भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल (kl rahul) हा सध्या तुफान कामगिरी करतोय. त्याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. परंतु त्याच्या कारकीर्दीत देखील असे अनेक वळण आले होते, ज्यामध्ये त्याला अडचणीचा सामना करावा लागला होता. मात्र या सर्व गोष्टींवर मात करून तो आता भारतीय वनडे संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतग्रस्त असल्यामुळे वनडे आणि कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (south africa vs India odi series) होणाऱ्या वनडे मालिकेत केएल राहुल वनडे संघाचे नेतृत्व करणार आहे. ही मालिका १९, २१ आणि २३ जानेवारी रोजी पार पडणार आहे.
भारतीय संघात स्थान मिळवण्याची कसरत सुरू असताना केएल राहुलच्या आयुष्यात असा क्षण आला होता, जेव्हा त्याला संघाबाहेर व्हावे लागले होते. तर झाले असे होते की, केएल राहुल आणि हार्दिक पंड्या (hardik Pandya) यांनी ‘कॉफी विद करण’ या शो मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी महिलांबद्दल कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल त्याला आणि हार्दिक पंड्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून बाहेर करण्यात आले होते. दोन आठवडे झाल्यानंतर त्यांच्यावरील निलंबन काढून टाकण्यात आले होते. परंतु त्यांना न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली नव्हती.
हेही वाचा- मोहम्मद कैफ केएल राहुलबाबत म्हणाला, ‘लग्नाच्या पार्टीचीही ऑर्डर घेतो’; वाचा संपूर्ण प्रकरण
रणजी ट्रॉफी स्पर्धेतील एकाच हंगामात हजार पेक्षा अधिक धावा
केएल राहुलने २०१० मध्ये झालेल्या आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली होती. त्याने या स्पर्धेत २८.६० च्या सरासरीने १४३ धावा केल्या होत्या. केएल राहुलने याच वर्षी कर्नाटक संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. हळूहळू त्याने या संघात आपले स्थान मजबूत करायला सुरुवात केली. २०१३ -१४ च्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्याने १० सामन्यात ६८. ८६ च्या सरासरीने १०३३ धावा केल्या होत्या. या कामगिरीनंतर त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
एमएस धोनीने पहिल्यांदा दिली संधी
केएल राहुलने २०१४-१५ दुलीप ट्रॉफी स्पर्धेत मध्य विभागाविरुद्ध खेळताना दक्षिण विभागाकडून १८५ आणि १३० धावांची खेळी केली. त्यानंतर निवडकर्त्यांनी त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान दिले होते. त्यावेळी एमएस धोनीने त्याला पदार्पण करण्याची संधी दिली होती. परंतु पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात त्याला १ धाव करता आली होती. परंतु एमएस धोनीने त्याच्यावर विश्वास कायम ठेवला आणि त्याला आणखी एक संधी दिली. त्याने पुढील सामन्यात मुरली विजयसोबत डावाची सुरुवात करताना ११० धावांची खेळी केली.
त्यानंतर मायदेशात परतल्यानंतर त्याने कर्नाटक संघाकडून खेळताना उत्तर प्रदेश संघाविरुद्ध ३३७ धावांची खेळी केली. यासह तो कर्नाटक संघासाठी तिहेरी शतक झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला होता. याच कामगिरीच्या जोरावर त्याची २०१६ मध्ये झिम्बाब्वे संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आली होती. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याने तुफानी शतक झळकावले होते. यासह तो पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला होता. याच वर्षी त्याने टी२० क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ११० धावांची खेळी केली होती. यासह त्याने खेळातील तीनही स्वरूपात शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता.
पुढे त्याची आयपीएल २०२० मध्ये पंजाब किंग्ज संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली होती. या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध खेळताना त्याने ६९ चेंडूंमध्ये १३२ धावांची खेळी केली होती. यासह तो आयपीएल स्पर्धेत सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय फलंदाज ठरला होता. त्याने या हंगामात सर्वाधिक ६७० धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती. तर २०२१ मध्ये त्याने ६२६ धावा केल्या. यासह तो सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला.
महत्वाच्या बातम्या :
…आणि चेतन शर्मा यांच्यावर आली होती तोंड लपवून फिरण्याची वेळ, जाणून घ्या पूर्ण प्रकरण
टीकेचा धनी ठरलेल्या रूटची ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केली पाठराखण; म्हणाला…
हे नक्की पाहा :