सूर्यकुमार यादव गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून तो टीम इंडियासाठी मधल्या फळीतील महत्त्वाचा कणा बनला आहे. अलीकडेच तो आयसीसी टी२० क्रमवारीत नंबर २ खेळाडू बनला आहे. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या दोन टी-२० सामन्यांमध्ये तो पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकून टी-२० क्रिकेटचा मुकुट आपल्या डोक्यावर सजवू शकतो. यासाठी त्याला विंडीजविरुद्ध चोथ्या आणि पाचव्या टी-२० सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल.
टी-२० क्रिकेटमध्ये उल्लेखनिय कामगिरी
सूर्यकुमार यादवने मार्च २०२१ मध्ये भारतीय संघासाठी टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही आणि टीम इंडियासाठी अनेक मॅच विनिंग इनिंग्स खेळल्या. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यातही त्याने ४४ चेंडूत ७६ धावा केल्या होत्या. शिवाय नुकतीच इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत सुर्यकुमार यादवने पहिले शतक झळकावले होते.
भारताचा सर्वोत्कृष्ट टी-२० फलंदाज
वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या झंझावाती कामगिरीचा सूर्यकुमार यादवला फायदा झाला आणि तो आयसीसी टी-२० क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. टॉप-१० मध्ये तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. सूर्यकुमार यादवला टी-२०मध्ये भारताचा सर्वोत्तम फलंदाज होण्यासाठी ५०६ दिवस लागले. त्याने केवळ २२ सामन्यांमध्ये ३८.११च्या सरासरीने आणि १७५.६०च्या स्ट्राइक रेटने ६४८ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये सूर्यकुमार यादवने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत.
बाबर आझमचा मुकुट हिरावला जाऊ शकतो
टी-२० क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत बाबर आझमने चांगल्या कामगिरीच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. बाबर आझम ८१८ गुणांसह टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. सूर्यकुमार यादवला ८१६ गुण आहेत. इनसाइड स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, जर सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात ३०-४० धावा केल्या तर तो टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचेल. अशा स्थितीत तो टी-२० क्रिकेटमधून बाबर आझमची राजवट संपुष्टात येईल.
आयसीसी क्रमवारी कशी ठरवली जाते?
- कोणत्याही फलंदाजाला दुसऱ्या डावात आयसीसी रेटिंग गुणांमध्ये सर्वाधिक फायदा होतो.
- जर एखाद्या फलंदाजाने कठीण काळात धावा केल्या तर त्याला अधिक रेटिंग गुण मिळतात.
- कमी स्कोअरिंग मॅचमध्ये, बॅट्समनला जास्त स्कोअरिंग मॅचपेक्षा जास्त रेटिंग पॉइंट मिळतात.
- जर फलंदाजाने सर्वाधिक धावा केल्या आणि संघ जिंकला तर त्याला सर्वाधिक गुण मिळतात. बलाढ्य संघाविरुद्ध धावा केल्यास त्याला बोनस रेटिंग गुणही मिळतात. तसेच, खेळाडू नाबाद राहिला तरीही त्याला बोनस गुण मिळतात.
चौथ्या क्रमांकाचे मोठे दावेदार
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारताला आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेत भाग घ्यायचा आहे.सूर्यकुमार यादव चांगलाच फॉर्मात आहे. अशा स्थितीत त्याची आशिया चषकात निवड होण्याची खात्री आहे. तो मधल्या फळीत आणि टॉप ऑर्डरमध्ये धावा करणारा महान खेळाडू ठरत आहे. जेव्हा सूर्यकुमार यादव लयीत असतो तेव्हा तो कोणत्याही गोलंदाजीच्या आक्रमणाला उत्तर देऊ शकतो. अशा परिस्थितीत जर केएल राहुलने संघात सलामीवीर म्हणून पुनरागमन केले तर चोथ्या क्रमांकावर विना हरकत सुर्यकुमार यादवला संघात सामील करण्यात येईल आणि चोथ्या क्रमांकावर दावा सांगणाऱ्या इतर खेळाडूंवर संघाबाहेर राहण्याची वेळ येऊ शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चौथ्या टी२०पूर्वी कार्तिकची वेस्ट इंडिजला चेतावणी; म्हणाला, ‘मालिका जिंकण्याच्या हेतूनेच…’
बहुप्रतिक्षित भारत-विंडीज चौथ्या टी२० सामन्यात पाऊस मोडता घालणार? वाचा संपूर्ण रिपोर्ट
भारतापुढे तगड्या इंग्लंडचे आव्हान, उपांत्य सामन्यात ‘या’ मजबूत ११ खेळाडूंना उतरवणार हरमनप्रीत