टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत झिम्बाब्वे क्रिकेट संघाने शानदार कामगिरी केली. त्यांनी आपल्या दमदार प्रदर्शनाने सर्वांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे, त्यांनी सुपर 12 फेरीपर्यंत मजल मारली आणि दुसऱ्या टप्प्यात पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाला मात देत कायापालट केला. संघाच्या प्रदर्शनामध्ये अष्टपैलू सिकंदर रझा याने सिंहाचा वाटा उचलला. त्याने या स्पर्धेत फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात दमदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. यादरम्यान त्याने तीन वेळा सामनावीर पुरस्कार पटकावले. यामुळे झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग इर्विन याला रझाला खास गिफ्ट म्हणून 3 घड्याळे द्यावी लागली.
खरं तर, स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वीच संघाचा कर्णधार क्रेग इर्विन (Craig Ervine) आणि सिकंदर रझा (Sikandar Raza) यांनी एकमेकांना वचन दिले होते. ते वचन असे होते की, जो खेळाडू या स्पर्धेत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार पटकावेल, तो दुसऱ्या खेळाडूला तितकीच घड्याळे भेट म्हणून देईल. विशेष म्हणजे, इर्विन या स्पर्धेत एकदाही सामनावीर पुरस्कार पटकावू शकला नाही. दुसरीकडे, रझाने हा पुरस्कार तीन वेळा आपल्या नावावर केला. यामुळे संघाच्या कर्णधाराने रझाला तीन घड्याळे भेट म्हणून दिली. यावेळी भेट देताना इर्विन निराश होऊन रडण्याचे नाटकही करत होता, ज्याचा फोटो रायन बर्ल (Ryan Burl) याने ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
रायनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर क्रेग इर्विन आणि सिकंदर रझा (Craig Ervine And Sikandar Raza) या दोघांचा फोटो शेअर केला. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “एक व्यक्ती जो आपल्या वचनावर ठाम आहे. कर्णधाराने स्पर्धेत शानदार कामगिरी केल्यामुळे सिकंदर रझासाठी 3 घड्याळे विकत घेतली.”
Here’s a man sticking to his word! Captain Slug buying @SRazaB24 his 3 watches after his superb World Cup campaign pic.twitter.com/2qgq9acptQ
— Ryan Burl (@ryanburl3) November 10, 2022
सिकंदर रझाची कामगिरी
टी20 क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या स्पर्धेत सिकंदर रझा हा शानदार लयीत होता. त्याने या स्पर्धेत एकूण 8 सामने खेळले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 27.37च्या सरासरीने 219 धावा निघाल्या. या धावा त्याने 147.97च्या स्ट्राईक रेटने चोपल्या. दुसरीकडे, गोलंदाजी करताना रझाने 15.60च्या सरासरीने 10 फलंदाजांना तंबूचा रस्ता धरायला भाग पाडले. (T20 World Cup 2022 Craig Ervine gifts three watches to Sikandar Raza Ryan Burle shared photos see here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाची पाठराखण केल्यानंतर सचिन होतोय ट्रोल; चाहते म्हणतायेत…
माजी इंग्लिश कर्णधाराची भारतावर सडकून टीका! म्हणाला, “एकदिवसीय विश्वचषकानंतर त्यांनी काय केलय?”