अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 5 ऑक्टोबरपासून वनडे विश्वचषकाचा थरार रंगेल. दीड महिना चालणाऱ्या या स्पर्धेत दहा संघ ती विश्वविजयाचे ट्रॉफी उंचावण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतील. त्यातही यजमान भारत 12 वर्षानंतर पुन्हा एकदा विश्वचषकाला गवसणी घालणार का? याकडे सर्वांचे लक्ष असेल. विश्वचषक सुरू होण्यासाठी 24 तासांपेक्षा कमी अवधी शिल्लक असताना एमएस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 2011 मध्ये मुंबईत कशाप्रकारे विश्वविजय साध्य केला हे आपण पाहूयात…
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा अखेरचा विश्वचषक (World Cup) म्हणून या विश्वचषकाला वेगळेच वलय प्राप्त झालेले. सर्व भारतीय खेळाडूंनी आपण सचिनसाठी वर्ल्डकप जिंकायचा अशी शपथ घेतलेली. पहिल्याच सामन्यात वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwagh) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी शतके झळकावली. त्याच्या जोरावर बांगलादेशला पराभूत करत भारताने शानदार सुरुवात केली. इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात स्वतः सचिनने शतक केले. मात्र, बेंगलोरमध्ये झालेला तो सामना 337 धावा झाल्यानंतरही टाय झाला. नेदरलँड आणि आयर्लंडला आपण किरकोळीत हरवलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिनची बॅट पुन्हा चालली आणि कारकिर्दीतील 99 वे शतक झळकावले. परंतु, या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. अखेर युवराजच्या शानदार शतकाने शेवटच्या साखळी सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला हरवत बाद फेरीत धडक मारली.
क्वार्टर फायनलमध्ये भारताची लढत होती मागील तीनही वर्ल्डकप जिंकून आलेल्या ऑस्ट्रेलियाशी. मात्र, टीम इंडियाने जबरदस्त सांघिक खेळ दाखवत ऑस्ट्रेलियाचे चौथ्या विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले. युवराज त्या विजयाचा शिल्पकार ठरला. सेमी फायनलमध्ये गाठ होती कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी. दोन्ही देशांचे महत्त्वाचे राजकीय नेते मोहालीत त्यादिवशी जमले होते. पाकिस्तानचा पाडाव करण्याची जबाबदारी सचिनने खांद्यावर घेत 85 धावांची अविस्मरणीय खेळी केली. पाकिस्तानला हरवत भारतीय संघाने आता फायनलमध्ये प्रवेश केलेला.
सचिनचे होम ग्राउंड असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंका फायनलमध्ये भिडली. झहीरने 3 मेडन टाकत लाजवाब सुरुवात करून दिली. मात्र, माहेला जयवर्धने उभा राहिला आणि त्याने शतकी खेळी करून श्रीलंकेला 374 अशी मोठी मजल मारून दिली. भारताने या मोठ्या धावांचा पाठलाग करताना सचिन आणि सेहवागला झटपट गमावले. गंभीर-विराटने थोडाफार संघर्ष केला. मात्र, विराट बाद झाल्यावर सर्वांना युवराजची प्रतीक्षा असताना स्वतः कर्णधार धोनी मैदानात उतरला. त्याने गंभीरला साथ देताना शानदार शतकी भागीदारी केली. गंभीर शतकाच्या जवळ असताना 97 धावांवर बाद झाला. मात्र, तोपर्यंत भारतीय संघाचा विजय जवळ आलेला. युवराज आणि धोनीने त्यानंतर पडझड होऊ दिली नाही. अखेर धोनीच्या बॅटमधून आला तो चिरकाल स्मरणात राहणारा सिक्स आणि त्यानंतर रवी शास्त्रींची कॉमेंट्री…
भारत 28 वर्षानंतर विश्वविजेता बनलेला. मायदेशात वर्ल्डकप जिंकणारा पहिला संघ बनलेला. आता रोहित आणि त्याचा संघ वानखेडेसारखी कामगिरी अहमदाबादमध्ये करतात का याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. (Story of Team India World Cup 2011 Victory)
हेही वाचा-
गाथा भारताच्या पहिल्या विश्वविजयाची! कपिल देव यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने जिंकलेलं जग
आधी विराट, मग अनुष्का! विश्वचषकापूर्वी जोडप्याने तिकीटे मागण्यावरून मित्रांना केली खास अपील, स्टोरी व्हायरल