भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) नुकताच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स ही स्पर्धा खेळताना दिसला. निवृत्त खेळाडूंच्या या स्पर्धेत इंडिया चॅम्पियन्स संघाने विजय मिळवला. या स्पर्धेनंतर एका मुलाखतीत रैना याने विद्यमान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तीन सर्वोत्तम फलंदाजांची नावे सांगितली.
डब्ल्यूसीएल 2024 अंतिम सामन्यात इंडिया चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्सचा पाच गडी राखून पराभव केला. त्यानंतर त्याने आपले मत व्यक्त केले. स्पर्धेला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाबद्दल तो बोलला. त्याचवेळी त्याला वर्तमान क्रिकेटमधील तीन सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रैना म्हणाला, “मला तरी वाटते आत्ता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक उत्कृष्ट फलंदाज आहेत. मात्र, खरंच त्यातून निवड करायची झाल्यास मी रोहित शर्मा, विराट कोहली व जो रूट यांची निवड करेल. त्यांच्याकडे सर्व परिस्थितीत खेळण्याचा अनुभव आणि कौशल्य आहे.”
नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने आक्रमक फलंदाजी करत संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते. तसेच तो मागील मोठ्या कालावधीपासून कसोटी व वनडे संघाच्या यशात देखील सिंहाचा वाटा उचलत आहे. दुसऱ्या बाजूला विराट कोहली हा मागील जवळपास दीड दशकांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतोय. त्याच्या नावे फलंदाजीतील अनेक विक्रम असून, तो सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. तर, जो रूट हा सध्या केवळ इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेट खेळताना दिसतो.
दरम्यान रैना याने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आणि 2021 मध्ये आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर समालोचक म्हणून दुसरी इनिंग सुरू केलेली आहे. यासोबतच तो निवृत्त क्रिकेटपटूंसाठी असलेल्या अनेक लीगमध्ये देखील खेळताना दिसतो. डब्लूसीएल अंतिम सामन्यात युवराज सिंग याच्या नेतृत्वातील इंडिया चॅम्पियन्स संघाने पाकिस्तानला मात दिली. रैना या सामन्यात केवळ चार धावांचे योगदान देऊ शकला. मात्र, त्यानंतर सेलिब्रेशनचा त्याचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंका दौऱ्यापासून होणार गौतम गंभीरच्या नव्या युगाची सुरुवात
आयपीएलमध्ये आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या ‘या’ खेळाडूला कांगारुंनी दिलं संघात स्थान
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला धमकी! “भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी आला नाही तर…”