भारतीय क्रिकेटसाठी मुंबईने जितके क्रिकेटपटू दिले आहे तितके इतर कोणत्याही राज्याने अथवा क्रिकेट संघटनेने दिले नाहीत. अगदी सुरुवातीच्या काळात विजय हजारे, विजय मर्चंट हे दोघे भारतीय फलंदाजीचा कणा होते. नंतरच्या काळात पॉली उम्रीगर, सुनील गावसकर यांनी आपल्या खेळाने एक वेगळा दर्जा भारतीय क्रिकेटला गाठून दिला. आधुनिक क्रिकेटमध्ये तर सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वोत्तम फलंदाज बनला. आजही रोहित शर्मा ते पृथ्वी शॉ हे भारतीय संघाचे नियमित सदस्य आहेत. या सर्वात एका मुंबईकर पिता-पुत्र जोडीने भारतीय संघासाठी क्रिकेट खेळले. ही पिता पुत्रांची जोडी म्हणजे दिवंगत विजय मांजरेकर आणि त्यांचे पुत्र माजी भारतीय खेळाडू व समालोचक संजय मांजरेकर. यातील विजय मांजरेकर यांचा वाढदिवस (26 सप्टेंबर).
भारताचे माजी क्रिकेटपटू राहिलेल्या दत्ताराम हिंदळेकर यांचे पुतणे असलेले मांजरेकर हे मुंबईच्या ‘बॉम्बे स्कूल ऑफ बॅटिंग’ चे विद्यार्थी. खरंतर, मांजरेकर यांना ऑफ स्पिनर व्हायचे होते. ते लँकेशायरचे फिरकी गोलंदाज रॉय टॅटरसाल यांना आपले आदर्श मानत. पण, मुंबईच्या मैदानांवर घोटून घोटून आपले तंत्र मजबूत बनवलेले मांजरेकर एक उत्तम फलंदाज झाले. मांजरेकर यांची फलंदाजी इतकी निर्दोष होती की, अवघे दोन रणजी हंगामात खेळताच त्यांची भारतीय संघात वर्णी लागली. १९५१ ला इंग्लंड विरुद्ध कोलकाता कसोटीत त्यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
पुढच्याच वर्षी लीड्स येथे इंग्लंडविरुद्ध त्यांनी आपले पहिले शतक काढले, ही त्याची विदेशी जमिनीवरील पहिली कसोटी होती. पाचव्या क्रमांकावर खेळत त्यांनी पहिल्या डावात १३३ धावा ठोकल्या. मात्र, दुसऱ्या डावात ते पहिल्या चेंडूवर बाद झाले आणि भारताने सामना गमावला. आपले पहिले शतक झळकावण्याच्या दरम्यान त्यांनी कर्णधार विजय हजारे यांच्यासोबत २२२ धावांची विक्रमी भागीदारी केली होती. १९५३ मध्ये किंग्स्टन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध ११८ धावा काढत मांजरेकर यांनी पंकज रॉय यांच्याबरोबर दुसर्या गड्यासाठी २३७ धावा जोडल्या.
१९५५-५६ ची न्यूझीलंड विरुद्ध झालेली कसोटी मालिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट मालिकांपैकी एक ठरली. यात ७७.२० च्या सरासरीने ३८६ धावा त्यांनी काढलेल्या. १९६१ च्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्यांनी जबरदस्त प्रदर्शन केले, पाच सामन्यांच्या मालिकेत ८३.७१ अशा अविश्वसनीय सरासरीने ५८६ धावा त्यांनी काढल्या.
मांजरेकर यांनी भारतासाठी जवळपास १५ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. यात, ५५ कसोटी खेळत ७ शतकांच्या सहाय्याने ३,२०८ धावा काढल्या. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावे १३ हजार धावा जमा आहेत. संपूर्ण कारकीर्दीत एकही षटकार न मारण्याचा विचित्र विक्रम मांजरेकर यांच्या नावे आहे.
आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस मांजरेकर यांना तंदुरुस्तीची समस्या सतावत होती. वाढत्या वजनामुळे, त्यांचे पदलालित्य ठीक होत नसत. याच कारणाने, त्यांनी निवृत्ती जाहीर केली होती. मांजरेकर प्रमुख गोलंदाजांना विश्रांती द्यायची असेल तर, ऑफ स्पिन गोलंदाजी देखील करत. कधीकधी काळजीवाहू यष्टिरक्षक सुद्धा ते बनत. मांजरेकर यांनी रणजी क्रिकेटमध्ये बॉम्बे ( आताची मुंबई ), महाराष्ट्र, बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान व आंध्रप्रदेश या संघाचे प्रतिनिधित्व केले.
मन्सूर अली खान पतौडी भारताचे कर्णधार असताना त्यांनी मांजरेकर यांच्यासोबत एक गंमत केली होती. त्यावेळी संपूर्ण भारतीय संघाला पतौडी यांनी भोपाळमध्ये एक प्रदर्शनीय सामना खेळण्यासाठी बोलवले. सुट्टीच्या दिवशी ते सर्व संघाला घेऊन, जंगल सफारीसाठी गेले. तेव्हा पतौडी यांनी खोटे डाकू पाठवून मांजरेकर यांना दम देण्यास सांगितले. मांजरेकरांनी त्या डाकुंचे पाय धरत म्हटले की, “मी साधा कारकून आहे, कोणी महाराज नाही. कृपा करून, मला मारू नका.”
मांजरेकर यांना घाबरलेले पाहून, पतौडी व राजसिंह डूंगरपूर यांनी समोर येऊन त्यांच्याशी ‘प्रॅन्क’ केला गेला आहे असे सांगितले.
मांजरेकर यांना भारतीय क्रिकेटमधील वेगवान गोलंदाजांना विरुद्धचे सर्वात्तम फलंदाज मानले जात. वेगवान गोलंदाजांसोबतच ते फिरकी गोलंदाजांविरुद्ध लेट कटचा खुबीने वापर करत. भारताचे महान फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांनी मांजरेकर यांचे कौतुक करताना म्हटले होते की, “जेव्हा सुनील गावसकर व गुंडाप्पा विश्वनाथ एकत्र होतील, तेव्हा एक विजय मांजरेकर तयार होतात.”
प्रसन्ना यांची ही टिप्पणी मांजरेकर यांची महानता दर्शवण्यासाठी पुरेशी आहे.
विजय मांजरेकर यांच्याप्रमाणेच, त्यांचे पुत्र संजय मांजरेकर हे देखील भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. संजय यांनी भारतासाठी ३७ कसोटी व ७४ वनडे सामने खेळले. संजय यांना देशांतर्गत क्रिकेटमधील एक मोठे फलंदाज मानले जात. सध्या ते, टेलिव्हिजनवर समालोचन करतात.
विजय मांजरेकर हे निवृत्तीनंतर, चेन्नईत स्थायिक झाले होते. १८ ऑक्टोबर १९८३ ला हृदयविकाराच्या झटक्याने अवघ्या ५२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. भारतीय क्रिकेट मधील एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून ते क्रिकेट रसिकांच्या कायम स्मरणात राहिले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाचे-
असा भारतीय क्रिकेटर ज्याला चक्क पाकिस्तानच्या मुलींनी केले होते प्रपोज