आयपीएलच्या १३ व्या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने मुंबई इंडियन्सला ५ विकेट्सने पराभूत केले होते. परंतु त्यानंतर मंगळवारी (२२ सप्टेंबर) राजस्थानविरुद्ध झालेल्या आपल्या दुसऱ्या सामन्यात चेन्नईला १६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानचा हा पहिलाच सामना होता. चेन्नई संघाचा पराभव झाल्यानंतर भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीबद्दल आपले परखड मत मांडले आहे.
राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांमध्ये ७ विकेट्स गमावत २१६ धावांचा भला मोठा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई संघाला २० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावत २०० धावाच करता आल्या.
धोनी ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने त्याच्याआधी सॅम करन, केदार जाधव अशा खेळाडूंना फलंदाजी क्रमवारीत बढती दिली. पण ते देखील काही खास करु शकले नाही. हे दोघेही बाद झाल्यानंतर धोनी ज्यावेळी फलंदाजीला आला, त्यावेळी चेन्नईला १६.२६ च्या धावगतीने धावा करायच्या होत्या म्हणजेच ३८ चेंडूत १०३ धावा करायच्या होत्या.
पण अशा वेळी एका बाजूने डु प्लेसिस फटकेबाजी करत असताना धोनीने आक्रमकता न दाखवत १९ व्या षटकापर्यंच १२ चेंडूत केवळ ९ धावा केल्या. त्यातच १९ व्या षटकात डु प्लेसिस ३७ चेंडूत ७२ धावा करुन बाद झाला होता. त्यामुळे अखेर २० व्या षटकात चेन्नईसाठी विजय आवाक्याबाहेर गेला.
आव्हानाचा सामना करताना धोनीच्या अशा फलंदाजीसाठी अनेक तज्ज्ञांनी आणि माजी खेळाडूंनी धोनीवर टीका केली आहे. त्यांचे असे मत आहे की, धोनीने मोठे फटके मारून आपल्या डावाची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने आवश्यक रन रेट वाढूनही क्रीजवर लय मिळविण्यासाठी वेळ घेतला. गावसकर यांनीही धोनीच्या अशा वृत्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
धोनी राजस्थानविरुद्धचा सामना जिंकणार नाही हे त्याने आधीच निश्चित केले होते, असे गावसकर म्हणाले.
‘लक्ष्य पूर्ण करण्याची ही योग्य पद्धत नाही’
स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात बोलताना गावसकर म्हणाले की, “मागील सामन्यात धोनीने सॅम करनला स्वत:च्या आधी खेळण्यासाठी पाठविले होते. करनने ६ चेंडूत १८ धावा केल्या. करनने पुढील सामन्यात पुन्हा चांगली कामगिरी करत २ षटकार ठोकले. यानंतर मला वाटले की कदाचित धोनी आता फलंदाजीसाठी येऊ शकतो. परंतु विरोधी संघाने २१६ धावांचे आव्हान देऊनही त्याच्या जागी फलंदाजीला ऋतुराज गायकवाड आला. हे त्यांच्यासाठी योग्य होणार नव्हते. जर विरोधी संघाने १६०-१७० धावा केल्या असतील, तर गायकवाडला पाठवा, जेणेकरून तो आपला खेळ दाखवू शकतो.”
“परंतु ५ विकेट्स पडल्यानंतर धोनीचे फलंदाजीला येणे, असे वाटले की धोनीने ठरवले होते की ते हा सामना जिंकणार नाहीत. कोणतेही लक्ष्य पूर्ण करण्याची ही योग्य पद्धत नाही. तुम्हाला विश्वास असला पाहिजे की तुम्ही जिंकू शकता,” असेही पुढे बोलताना गावसकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘असा’ विक्रम करणारा मुंबई इंडियन्स ठरला पहिला संघ
-सूर्यकुमार यादव ‘अशी’ कामगिरी करणारा मुंबई इंडियन्सचा ठरला सातवा खेळाडू
-रोहित शर्माने तोडला धोनीचा ‘हा’ विक्रम, आता गेल, डिविलियर्सच्या विक्रमावर आहे नजर
ट्रेंडिंग लेख-
-कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळणारे जगातील ३ सर्वोत्तम फलंदाज
-श्रीसंतने मिसबाहचा झेल पकडला आणि….
-आयपीएलमध्ये शेवटच्या षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज