यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील सर्वात मजबूत संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय संघाला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. कारण भारतीय संघाला पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात १० गडी राखून तर न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. या दोन्ही पराभवांमुळे भारतीय संघाचा उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग कठीण झाला आहे.
परंतु अफगानिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ६६ धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या आशा पुन्हा एकदा जिवंत झाल्या आहेत. यानंतर भारतीय संघासमोर पुढील आव्हान स्कॉटलॅंड संघाचे असणार आहे. या सामन्यापूर्वी सुनील गावसकर यांनी भारतीय संघाला कानमंत्र दिला आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत जर भारतीय संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल, तर भारतीय संघाला उर्वरित सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. त्यानंतरही भारतीय संघाला इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. भारतीय संघाचा पुढील सामना शुक्रवारी (५ नोव्हेंबर) स्कॉटलॅंड संघाविरुद्ध होणार आहे.
या सामन्यात भारतीय संघाची रणनिती काय असावी याबाबत बोलताना सुनील गावसकर यांनी म्हटले की, “स्कॉटलॅंड आणि नामिबिया संघांना जास्त अनुभव नाहीये, ज्यामुळे त्यांच्यावर दबाव टाकता येऊ शकतो. यासाठी संघाची निवड अतिशय महत्वाची असणार आहे. कारण स्कॉटलॅंडच्या खेळाडूंना विश्वस्तरीय गोलंदाजांना खेळण्याची सवय नाही. त्यामुळे या संघाविरुद्ध ३ फिरकी गोलंदाज खेळवण्याचा विचार वाईट नसेल.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “३ फिरकी गोलंदाजांपैकी एक गोलंदाज लेग स्पिनर असावा. कारण जेव्हा चेंडू डोळ्याच्या समोरून येतो त्यावेळी फलंदाजाला चेंडू कुठल्या लेंथवर येईल याचा अंदाज येत नाही. कारण असे चेंडू खेळताना फलंदाजाचे डोके थोडेसे हलते आणि स्थिर राहू शकत नाही. हेच कारण आहे की, लेग स्पिनर गोलंदाज चेंडू डॉट करण्यासह गडी बाद करण्याची क्षमता ठेवतो.”
“भारतीय संघाला आणखी एक काम करावे लागणार आहे. सामन्यात मोठ्या अंतराने विजय मिळवल्यामुळे संघाचा रनरेट वाढत असतो. पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भारतीय संघाला मोठा विजय मिळवण्याची गरज आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल की नाही याचा विचार न करता त्यांनी विजय मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे पराभवाच्या निराशेतून बाहेर पडण्याचा हा एकमात्र मार्ग आहे.” असे सुनील गावसकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० संघात पुनरागमन झाल्याने अश्विन झाला भावुक, तिखट प्रत्युत्तराने टीकाकारांना केले गपगार
एकसारखेच, पण आहेत वेगवेगळे! अफगाणिस्तानला मिळाला ‘बुमराह’, गोलंदाजी ऍक्शनचा व्हिडिओ चर्चेत