क्रिकेटमध्ये जेव्हा केव्हाही रोमांचक सामन्यांची आठवण काढली जाईल, तेव्हा २०१६ साली झालेल्या टी२० विश्वचषकातील भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यांची नक्कीच चर्चा होईल. तसं तर टी२० क्रिकेट रोमांचक प्रकार आहे, त्यातही विश्वचषक म्हटल्यावर प्रत्येक सामन्याला वेगळे महत्त्व प्राप्त होते. असाच भारत आणि बांगलादेश संघात २०१६ च्या टी२० विश्वचषकात करो वा मरो अशा स्थितीतील सामना २३ मार्च २०१६ रोजी झाला होता. ज्यात भारताने केवळ एका धावेने विजय मिळवत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला होता.
भारतासाठी करो वा मरो सामना
टी२० विश्वचषक २०१६ मधील सुपर १० फेरीत भारतीय संघ पहिला सामना पराभूत झाला होता, तर दुसरा सामना जिंकला होता. त्यामुळे बांगलादेशविरुद्धचा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा बनला होता. या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला असता, तर स्पर्धेतून बाहेर जाण्याची नामुष्की भारतावर ओढावू शकली असती. विशेष म्हणजे ही स्पर्धा भारतात होत होती.
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना
भारत आणि बांगलादेश संघातील हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला होता. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. भारताने २० षटकांत ७ बाद १४६ धावा केल्या.
भारताकडून सुरेश रैनाने सर्वाधिक ३० धावा केल्या होत्या. तसेच विराट कोहलीने २४ आणि शिखर धवनने २३ धावा केल्या होत्या. यांच्याशिवाय अन्य कोणाला २० पेक्षा अधिक धावा करता आल्या नव्हत्या. बांगलादेशकडून अल-अमिन हुसैन आणि मुस्तफिजूर रेहमान यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर बांगलादेश संघ १४७ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरला, पण त्यांची सुरुवातही खराब झाली. १८ व्या षटकापर्यंत त्यांनी ६ विकेट्स गमावत १२६ धावा केल्या होत्या. मात्र, मुश्फिकूर रहीम आणि महमुद्दुलाह यांनी बांगलादेशचे आव्हान सामन्यात कायम ठेवले होते.
त्यानंतर अखेर बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात ११ धावांची गरज होती आणि भारताकडून हे षटक हार्दिक पंड्या टाकत होता. बांगलादेशकडून या षटकाच्या पहिल्या चेंडूवर महमुद्दुलाहने १ धाव घेतली. त्यामुळे फलंदाजीसाठी मुशफिकूर रहीम स्ट्राईकवर आला. त्याने पुढच्या २ चेंडूवर २ चौकार ठोकले. त्यामुळे भारतापासून विश्वचषक दूर जाताना दिसत होता.
त्यावेळी बांगलादेशला ३ चेंडूत २ धावांची गरज होती. पण उत्साहाच्या भरात मोठा फटका खेेळताना रहिम शिखर धवनच्या हातून झेलबाद झाला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर महमुद्दुलाह देखील रविंद्र जडेजाकडे झेल देऊन बाद झाला, त्यामुळे बांगलादेशला शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज होती. यावेळी हार्दिकने अखेरचा चेंडू स्टंपच्या बाहेर टाकला, ज्यावर शुभागता होमने फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटला लागला नाही, मात्र शुभागता आणि मुस्तफिजूर रेहमान एक धाव काढण्यासाठी धावले.
परंतु, हा चेंडू पडण्याआधीच भारताचा तत्कालिन कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीने एका हातातील ग्लव्ह्ज काढून ठेवला होता. त्यामुळे त्याने हार्दिकने टाकलेला हा चेंडू लगेचच पकडला आणि बांगलादेशची एक धाव पूर्ण होण्यापूर्वीच पळत जाऊन चेंडू स्टंपला लावला. त्यामुळे मुस्तफिजूर रेहमान धावबाद झाला आणि भारताने हा सामना १ धावेने जिंकला.
Last ball in a T20 game at the Chinnaswamy, two runs needed, MS Dhoni in the thick of things … and a run-out!
The OG edition 😉 #WT20 #Dhoni #RCBvCSK #IPL pic.twitter.com/mPMG42IS1X
— ICC (@ICC) April 22, 2019
पुढे जाऊन भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले, मात्र उपांत्य फेरीत भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या –
जेसन रॉयवर दंडासहित २ सामन्यांची बंदी! इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून कडक कारवाई
आयपीएल २०२२ सामन्यांच्या तिकीट विक्रीला कधी होणार सुरुवात? घ्या जाणून
या ४ कारणांमुळे २००३ विश्वचषक ठरला जगातील आजपर्यंतचा सर्वश्रेष्ठ क्रिकेट विश्वचषक