भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना रविवारी(२५ जुलै) कोलंबोच्या आर प्रेमादासा स्टेडियमवर खेळला गेला. जिथे भारताने ३८ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली. मात्र, या पहिल्या सामन्याचा नायक ठरलेला सूर्यकुमार यादव व या सामन्यात टी२० पदार्पण करणारा सलामीवीर पृथ्वी शॉ हे मंगळवारी (२७ जुलै) होणाऱ्या दुसऱ्या सामन्याला मुकू शकतात.
या कारणाने शॉ व सुर्यकुमार मुकू शकतात दुसऱ्या सामन्याला
टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादव व पृथ्वी शॉ खेळताना दिसण्याची शक्यता काहीशी कमी झाली आहे. कारण, या दोघांची इंग्लंड दौऱ्यासाठी बदली खेळाडू म्हणून निवड झाल्याने ते इंग्लंडला रवाना होऊ शकतात. ते जितक्या लवकर इंग्लंडला जातील तेवढा त्यांचा क्वारंटाईन कालावधी कमी होईल. कारण, एका बायो-बबलमधून दुसऱ्या बायो-बबलमध्ये प्रवेश केल्यास खेळाडूंना क्वारंटाईन कालावधीत शिथीलता मिळते.
या खेळाडूंना मिळू शकते संधी
पृथ्वी व सूर्यकुमार इंग्लंडला रवाना झाल्यास दुसऱ्या टी२० सामन्यासाठी भारतीय संघात बदल होणे निश्चित आहे. तसे झाल्यास युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड अथवा देवदत्त पडिक्कल यांना पदार्पणाची संधी मिळू शकते. तसेच, अनुभवी मनीष पांडे हा देखील संघात परत येऊ शकतो. भारतीय संघासाठी अष्टपैलू हार्दिक पंड्या यांचा खराब फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. मात्र, तरीही तो या सामन्यात खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे.
भारताने घेतली मालिकेत आघाडी
पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारतीय संघाने सूर्यकुमार यादव (५०), कर्णधार शिखर धवन (४६) व संजू सॅमसन (२७) यांच्या योगदानाच्या बळावर २० षटकांत पाच गडी गमावून १६४ धावा केल्या होत्या. त्यानंतर १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ १८.३ षटकांत १२६ धावांत गडगडला. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
थाला फॅन्सची इच्छा झाली पूर्ण; ‘रेट्रो जर्सी’मध्ये दिसला एमएस धोनी, फोटो भन्नाट व्हायरल
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल श्रीलंका विरुद्ध भारत संघातील दुसरा टी२० सामना? जाणून घ्या सर्वकाही