सुनील गावसकर. केवळ भारतच नाही तर जगभरातील सर्वच क्रिकेटर्स आणि क्रिकेटप्रेमींसाठी आदरार्थी नाव. आपल्या खेळाने असंख्य चाहते त्यांनी कमावले. आजही त्यांच्या खेळाचे त्यांच्या स्वभावाचे अनेक जण कौतुक करत असतात. एक काळ असा होता जेव्हा टेस्ट क्रिकेट बॅटिंगमधील बरेचसे विक्रम केवळ त्यांच्याच नावे जमा होते. तब्बल सतरा वर्षे भारतासाठी खेळल्यानंतर 1987 मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. भारताचा शेजारी आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान त्यावेळी भारत दौऱ्यावर आलेला. पाच टेस्टमधील शेवटची बेंगलोर टेस्ट खेळून रिटायर व्हायचं त्यांनी आधीच घोषित केलेले.
भारत आणि पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी. त्यात गावसकरांसारख्या दिग्गजाची शेवटची सीरिज. कपिल देव आणि इम्रान खान हे धुरंदर ऑलराऊंडर कॅप्टन. अशी एकंदरीत परिस्थिती असताना गावसकरांना ‘ग्रँड फेअरवेल’ दिला जाईल असं सर्वांना वाटलं. मात्र, प्रत्यक्षात असं काही घडलं नाही.
या टूरवर आलेली पाकिस्तान टीम तितकी मजबूत नव्हती. इम्रान खान कॅप्टन असले तरी त्यांच्यावरच अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिलेले. संघातून ड्रॉप केलेल्या कासिम उमरने इम्रान यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. “इम्रान बदफैली आहेत, ते आपल्या आवडीचे प्लेयर निवडतात. हे खेळाडू रूममध्ये मुली बोलावतात तसेच दारू पितात व ड्रग्ज घेतात.” अशा प्रकारच्या आरोपांच्या फैरी झडत असताना पाकिस्तान टीम भारतात आली.
सीरिज अत्यंत रटाळ झाली. पहिल्या चार मॅचमध्ये निकालच लागला नाही. दोन्ही टीमच्या डिफेन्स गेमने प्रेक्षक वैतागले होते. अहमदाबाद येथील चौथ्या टेस्टमध्ये तर अघटीत घडलं. पाकिस्तानी प्लेयर्सवर दगड आणि सडके टोमॅटो मारले गेले. इम्रान खान आपली टीम घेऊन दोनदा ड्रेसिंग रूममध्ये गेले. दोन्ही टीमकडून आरोप-प्रत्यारोप केले गेले. इम्रान खान यांनी बीसीसीआयला अशा पीचसाठी दोषी धरलेले. शेवटच्या बेंगलोर टेस्टसाठी स्पोर्टिंग पिच असेल असे बीसीसीआयकडून सांगितले गेले.
मॅच सुरू झाली आणि मनिंदर सिंग यांच्या स्पिनने चक्रीवादळ आणलं. ते असे बॉल घुमवत होते की, पाकिस्तानी बॅटर्सचा त्यांच्यापुढे निभावच लागला नाही. मनिंदर यांच्या 7 विकेट्सने पाकिस्तान अवघ्या 116 रन्सवर ढेर झाली. पहिल्या दिवशी दोन्ही ओपनर आऊट झाले. मात्र, इम्रान यांना चिंता सतावत होती की, मनिंदर यांच्यासारखा बॉल आपल्या स्पिनर्सकडून का स्पिन होत नाही? त्यांच हे टेन्शन कमी केल व्हाईस कॅप्टन जावेद मियांदाद यांनी. त्यांनी थेट भारताचे दिग्गज स्पिनर आणि माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांना फोन लावला. ते बेंगलोर मध्येच होते. मियांदाद यांनी आपले दोन्ही स्पिनर तौसिफ अहमद व इक्बाल कासीम यांना बेदींच्या हॉटेलवर पाठवून दिले. बेदी यांनी त्या दोन्ही स्पिनर्सना मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी त्याच दोघांनी प्रत्येकी पाच पाच विकेट घेत टीम इंडियाचा डाव 145 वर गुंडाळला.
पाकिस्तानसाठी दुसऱ्या इनिंगमध्ये साऱ्यांनीच योगदान दिले. नेहमी दहाव्या अकराव्या नंबरवर बॅटिंग करणाऱ्या इक्बाल कासिमला पाच नंबरवर पाठवून पाकिस्तानने डाव खेळला. त्यांना यशही आले. कासिमने 26 रन्स केले. दहाव्या नंबरवरील विकेटकीपर सलीम युसुफ 41 रन्स करू शकले. त्याच जोरावर पाकिस्तानने 249 रन्स बनवल्या. टीम इंडियासमोर अडीच दिवसात 220 रन्सचे लक्ष होते.
वसिम अक्रमने तिसऱ्या दिवशीच्या उर्वरित खेळात टीम इंडियाचे कंबरडे मोडले. दिवसाखेर 99 वर 4 विकेट्स गमावून यजमान बॅकफुटवर आलेले. आशा एकच होती आपली शेवटची इनिंग खेळत असलेले सुनील गावसकर. ते नॉट आऊट होते. मॅच चौथ्या दिवशी संपणार हे नक्की झालेलं.
चौथ्या दिवशी आणखी 24 रन्सची भर घालून अझर माघारी गेला. शास्त्री-कपिल देव अपयशी ठरले. मागील सतरा वर्षांपासून भारतीय क्रिकेटची धुरा वाहणाऱ्या सुनील गावसकरांच्या खांद्यावरच शेवटच्या वेळीही जबाबदारी होती. ते लढत राहिले. 180 पर्यंत संघाला घेऊन गेले. मात्र, वैयक्तिक 96 रन्सवर ते आउट झालेच. शेवटच्या वेळी भारतीय क्रिकेटचा सर्वात मोठा सुपरस्टार पवेलियनध्ये जात होता. आपल्या करिअरमधील आणखी एक लाजवाब इनिंग खेळून.
शेवटी शेवटी रॉजर बिन्नी यांनी थोडाफार प्रयत्न केला, पण ते प्रयत्न 16 रन्सने तोकडे पडले. पाकिस्तान पहिल्यांदा भारतात टेस्ट सीरिज जिंकलेला. मात्र, भारतीय क्रिकेटला ओळख मिळवून देणाऱ्या सुनील गावसकरांच्या दैदीप्यमान करियरचा शेवट मात्र पराभवाने झालेला…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा खेळलेल्या 2 टीम इंडिया, जाणून घ्या काय लागलेला निकाल
प्रचंड धक्कादायक! मधमाशांचा हल्ला ते राजाचं निधन, ‘या’ विचित्र कारणांमुळे थांबवल्या गेलेल्या मॅचेस