भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सध्या भारताच्या कसोटी संघातून बाहेर आहे. पुजारा बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये होता. रणजी ट्रॉफी २०२२ च्या साखळी फेरीतह तीन सामन्यांत विशेष काही दाखवू शकला नाही. मात्र, आता इंग्लंडमधून त्याच्यासाठी चांगली बातमी येत आहे. काउंटी संघ ससेक्सने त्याला करारबद्ध (Sussex Sign Cheteshwar Pujara) केले आहे. भारताच्या संघाला जुलैमध्ये इंग्लंडमध्ये एक कसोटी सामना खेळायचाय. दमदार कामगिरी केल्यास तो त्या सामन्यात निवडीसाठीही उपलब्ध होऊ शकतो.
ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडने राष्ट्रीय संघाशी असलेल्या वचनबद्धतेमुळे ससेक्ससोबतचा करार मोडला आहे. अशा परिस्थितीत ससेक्स संघात काही परदेशी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी एक नाव चेतेश्वर पुजाराचे आहे. ऑस्ट्रेलियाचा युवा यष्टीरक्षक सलामीवीर फलंदाज जोश फिलिपी यालाही ससेक्सने करारबद्ध केले आहे. चेतेश्वर पुजारा ससेक्ससाठी २०२२ चॅम्पियनशिपमधील जास्तीत जास्त सामने खेळू शकतो. पुजारा हंगामातील पहिल्या सामन्यापासूनच संघाशी जोडला जाईल.
क्लबशी करारबद्ध झाल्यानंतर पुजाराने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “आगामी काउंटी हंगामासाठी ऐतिहासिक ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबचा भाग होऊन मी उत्साहित आणि सन्मानित आहे. मी लवकरच ससेक्स कुटुंबात सामील होईल. तसेच, त्यांच्या समृद्ध क्रिकेट इतिहासाचा भाग बनेल. गेल्या अनेक वर्षांपासून मी इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्याचा नेहमीच आनंद लुटला आहे. त्यामुळे नवीन हंगामात क्लबच्या यशात योगदान देण्यासाठी उत्सुक आहे.”
मोहम्मद रिझवानही खेळणार ससेक्ससाठी
पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान हा देखील पुढील हंगामात ससेक्स संघासाठी खेळताना दिसेल. पुजाराप्रमाणेच त्याचा करारही काउंटी चॅम्पियनशिप व वनडे कपपर्यंत असेल. ससेक्स लवकरच आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा करणार आहे.
महत्वाच्या बातम्या-