भारत आणि वेस्ट इंडिज (INDvWI ODI Series) दरम्यान अहमदाबाद येथे तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान भारतीय संघाने ६ गड्यांनी विजय नोंदवत विजयी सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केल्यानंतर फलंदाजांनी अत्यंत शिस्तबद्ध फलंदाजी करताना संघाला विजय मिळवून दिला. भारताचे चार फलंदाज एकापाठोपाठ बाद झाल्याने संघ काहीसा अडचणीत आला होता. मात्र, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने एक शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने या मॅचविनिंग खेळीनंतर बोलताना विरोधी संघाचा कर्णधार कायरन पोलार्डबाबत एक महत्वाचा खुलासा केला.
सूर्यकुमारची लाजवाब खेळी
वेस्ट इंडीज संघाने भारतीय संघासमोर ठेवलेल्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा व ईशान किशन यांनी ८४ धावांची सलामी दिली. रोहित ६० धावांवर बाद झाल्यानंतर विराट कोहली ८ धावा काढून बाद झाला. ईशान किशन व रिषभ पंत अनुक्रमे २८ व ११ धावा केल्या. त्यानंतरही भारताला विजयासाठी ६१ धावांची गरज होती. भारतीय संघ काहीसा संकटात सापडलेला असताना पाचव्या क्रमांकावरील सूर्यकुमार यादव व दीपक हुडा यांनी नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. सूर्यकुमारने ३४ व दीपकने २६ धावांचे योगदान दिले.
पोलार्डबद्दल केला खुलासा
सुर्यकुमारने या सामन्यानंतर मुलाखत दिली. यामध्ये बोलताना त्याने विरोधी संघाचा कर्णधार कायरन पोलार्डबाबत एक खुलासा केला. पोलार्ड आपल्याला या खेळीदरम्यान उकसवत असल्याचे त्याने म्हटले. तो म्हणाला,
“सामन्यावेळी पोलार्ड मला अनेकदा डिवचत राहिला. तो म्हणाला, सूर्या तू मिड विकेटला का खेळत नाहीये? जसे तू आयपीएलमध्ये खेळतोस. मात्र, मी यावर उत्तर देण्याचे टाळले.” पोलार्ड व सूर्यकुमार हे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतात.
महत्वाच्या बातम्या-
केएल लागला तयारीला! दुसऱ्या वनडेत दम दाखवायला उपकर्णधार उत्सुक
ओ शेठ.. तुम्ही नादच केलाय थेट! रोनाल्डोने गाठला ४०० मिलियन इंस्टाग्राम फॉलोवर्सचा जादुई आकडा