क्रिकेटविश्वात ऍशेस आणि भारत-पाकिस्तान रायवलरीनंतर तिसरी सर्वात मोठी रायवलरी कोणती असेल तर ती म्हणजे भारत-ऑस्ट्रेलिया रायवलरी. भारताने ऑस्ट्रेलियाच्या 40-42 वर्षांनंतर इंटरनॅशनल क्रिकेट खेळायला सुरुवात केली असली तरी, दोन्ही संघांची क्रिकेटवर मक्तेदारी झाली राहिली आहे तसेच ती अजूनही गाजवतात. या दोन्ही देशात 1947-1948 पासून टेस्ट क्रिकेट खेळले जातेय. आज 75 वर्षानंतर हे दोन्ही देशातील स्पर्धात्मक वातावरण अजिबात कमी झाले नाही. भारत ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये खेळाडूंचा पारा असा काही चढलेला असतो की, त्यामुळे अनेक वाद उद्भवतात. त्यापैकीच एक विवादित घटना आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
सध्या भारत ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजला बॉर्डर-गावसकर सीरिज म्हटलं जात. भारताचे सुनील गावसकर आणि ऑस्ट्रेलियाचे सर ऍलन बॉर्डर यांच्या क्रिकेटमधील योगदानासाठी हे नाव सीरिजला दिले गेलंय. मात्र, आजचा जो किस्सा आहे तो आहे हे दोघे दिग्गज ज्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होते त्या वेळेचा. वर्ष होते 1981. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात चार वर्षांनी सीरिज खेळायला पोहोचलेला. या आधीच्या टूरवर सर्व पाचही मॅचेसचे निकाल लागलेले. दुर्दैवाने टीम इंडिया 3-2 ने पराभूत झालेली.
यावेळीही परिस्थिती बदलली नाही. पहिली टेस्ट यजमानांनी जिंकली. दुसरी टेस्ट ड्रॉ. तिसरी टेस्ट होणार होती मेलबर्नमध्ये. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचे आव्हान स्वीकारायला तयार होती, पण सर्वात मोठी अडचण झालेली भरवशाच्या सुनील गावसकर यांच्या फॉर्मची. चारही इनिंगमधील त्यांचे स्कोर होते 00, 10, 23 आणि 5. मेलबर्नला आल्यानंतरही परिस्थिती बदलली नाही. गावसकर फक्त दहा रन करून माघारी गेले. गुंडाप्पा विश्वनाथांनी सेंच्युरी केली. तरीही टीम इंडिया 182 रन्सनी मागेच पडली.
त्या सीरिजची हायलाईट म्हणजे खराब अंपायरिंग. तुम्ही त्यावेळेसच्या जॉन्सन आणि व्हाईटहेड यांना मागच्या काळातील बकनर आणि हेअर म्हटले तरी वावगे ठरणार नाही. टीम इंडियाला याच खराब अंपायरिंगचा फटका दुसऱ्या इनिंगमध्ये बसला. टीम इंडियाची बॅटिंग सुरू झाली. सुनील गावसकर आणि चेतन चौहान यांनी टीम इंडियाला शानदार सुरुवात दिली. दोघांनी फिफ्टी केल्या आणि आपआपल्या शतकांकडे मार्गक्रमण करू लागले. टीम इंडियाचा स्कोर बोर्ड नॉट आऊट 165 रन्स दाखवत होता.
त्याचवेळी बॉलिंगला आले डेनिस लिली. लिली यांचा इनस्विंगर येऊन गावसकरांच्या पॅडवर आदळला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अपील केलं आणि रेक्स व्हाइटहेड यांना त्यांना आऊट देण्यात क्षणाचाही विलंब लागला नाही. 70 रन करून खेळत असलेले गावसकर संतापले. एज लागला आहे असे ते वारंवार म्हणत होते. बऱ्याच कालावधीनंतर चांगल्या टचमध्ये दिसत असलेल्या गावसकरांनी अंपायरना तुम्ही चुकीचा निर्णय दिला आहे असे म्हटले. नेमके त्याच वेळी बॉलिंग करत असलेले लिली त्यांच्या पुढे जाऊन म्हणाले, “मी पॅडवर बॉल मारलाय.” त्यावर गावसकरांचा पारा आणखीन चढला. ते ड्रेसिंग रूमकडे चालू लागले. तरीदेखील लिली यांची बडबड थांबली नाही आणि ते काहीतरी बोलू लागले.
गावसकरांनी बऱ्याच वर्षानंतर सांगितल्यानुसार, त्यावेळी लिली आपल्याला ‘गेट आउट’ असे म्हटलेले. नेमके हेच शब्द गावसकरांना लागले. त्यांनी आपलेच नॉन स्ट्रायकर चेतन चौहान यांना आपल्या सोबत बाहेर चालण्यास सांगितले. चौहान द्विधा मनस्थितीत होते, पण गावसकरांनी त्यांना काहीसे ढकललेच. दोघेही वॉक आऊट करत होते. चौहान यांनी पुढे खुलासा केला होता की,
“त्यावेळी काय झाले हे मला समजले नाही. सनी माझ्याकडे आले आणि म्हणाले मी आऊट आहे का? त्यावर मी नाही म्हटलं, तेव्हा ते म्हणाले चल याचा विरोध करू. मी उत्तर दिले की तुम्ही कॅप्टन आहात आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत. मात्र, मला असेही वाटलेले की चुकीचे निर्णय हा खेळाचा भाग आहे आणि मॅचमध्ये काहीही घडू शकत होतं.”
गावसकर आणि चौहान ड्रेसिंग रूमकडे येत असल्याचे पाहून तेव्हा टीम इंडियाचे मॅनेजर असलेले सलीम दुरानी व उप मॅनेजर बापू नाडकर्णी बाऊंड्री लाईनपाशी येऊन उभे राहिले. त्यांनी गावसकरांना आत घेतले. पण, चौहान यांना परत जाण्याचा इशारा केला. रागारागाने बॅट आपटत ड्रेसिंग रूमकडे जाणाऱ्या सुनील गावसकरांचा तो व्हिडिओ आजही पाहायला मिळतो.
पुढे जाऊन कपिल देव व दिलीप दोशी यांच्या बॉलिंगच्या जोरावर आणि ती टेस्ट जिंकून सीरिज बरोबरीत आणली. मात्र, गावसकरांच्या त्या कृत्याने ही कामगिरी झाकली गेली. अनेक वर्षानंतर एका शोमध्ये गावसकरांनी मान्य केली की, “मी आऊट होतो की नाही यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मी ते कृत्य करायला नको होते. भारतीय कॅप्टन म्हणून मला त्या गोष्टीचा आजही खेद आहे.” मात्र, ऑल टाइम ग्रेट असलेल्या गावसकरांच्या करिअरवर तो डाग लागला तो कायमचाच!
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्या गावसकरांनी भारतीय क्रिकेटला ओळख मिळवून दिली, त्यांच्या दैदीप्यमान करिअरचा ‘असा’ झाला शेवट, वाचाच
भारतीय क्रिकेटमधील दुर्दैवाचं नाव- पुणेकर वसंत रांजणे, विंडीजविरुद्ध खेळताना रक्ताने माखलेला मोजा