आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत शनिवारी (३० ऑक्टोबर) रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने होते. शेवटच्या षटकापर्यंत सुरू राहिलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने बाजी मारली आणि ४ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात ३ गडी बाद करणाऱ्या तबरेज शम्सीच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
दक्षिण आफ्रिका संघाचा फिरकी गोलंदाज तबरेज शम्सी सध्या आयसीसी टी-२० गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. तसेच तो या यादीत अव्वल स्थानी का आहे, हे तो नेहमी सिद्ध देखील करत असतो. त्याने श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ३ गडी बाद करताच त्याच्या नावे एका वर्षात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याच्या विक्रमाची नोंद झाली आहे. असा कारनामा करत त्याने युगांडाचा गोलंदाज दिनेश नाकरानी आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अँड्र्यू टायचा विक्रम मोडून काढला आहे.
तबरेज शम्सीने २०२१ वर्षात एकूण २० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याला ३२ गडी बाद करण्यात यश आले आहे. दिनेश नाकरानीने देखील २०२१ मध्ये खेळलेल्या १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३१ गडी बाद केले आहेत. तर अँड्र्यू टायने २०१८ मध्ये ३१ गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. तबरेज शम्सीने श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात भानुका राजपक्षे, अविश्का फर्नांडो आणि वनिंदू हसरंगा यांना बाद केले आहे.
दक्षिण आफ्रिका संघाने ४ गडी राखून मिळवला विजय
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर श्रीलंका संघाकडून प्रथम फलंदाजी करताना पथुम निसंकाने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. तर चरिथ असलंकाने २१ आणि दसून शनाकाने ११ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर श्रीलंका संघाला २० षटक अखेर १४२ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेंबा बावूमाने सर्वाधिक ४६ तर डेविड मिलरने नाबाद २३ आणि एडेन मार्करमने १९ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंका संघावर ४ गडी राखून विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!
कधी, कुठे आणि कसा पाहाल टी२० विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना? जाणून घ्या एका क्लिकवर
मानलं भावा! आई व्हेंटिलेटरवर असूनही बाबर आझम भारताशी भिडला, अर्धशतकी योगदान देत इतिहास बदलला






