आयपीएल 2024 मध्ये लागोपाठ तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा संघ अडचणीत सापडला आहे. मुंबईला स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर आगामी सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील. तसं न झाल्यास पाच वेळच्या विजेत्या संघाचे प्लेऑफमध्ये जाण्याचे सर्व मार्ग लवकरच बंद होतील.
दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो लवकरच संघाकडून खेळताना दिसणार आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीनं बुधवारी सूर्यकुमारला तंदुरुस्त घोषित केलं.
सूर्यकुमार यादव गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ क्रिकेटपासून दूर आहे. बीसीसीआय आणि एनसीएचे फिजिओ सूर्यकुमारच्या दुखापतीबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नव्हते, त्यामुळे त्यांनी यादवला तंदुरुस्त घोषित करण्यापूर्वी निरीक्षणाखाली ठेवलं होतं. सूर्यकुमार आता दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसू शकतो. हा सामना 7 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
सूर्यकुमार यादवला काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. यादव ‘हर्निया’ नावाच्या समस्येनं त्रस्त असल्याचं सांगण्यात आलं. याच्या उपचारासाठी तो जर्मनीला गेला होता. जानेवारी महिन्यात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला एक महिना लागू शकतो, असा अंदाज होता. परंतु आता बराच काळ झाला तो मैदानापासून दूर आहे.
सूर्यकुमार यादवचा आयपीएलमधील रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्यानं आयपीएलमध्ये 139 सामन्यांच्या 124 डावांमध्ये 3249 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 31.85 आणि स्ट्राईक रेट 143.32 राहिला. 103 ही त्याची आयपीएलमधील सर्वात मोठी धावसंख्या आहे. विशेष म्हणजे सूर्यकुमारच्या नावे टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 4 शतकं आहेत. तो गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा टी 20 सामना खेळला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
याच्या गोलंदाजीत हेल्मेटमुळे वाचला अनेकांचा जीव! जाणून घ्या, कसा घडला वेगाचा बादशाह मयंक यादव
लखनऊला बसला मोठा धक्का! 6.4 कोटी रुपयांचा स्टार वेगवान गोलंदाज संपूर्ण हंगामातून बाहेर
टी-शर्ट काढून भन्नाट डान्स…छोट्या चाहत्यानं स्टेडियममध्ये केली हवा! ‘तो’ प्रसिद्ध मीम पुन्हा चर्चेत