कॅमरून बॅनक्रॉफ्टच्या बॉल टॅम्परिंग प्रकरणावरील वक्तव्यानंतर उडालेली धूळ खाली बसण्याची चिन्हे नाहीत. बॅनक्रॉफ्टने बॉल टॅम्परिंग होत असल्याची कल्पना गोलंदाजांना देखील होती, असे विधान करत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आज एक प्रसिद्धी पत्रक जारी करत या आरोपांचा इन्कार केला.
आता इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने देखील यात उडी घेतली आहे. ब्रॉडने या प्रकरणात सामील असलेल्या डेव्हिड वॉर्नरने जर या घटनेवर पुस्तक लिहिले तर ते वाचायला नक्कीच मजा येईल, असे वक्तव्य केले आहे.
“वॉर्नरच्या खुलाशानंतर गोष्टी होतील उघड”
ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिकेच्या २०१८ सालच्या कसोटी सामन्यात हा प्रकार घडला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमरून बॅनक्रॉफ्ट सॅंडपेपरच्या सहाय्याने चेंडूशी छेडछाड करत असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर देखील यात सामील असल्याचे सिद्ध झाल्याने या तिन्ही खेळाडूंवर बंदीची कारवाई झाली होती. मात्र आता बॅनक्रॉफ्टने केवळ हे तीन खेळाडूच नव्हे तर गोलंदाजांनाही या गोष्टीची माहिती असल्याचे वक्तव्य केले होते. तर डेव्हिड वॉर्नरच्या मॅनेजरने पण अधिक माहिती असल्याचे सांगत या प्रकरणात पाणी मुरत असल्याच्या तर्काला पुष्टी दिली आहे.
आता स्टुअर्ट ब्रॉडने देखील या घटनेत बरेच काही चौकशीचे बाकी असल्याचे वक्तव्य केले आहे. इतकेच नाही तर डेव्हिड वॉर्नरने याबाबत पुस्तक लिहिले तर ते वाचायला मजा येईल असेही म्हंटले आहे. तो म्हणाला, “या घटनेबाबत डेव्हिड वॉर्नरच्या मॅनेजरने बराच काही खुलासा केला. मात्र याबाबत वॉर्नरने स्वतःच काही सांगितले तर अजून अनेक गोष्टी समोर येतील. मला असे वाटते की निवृत्तीनंतर वॉर्नरने यावर पुस्तक लिहिले तर ते वाचायला नक्कीच मजा येईल.”
महत्त्वाच्या बातम्या –
टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज, ‘या’ भारतीय खेळाडूंचा आहे दबदबा