प्रणाली कोद्रे (Twitter- @Maha_Sports)
तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले, अशी काहीसा त्याचा प्रवास राहिला. एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी त्याची कहानी आहे. 1991-92 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतरही तो 4 वर्षे भारतीय संघात नव्हता. पण 1996 च्या इंग्लंड दौऱ्यात नवज्योत सिंग सिद्धू कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन शिव्या देतो म्हणून अर्धवट दौरा सोडून तडक भारतात परत आले आणि त्याला संधी मिळाली ती थेट क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात. त्याने ही संधी दोन्ही हातांनी झेलेली आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना पहिल्याच डावात शतकी खेळी केली. त्यावेळी त्याने जगाला सांगण्याआधी स्वत:ला सांगितले ‘तू जर इथे शतक करु शकतो तर तू आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला तयार आहेस.’ तो खेळाडू म्हणजे सर्वांचा ‘दादा’ सौरव गांगुली.
8 जूलै 1972 ला बंगालमधील कोलकाता येथे एका श्रीमंत घरात दादाचा जन्म झाला. घरचा प्रिटींगचा व्यावसाय होता. त्याचं जवळपास 30 जणांचं एकत्र कुटुंब. त्यात दादा घरातील लहान सदस्यांपैकी एक. त्यामुळे सर्वांचा तसा लाडका. दादाचा मोठा भाऊ स्नेहाशिष क्रिकेट खेळायचा. पण दादाचा ओढा फुटबॉलकडे जास्त. घरी स्नेहाशिषसाठी क्रिकेट सराव करायला सर्व सोयी होत्या. पण भाऊ क्रिकेट खेळतो त्यामुळे दादानेही थोडेफार क्रिकेटचे प्रशिक्षण घेतलेले. त्यावेळी स्नेहाशिष बंगाल संघातील एक उत्तम खेळाडू म्हणून ओळखला जायचा. याचाच फायदा दादाला झाला. जेव्हा 15 वर्षांखालील बंगाल संघातील 7 खेळाडू अचानक टायफाईडमुळे आजारी पडले, तेव्हा स्नेहाशिषचा भाऊ म्हणून दादाला संधी मिळाली. दादानेही मग भावाचं किट घेतले आणि सामना खेळायला गेला. पहिल्याच सामन्यात दादाने शतक ठोकले. पण तेव्हाही दादाने क्रिकेट तसे गांभीर्याने घेतले नव्हते. दादा डावखुरी फलंदाजी करण्यामागेही एक खास कारण आहे. तो अन्य सर्व कामे उजव्या हाताने करतो पण फलंदाजी डाव्या. कारण स्नेहाशिष डावखुरा क्रिकेटपटू आणि दादाने लहानपणापासून त्याचेच किट वापरलेले त्यामुळे दादाला डाव्या हातानेच फलंदाजी करण्याची सवय लागली.
पुढे दादा क्रिकेट आणि शिक्षण असे दोन्ही सांभाळत असताना 1989 ला अचानक दादाची बंगालच्या रणजी संघात जागा मिळाली होती. जेव्हा त्याला ही बातमी कळाली तेव्हा त्याला खूप आनंद झाला पण त्याचवेळी घरचे सर्वजण काळजीत होते. त्यावेळी दादाला काही कळेना नक्की झालं काय आहे. पण जेव्हा त्याला कळालं की त्याची निवड ही त्याचाच मोठा भाऊ स्नेहाशिषच्या जागेवर झाली आहे, तेव्हा त्यालाही धक्का बसला.
त्या मोसमात दादाने बंगालकडून रणजी पदार्पण केले. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमाल करत होता. त्यामुळे वयाच्या 20व्या वर्षी त्याला 1992 ला ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या तिरंगी वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले. पण या मालिकेत तो केवळ एकच सामना खेळू शकला. त्याने जानेवारी 1992ला वेस्ट इंडीज विरुद्ध भारताकडून वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या एका सामन्यानंतर त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले. याच दरम्यानचा एक गमतीदार किस्सा आहे. सचिन आणि दादा तसे समवयस्क. या मालिकेत भारतीय संघाची कामगिरी चांगली होत नव्हती. दादा तसा लहान होता. सचिनही लहान होता. पण सचिन संघात येऊन आता बऱ्यापैकी काळ लोटला होता. त्यामुळे दादाकडे फारसे कोणी लक्ष देत नव्हते. एकदा तर मांजरेकरांनी खराब कामगिरीचा राग दादावर काढला. त्यानंतर दादाला संघातून काढून टाकण्यात आले. तेव्हा तो त्याची बॅग आवरत असताना सचिन तेथे आला आणि दादाची समजूत काढण्यापेक्षा तो त्याला म्हणाला, तू आता खेळणार नाहीयेस तर तूझी बॅट तेवढी देऊन जा. दादाला काही कळेना. पण आता काय करणार म्हणून दादाने त्याची बॅट दिली. दादाची बॅट वजनाने जड त्यामुळे सचिनला आवडायची. सचिनने नंतर 1992 च्या विश्वचषकात दादाच्या बॅटने चांगल्याच धावा फटकावल्या. पण त्यावेळी संघातून डच्चू मिळाल्याने दुखावलेल्या दादाने मनाशीच निश्चय केला असावा मी परत येईल. कारण नंतर दादाने देशांतर्गत क्रिकेट गाजवायला सुरुवात केली. त्याने 1993-94 च्या रणजी ट्रॉफीमध्ये 8 सामन्यात 722 धावा केल्या. त्याच्या पुढच्या मोसमात त्याने रणजीमध्ये 3 सामन्यात जवळजवळ 113 च्या सरासरीने 227 धावा केल्या.
अखेर दादाला वयाच्या 24व्या वर्षी 1996च्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात संधी मिळाली. पण कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात तो अंतिम 11 जणांच्या खेळाडूंमध्ये नव्हता. मात्र लॉर्डला झालेल्या पुढच्याच सामन्यात सिद्धू भारतात परत गेल्याने दादाला संधी मिळाली आणि दादाने त्या संधीचे सोने केल. दादाने या सामन्यात अझरुद्दीन, जडेजा, सचिन असे दिग्गज परतल्यानंतरही पहिल्या डावात 131 धावा केल्या आणि डाव सांभाळला. यावेळी त्याच्या साथीला होता द्रविड. तोही त्याचा पहिलाच कसोटी सामना खेळत होता. त्यानेही 95 धावांची खेळी या डावात केली होती. विशेष म्हणजे या सामन्यात दादाने गोलंदाजी करताना पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 1 अशा 3 विकेट्सही घेतल्या होत्या. त्याचवेळी दादाने त्याचे नाणे खणखणीत वाजवत सर्वांना सांगितले होते, की तो इथे फक्त खेळायलाच नाही तर आता परदेशी भूमीवरही वर्चस्व गाजवायला आला आहे. त्यानंतर त्याने नॉटिंगघममध्ये झालेल्या पुढील कसोटी सामन्यातही पहिल्या डावात 136 धावांची शतकी खेळी केली. या खेळींनी त्याला भारतीय क्रिकेटमध्ये ओळख निर्माण करुन दिली.
सचिन आणि दादाचा याच मालिकेदरम्यानचा एक मस्त किस्सा आहे. दादा आणि सचिन तसे आधीपासूनचे मित्र. दादा जेव्हा लॉर्ड्सवर पहिले कसोटी शतक झळकावून चहापानासाठी ड्रेसिंग रूममध्ये आला तेव्हा सचिन त्याच्याकडे गेला आणि खांद्यावर हात टाकून त्याला म्हणाला, “तू आराम कर. चहा वगैरे घे. बॅटला टेपिंग मी करतो.” नुसते एवढे सांगून सचिन थांबला नाही तर त्याने खरोखर सौरवच्या बॅटला टेपिंग करून दिले. इंग्लंडच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर बरेच तास खेळल्यामुळे सहसा बॅटचे हँडल ढिले होते. दादाच्या बाबतीतही हेच झाले होते.
सचिन आणि दादाच्याच बाबतीतील आणखी एक गमतीदार किस्सा म्हणजे 14 वर्षांचे असताना इंदोरमध्ये एका कॅम्पदरम्यान दादा आणि त्याचा रुममेट सराव करुन रविवारी दुपारी झोपले होते. त्यावेळी दादा जेव्हा उठला तेव्हा त्याने बघितले की खोलीत सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. सुटकेसपण पाण्यावर तरंगत होत्या. त्यामुळे बाथरुममध्ये जाऊन पाहिले पण ते तर कोरडे होते. त्यानंतर त्याने दरवाजा उघडला तेव्हा पाहिले की बाहेर सचिन आणि विनोद कांबळी पाण्याची बादली घेऊन उभे होते. ते आणखी पाणी आत टाकणार होते. त्यामुळे दादा त्यांना विचारले की काय आहे हे. यावर ते दोघे त्याला म्हणाले, ‘दुपारी का झोपला तू? चल टेनिस बॉलने क्रिकेट खेळू.’ त्यावेळी दादाची दशा अशी झाली होती की एवढेच होते तर दार वाजवायचे एवढा ताप कशासाठी.
बरं, एव्हाना 1996 नंतर दादा भारतीय संघाचा नियमित सदस्य बनला. पुढे 2000 मध्ये भारतीय क्रिकेट मॅच फिक्सिंगच्या विळख्यात अडकला असतानाच दादाकडे भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले. दादानेही हे कर्णधारपदाचे काटेरी मुकुट समर्थपणे सांभाळताना भारताला मोठे विजय मिळवून दिले. त्याचे नेतृत्व हा भारतीय क्रिकेट इतिहासातील महत्त्वाचा टप्पा. त्याला जेव्हा नेतृत्व मिळाले तेव्हा त्याला एक संघ तयार करायचा होता. त्याचवेळी त्याने मग युवा खेळाडू निवडायला सुरुवात केली. त्यावेळी त्याला जॉन राईट या प्रशिक्षकाची साथ मिळाली. गांगुलीने राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, सचिन तेंडूलकर, जवागल श्रीनाथ, अनिल कुंबळे अशा दिग्गजांसह हरभजन सिंग, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ अशा युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला. त्यांच्यासाठी तो कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार रहायचा. युवा खेळाडूंना पाठिंबा द्यायचा. याच खेळाडूंना घेऊन दादाने भारतीय संघाला परदेशातही आपण जिंकू शकतो हा विश्वास दिला. सातत्याने जिंकण्याची सवय दादाने खेळाडूंना लावली. दादा म्हणायचा, खेळ आहे, जिथे एकतर आपण जिंकू शकतो किंवा हारु शकतो.
तो आक्रमक कर्णधार होता, तो ‘जशास तसे’ याच नियमाने वागायचा. त्यामुळे त्याने इंग्लंडमध्ये 2002 ला नेटवेस्ट सिरिज यजमान इंग्लंडलाच हरवून टीम इंडिया जिंकल्यानंतर लॉर्ड्सच्या बाल्कनीत जर्सी काढून जल्लोष केला होता. कारण त्याआधी इंग्लंडने जेव्हा भारताला वानखेडेत हरवले होते. तेव्हा असेच कृत्य अँड्र्यू फ्लिंटॉफने केले होते. आता परिपक्व झालेल्या दादाला त्याने केलेल्या कृत्याबद्दल वाईट वाटते, पण त्याच्या त्या कृत्याने जगाला सांगितले होते आम्ही नव्या दमाचा भारतीय संघ आहोत आणि आम्हीपण जिंकण्यासाठीच खेळतो. तो क्षण आजही क्रिकेटमधील आयकॉनिक क्षणांमध्ये गणला जातो. त्यानंतर दादाच्याच नेतृत्वाखाली 2003 ला भारतीय संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती. 1983ला भारतीय संघ विश्वचषक जिंकला पण त्यानंतर भारताला मोठे यश मिळत नव्हते. ते मिळवण्याची संधी दादाच्या संघाला मिळाली होती. पण त्यावेळीच्या बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघासमोर भारतीय संघ ढासळला आणि भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पण दादाने हा पराभव स्विकारात पुढे वाटचाल करायला सुरुवात केली.
त्याचवेळीचा एक किस्सा दादा आपल्या खेळाडूंवर इतका विश्वास ठेवायचा की तो त्यासाठी त्याचे कर्णधारपदही पणाला लावायचा. त्याचा हाच विश्वास पाहून खेळाडूही त्याच जिद्दीने खेळायचे. 2003 च्या विश्वचषकानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार होता. त्यावेळी कसोटी मालिकेसाठी निवडकर्ते कुंबळेची निवड करायला तयार नव्हते. पण दादाने सरळ सांगितले जर त्याला घेतले नाही तर मी संघ निवड झालेल्या पेपरवर स्वाक्षरी करणार नाही. अखेर निवडकर्त्यांनी दादाला अट घातली, जर कुंबळे चांगला खेळला नाही तर तू तूझे कर्णधारपद सोडायचे. पण तो दादा होता, त्याने ही अट मान्य केली. विशेष म्हणजे कुंबळेनेही दादाचा विश्वास सार्थ ठरवताना त्या मालिकेत सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या. ती मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली.
दादा तसा धूर्त कर्णधारही होता. याबद्दल बोरिया मुजुमदार यांच्या इलेव्हन गॉड्स अँड ए बिलियन इंडियन्स या पुस्तकात दादाबद्दल मायकल क्लार्कने सांगितलेला एक किस्सा दिला आहे. क्लार्कला पाँटिंगने दादाच्या करामतीबद्दल सांगितले होते. तो सामना कोणता होता, ते काही क्लार्कला सांगता आले नाही. पण त्याने सांगितले एकदा दादा आणि पाँटिंग नाणेफेकीसाठी मैदानावर गेले होते. त्यावेळी पाँटिंगने नाणे वर फेकले आणि त्याचवेळी दादा हेड-टेल असे एकाचवेळी म्हणाला. त्यामुळे पाँटिंगला दादा काय म्हणाला, हे समजायला काही सेकंद गेले तेवढ्यात नाणे खाली पडल्यावर लगेचच मीच जिंकलो या आविर्भावात दादाने ‘आम्ही फलंदाजी करतोय’ हे सांगूनही टाकले. सर्वांना वाटले भारत नाणेफेक जिंकला. पाँटिंगलाही काय झाले हे कळायच्या आत दादा त्याचा निर्णय सांगून निघून गेला. ही घटना पाँटिंगने क्लार्कला सांगितली होती.
याचदरम्यान अनेकांकडून दादाच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत नेहमीच दुर्लक्षित राहते ती 2002 ची चॅम्पियन्स ट्रॉफी. या स्पर्धेतही भारताने अंतिम सामन्यात धडक मारली होती. मात्र, भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय आल्याने अखेर दोन्ही संघांना विभागून विजेतेपद देण्यात आले होते.
दादाच्या कर्णधार म्हणून या मोठ्या यशामध्ये जेवढा त्याच्या नेतृत्वगुणांचा वाटा आहे तेवढाच त्याने शोधून परखून घेतलेल्या सेहवाग, झहिर, कैफ, युवराज, गंभीर, धोनी, हरभजन अशा अनेक त्यावेळीच्या युवा क्रिकेटपटूंचाही आहे. दादाने या शिलेदारांचा परखून त्यांना योग्य संधी देत क्रिकेटची एक पिढी घडवली. त्याला साथ द्यायला सचिन, द्रविड, लक्ष्मण, कुंबळे हे खेळाडू होतेच.
195 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे नेतृत्व केलेल्या गांगुलीने सप्टेंबर 2005 ला झिम्बाब्वे विरुद्ध भारताचा कर्णधार म्हणून शेवटचा कसोटी सामना खेळला. याचदरम्यान दादाच्या कारकिर्दीत ग्रेग चॅपेल नावाचंही वादळ आलं होतं. ज्यामुळे दादाला कर्णधारपद तर सोडावे लागलेच पण संघातील जागाही गमवावी लागली होती. त्याने सप्टेंबर 2005 ते जानेवारी 2007 मध्ये भारताकडून एकही वनडे सामना खेळला नाही. त्याच दरम्यान त्याच्यातील आणि भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्यातील वादही समोर आले होते. त्यावेळी हे प्रकरण खूप गाजले.
या दरम्यान गांगुलीची एक जाहिरात देखील आली होती. यामध्ये तो ‘मेरा नाम सौरव गांगुली हैं. भूले तो नहीं ना’ असे म्हणताना दिसला होता. तसेच याच जाहिरातीत तो हे देखील म्हणाला होता संघात परत येण्यासाठी मी शांत बसणार नाही. त्याने जाहिरातीत म्हणल्याप्रमाणे खऱ्या आयुष्यातही करुन दाखवले. गांगुलीचे 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन झाले. त्याने वनडेमध्ये नागपूरला वेस्ट इंडिज विरुद्ध पुनरागमन करताना 98 धावांची खेळी केली. दादाने 2007 हे वर्ष पुनरागमन करत गाजवले. 2007 नंतर 2011 च्या विश्वचषकासाठी नवीन खेळाडूंसह संघबांधणी करायची, अशा कारणांमुळे दादाने वनडे क्रिकेटमधील स्थान गमावले. पण तो कसोटीत तितकाच चांगला खेळत होता. पण दादाच्या यशस्वी पुनरागमनानंतर 1 वर्षाने त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबर 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती घेतली.
अपने दादा को भूले तो नहीं ते बीसीसीआयचे अध्यक्षपद…!!!
एक थक्क करणारा प्रवास…!!! #दादा #सौरवगांगुली #SouravGanguly #Ganguly #Sourav @SGanguly99 #म #मराठी pic.twitter.com/yNhkwcL3KI— Sharad Bodage (@SharadBodage) October 23, 2019
त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कारकिर्दीतील शेवटची मालिका खेळली. या मालिकेतील नागपूरला झालेल्या शेवटच्या सामन्यात त्यावेळीचा भारताचा कर्णधार धोनीने गांगुलीला शेवटची दोन षटके नेतृत्व करण्यासाठी दिली होती. ही गांगुलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला तसेच त्याच्यातील कर्णधाराला दिलेली मानवंदना होती.
गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ फलंदाजीनेच नाही तर त्याच्या पार्टटाईम गोलंदाजीनेही कमाल केली होती. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 132 विकेट्सही घेतल्या आहेत. दादा एक कर्णधार म्हणून जितका चांगला होता तसा तो ‘ऑफसाईडचा बादशाह’ म्हणूनही प्रसिद्ध होता. त्याने कसोटीत 7212 धावा आणि वनडेत 11363 धावा केल्या आहेत.
दादाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2008ला निवृत्ती तर घेतली पण त्याने आयपीएलमध्ये खेळणे सुरु ठेवले. मात्र तो एकाच आयपीएल संघात स्थिर होऊ शकला नाही. तो कोलकता नाईट रायडर्स, पुणे वॉरियर्स संघाकडून आयपीएल खेळला.
मात्र, नंतर मुळातच नेतृत्वाची जाण असणाऱ्या गांगुलीने क्रिकेट प्रशासनाकडे आपला मोर्चा वळवला. त्याने सुरुवातीला बंगाल क्रिकेट असोसिएशनचे नेतृत्व सांभाळताना अनेक बदल केले. आज भारतातील राज्य क्रिकेट संघटनांपैकी सर्वोत्तम अशी बंगालची क्रिकेट संघटनेची ओळख आहे. त्याने तेथील खेळाडूंसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या. इडन गार्डनचा चेहरा बदलला. पावसाचा व्यत्यय आला तरी काही वेळातच तेथील मैदान खेळण्यासाठी तयार होऊ शकते अशा सुविधा त्याने उपलब्ध केल्या. 5 स्टार हाॅटेलला लाजवेल असे एक उत्तम इनडोअर मैदान सरावासाठी त्याने उभारले. तो एवढ्यावरच थांबला नाही. तो आता बीसीसीआयचा अध्यक्ष झाला. त्याने हा कारभार हाती घेताच भारतात पहिल्यांदा दिवस-रात्र कसोटी सामना खेळवायचा निर्णय घेतला. गमतीचा भाग म्हणजे दादाने कर्णधार झाल्यावर मैदानावर जो ब्लेझर घालुन पहिल्यांदा नाणेफेक केली होती तोच कोट घालून बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला.
एक खेळाडू ते बीसीसीआयचा अध्यक्ष असा प्रवास केलेला गांगुली खऱ्या अर्थाने भारतीय संघाचा दादा होता आणि तो कायमच तसाच राहिला. त्याच्या दादागिरीने भारतीय संघाला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. पुढे भारताला अनेक मोठे कर्णधार मिळतीलही पण गांगुलीच भारतीय क्रिकेटमधील योगदान नेहमी ‘दादा’ या शद्बाला शोभेल असंच राहिलं.
याच लेखमालेतील अन्य लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग