर आज नजर टाकूया.
आयपीएल लॉन्चिंगवेळी आठ शहरांच्या फ्रॅंचाईजींची घोषणा करण्यात आली. त्यापैकी एक फ्रॅंचाईजी होती जयपूर. आता जयपुरला फ्रॅंचाईजी देण्यात सर्वात मोठा हात होता तो आयपीएलचे कर्ताधर्ता ललित मोदी यांचा. कारण ते मूळचे जयपूरचेच. दुसरी पायरी होती या फ्रॅंचाईजींना मालक मिळण्याची. मुंबई, कोलकाता, बेंगलोर, दिल्ली आणि पंजाब या संघांना बडे उद्योगपती आणि फिल्मस्टार मालक मिळाले. चेन्नई आणि हैदराबाद फ्रॅंचाईजी त्या-त्या शहरातील स्थानिक उद्योगपतींनी आपल्या नावे केल्या. आता जयपुर फ्रॅंचाईजीसाठी बोली लावण्यास कोणी तयार नव्हते. याचे एक महत्त्वाचे कारण होते आयकॉन खेळाडू. कारण आयपीएल नियमानुसार प्रत्येक फ्रॅंचाईजीला त्या-त्या शहरातील एक बडा खेळाडू आयकॉन म्हणून ‘रिझर्व’ करण्याची मुभा देण्यात आलेली.
कोलकात्याचा गांगुली, मुंबईचा सचिन, बेंगलोरचा द्रविड, दिल्लीचा सेहवाग इतकंच काय, नुकताच टी२० विश्वचषक गाजवून आलेला युवराज पंजाबचा आयकॉन होणार होता. तसं, राजस्थानकडे राजस्थानचा कोणीही इंटरनॅशनल प्लेअर नव्हता. या सर्वांची आधीच कल्पना असलेल्या ललित मोदींनी. इथेही युक्ती केली आणि आपले मेहूणे उद्योगपती सुरेश चेलाराम आणि आपले मित्र ब्रिटनमधील उद्योगपती मनोज बदाले यांना जयपुर फ्रॅंचाईजी विकत घेण्यासाठी त्यांनी राजी केलेले, असे म्हणले जाते. तसे बदाले महाराष्ट्रातील धुळ्याचे. पण, इंग्लंडला एमर्जिंग मीडिया नावाची कंपनी चालवतात. तर, अखेरीस जयपूर फ्रॅंचाईजीला मालक मिळाला. ही फ्रॅंचाईजी सर्वात स्वस्त विकली गेली.केवळ ६७ मिलियन डॉलर्सला.
आता पुढची पायरी, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच खेळाडूंचा लिलाव होणार होता. लिलावापूर्वी जयपुर फ्रॅंचाईजीचे नामकरण करण्यात आले ‘राजस्थान रॉयल्स’. आता लिलावेळी राजस्थान आणि चेन्नई या दोनच संघांकडे आयकॉन खेळाडू नव्हता. तसं म्हणायला गेल, तर कर्णधार नव्हता. कारण बाकी साऱ्या संघांनी आपापल्या आयकॉनना कर्णधार बनवले होते. त्यामुळे या दोन्ही संघांना खरंतर आधी कर्णधार आणि नंतर संघ बांधायचा होता.
इथे राजस्थान रॉयल्स संघाचे संघमालक मनोज बदाले यांनी डोकं लावल होते, त्यांनी ऑस्ट्रेलियाचा निवृत्त खेळाडू आणि दिग्गज स्पिनर शेन वॉर्नची भेट घेतली. त्याला राजस्थानचा प्रशिक्षक आणि कर्णधार अशी दुहेरी भूमिका बजावण्याची ऑफर दिली. त्याने कोच म्हणून होकार भरला. पण लिलावात उतरायला तो तयार नव्हता. सारे क्रिकेटपंडित म्हणायचे, शेन वॉर्न हा ऑस्ट्रेलियाला न लाभलेला सर्वोत्कृष्ट कॅप्टन होता, बदाले यांनी हीच खपली काढली आणि तुला मी कर्णधार बनवतो. तू स्वतःला सिद्ध कर, असे चेतवून दिले. त्यानंतर वॉर्नने होकार दिला, अशी गोष्ट माध्यमांतील वृत्तानुसार समोर येते.
लिलावाचा दिवस आला. पहिलेच नाव होते शेन वॉर्नचे. राजस्थान सोडून त्याला कोणीही बोली लावली नाही. लिलाव पार पडत गेला आणि राजस्थान कमजोर टीम म्हणून हिणवली जाऊ लागली. याला कारणेही होती, एकतर वॉर्नसारखा निवृत्त खेळाडू. कसोटीपटू म्हणून ओळखले जाणारे दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन ग्रॅमी स्मिथ, पाकिस्तानचा युनूस खान आणि भारताचे मोहम्मद कैफ, मुनाफ पटेल या संघात होते. शेन वॉटसन, युसुफ पठाण, सोहेल तनवीर हे नुकतेच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आलेले खेळाडू आणि बाकी सारी कोणालाही माहीत नसलेली देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडू संघात होते.
आयपीएलला सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यामधेच मॅक्यूलमने तुफानी शतक करत राडा घातला. आयपीएल म्हणजे काहीतरी दर्जा आहे, याची खात्री सर्वांना पटली. दुसऱ्या दिवशी राजस्थानने दिल्लीविरुद्ध आपल्या अभियानाची सुरुवात केली. कागदावर भासत होता तसाच कमजोर खेळ राजस्थानने केला. पहिल्याच सामन्यामध्ये ९ विकेटने दारुण पराभव झाला. ड्रेसिंग रूममध्ये येताच वॉर्नने सगळ्यांवर जाळ काढला.
कर्णधाराच्या शिव्या खाण्यापेक्षा जिंकलेला बरं, असं म्हणत सगळ्यांनी स्पीड पकडलं. स्वतः वॉर्न, शेन वॉटसन, युसुफ पठाण आणि सोहेल तनवीर संघाचे चार खांब बनले. जवळपास प्रत्येक सामन्यात ते विजयासाठी योगदान देऊ लागले. रवींद्र जडेजा, स्वप्नील अस्नोडकर, सिद्धार्थ त्रिवेदी या कोणालाही माहीत नसलेल्या पठ्ठ्यांनी नजर लागेल अशी कामगिरी केली. अनुभवी स्मिथ आणि कैफ आपापल्या परीने हातभार लावत होते. पहिल्याच सामन्यामध्ये हार पाहिलेल्या या संघाने साखळी फेरी मधील १४ पैकी ११ सामने आपल्या नावावर केले. राजस्थान सेमी फायनलमध्ये जाणारा पहिला संघ बनला.
त्यावेळी संघात असलेले युवा खेळाडू सांगतात, “वॉर्न खरा लिडर होता. त्याला हिंदी भाषेची अडचण होती आणि आमच्यातील अनेकांना इंग्लिशची. मात्र त्याने कधीही आमच्यावर इंग्लिशची सक्ती केली नाही. तो आम्हाला आमचे म्हणणे हिंदीतून मांडायला लावायचा. इथेच तो सर्वांची मने जिंकला.” त्यावेळी १८ वर्षाच्या कोवळ्या जडेजाला ‘रॉकस्टार’ ही पदवी देत वॉर्नने पुढे येणाऱ्या एका महान खेळाडूला ओळखले होते.
विजयाच्या रथावर स्वार असलेल्या राजस्थान रॉयल्ससमोर सेमी फायनलमध्ये आव्हान होते. दिल्ली डेअरडेव्हिल्सचे. तीच दिल्ली ज्यांनी राजस्थानला पहिला पराभव दाखवलेला. तो हिशोब त्यांनी सेमीफायनलला चुकता केला. तब्बल १०५ धावांनी विजय मिळवला. कोणाच्या ध्यानीमनी नसताना रॉयल्स फायनलमध्ये पोहोचलेले.
१ जून २००८ रोजी डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर आयपीएलला पहिला चॅम्पियन मिळणार होता. समोरासमोर होते सुरुवातीला आयकॉन नसलेले राजस्थान आणि चेन्नई संघ. सारे क्रिकेटजगत या सामन्यासाठी सज्ज होते. श्वास रोखून धरायला लावलेल्या या फायनलमध्ये संपूर्ण स्पर्धेत दाखवलेला सांघिक खेळ राजस्थानने हंगामात अखेरच्या वेळीही दाखवला. शेवटच्या चेंडूवर सोहेल तनवीरने विजयी धाव घेतली आणि पहिल्या आयपीएलचा विजेता बनला राजस्थान रॉयल्स. पहिल्या आयपीएलची ट्रॉफी उंचावण्याचा मान मिळाला शेन वॉर्नला.
मनोज बदालेंनी वॉर्नवर दाखवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला. आपल्या करिश्माई नेतृत्वाच्या जोरावर त्याने कोणाच्या खिजगणतीतही नसलेल्या नव्या खेळाडूंच्या राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन बनवले. आणि हेही सिद्ध केले की, होय, मीदेखील ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार बनू शकलो असतो. त्यानंतर राजस्थान एकदाही आयपीएल ट्रॉफी उंचावू शकला नसला तरी, वॉर्नच्या त्या झुंजार संघाचे दाखले नेहमीच दिले जातील.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वाचा –
विराट आणि सचिन यांच्यातील नाते सांगणारे ४ भन्नाट किस्से
खेळाडू मैदानावर बॉल पँटवर का घासतात? जाणून घ्या कारण