पुणे। करोनाच्या जागतिक साथीतून सावरत बहुतेक क्रीडाप्रकारांचे वेळापत्रक पूर्ववत सुरु झाले असताना पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले हा सुद्धा सुमारे अडीच वर्षांच्या कालावधीनंतर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. थायलंडमधील क्रॉस कंट्री रॅली मालिकेद्वारे तो कारकिर्दीचा नव्याने प्रारंभ करेल. येत्या शनिवारी-रविवारी ही रॅली होत आहे.
थायलंडमध्ये संजयने बरेच यश मिळविले आहे. त्यामुळे पुनरागमनासाठी त्याने याच देशाची निवड केली. याआधी 2019 मध्ये त्याने थायलंडमधील कांचनाबुरी येथील रॅलीत भाग घेतला होता. त्यावेळी इंजिन नादुरुस्त झाल्यामुळे त्याला रॅली पूर्ण करता आली नव्हती.
यावेळीही संजयने डेलो स्पोर्टस संघाशी करार केला आहे. तो इसुझू युटिलीटी ही गाडी चालवेल. थायलंडचा थान्याफात मिनिल त्याचा नॅव्हीगेटर असेल. संजयने 2018 मध्ये त्याच्या साथीत थायलंड रॅली मालिकेत भाग घेतला होता. त्यावेळी चार फेऱ्यांच्या मालिकेत मिनील याला नॅव्हीगेटरचे जेतेपद मिळाले होते. तेव्हा प्रारंभी एका रॅलीतून तांत्रिक बिघाडामुळे माघार घ्यावी लागल्यामुळे त्याच्या ड्रायव्हरच्या गटातील जेतेपदाच्या आशा संपुष्टात आल्या होत्या, पण नॅव्हीगेटरच्या यशास हातभार लावणे त्याच्यासाठी आनंददायक ठरले होते.
मिनीलबद्दल संजयने सांगितले की, तो अत्यंत तरबेज आणि प्रतिभासंपन्न नॅव्हीगेटर आहे. इंग्रजी भाषेवर त्याचे प्रभुत्व नाही, पण रॅलीमधील सर्वांत महत्त्वाचा भाग असलेल्या पेस नोट्स तो व्यवस्थित वाचतो. अशा रॅलींसाठी तो योग्य नॅव्हीगेटर आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग करणे सुकर होते.
संजयने सांगितले की, स्पर्धात्मक पातळीवर सहभागी होणे केव्हाही चांगले असते. त्यासाठी थायलंड हे एक आदर्श ठिकाण आहे.
संजयला स्थिरावण्यास थोडा वेळ लागू शकतो, पण आपली तयारी कितपत झाली आहे हे आजण्यासाठी केव्हा तरी प्रारंभ करावा लागतो, असे सांगून संजय म्हणाला की, मी रॅलीमध्ये वेळ आणि पैसा अशा दोन्ही पातळ्यांवर बरीच गुंतवणूक केली आहे. कारकिर्द पुन्हा सुरु करून मला कामगिरी उंचावणे क्रमप्राप्त आहे. करोनाचा काळ प्रत्येकाप्रमाणेच मला सुद्धा वाईट गेला, पण कुठे तरी नवा प्रारंभ करावा लागतो. माझा दृष्टिकोन हाच आहे. डकार रॅलीत भाग घेण्याची माझी महत्त्वाकांक्षा आहे. त्यादृष्टिने क्रॉसकंट्री रॅलीतील सहभाग उपयुक्त ठरेल.
यंदाच्या मोसमात या मालिकेतील पहिली फेरी पॅकाँग नदीच्या किनाऱ्यालगत असलेल्या चाचाएंगासाओ प्रांतात होईल. तेथे प्रारंभ झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात कांचनाबुरी या ऐतिहासिक शहरात मालिकेची सांगता होईल. द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाई या प्रसिद्ध ब्रिटीश-अमेरिकन युद्धपट त्याच परिसरात चित्रीत झाला होता.
चाचोएंगसाओ येथे बहुचर्चित असा पिसवांचा बाजार भरतो. पारंपरिक अन्न म्हणून तेथे पिसवांची विक्री होते. शोभेच्या झाडांची बाजारपेठही तेथे आहे. बुद्धाच्या पुतळ्यासाठी सुद्धा हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते. भव्य अशा सेंट्रल पार्कमध्ये असंख्य हॉटेल आहेत.
संजय टकले 2018 मध्ये जागतिक रॅली मालिकेत (डब्लूआरसी) भाग घेणारा पहिला नोंदणीकृत भारतीय स्पर्घक बनला. त्याने फिनलंडमधील जागतिक रॅली मालिकेच्या दुसऱ्या श्रेणीत भाग घेतला. संपूर्ण मोसमात भाग घेण्याएवजी पहिली पायरी म्हणून त्याने जगातील सर्वाधिक वेगवान रॅलीत आपले कौशल्य आजमावण्यास प्राधान्य दिले.
2019च्या मोसमात संजयने टीडब्लूसी रॅलीसाठी चियांग-माई येथील इट्टीपोन सिमाराक्स याची नॅव्हीगेटर म्हणून निवड केली होती. त्याच्या साथीतील सहभाग संजयसाठी बहुमोल ठरला. याचे कारण सिमाराक्सने जपानचा ड्रायव्हर ताकुमा अओकी याच्या साथीत भाग घेतला होता. मोटो जीपी मालिकेत दोन्ही पाय क्रॅसमध्ये गमावल्यानंतरही अओकीने जिद्दीच्या जोरावर तसेच मोटरस्पोर्टसवरील प्रेम आणि निष्ठेमुळे पुरागमन केले. अॅक्लीलरेटर, क्लच आणि ब्रेक हाताने ऑपरेट करीत त्याने रॅली केल्या.
ताकुमा हा होंडा फॅक्टरी संघाचा 500 सीसी गटात माजी जगज्जेता मिक डुहान याचा सहकारी होता. संजयने सांगितले की, मोटरस्पोर्टस मध्ये अशा थक्क करणाऱ्या स्पर्धकांमुळे प्रेरणा मिळते. अशावेळी करोनामुळे माझे काही मोसम वाया केले तरी मी नव्याने प्रारंभ नक्कीच करू शकतो. हार-जीत हा खेळाचाच एक भाग आहे. आता मी पुनरागमनास सज्ज झालो आहे.
टीडब्लूसी रॅली मालिकेचे वेळापत्रक
पहिली फेरी – 23-24 एप्रिल – चाचोएंगसाओ
दुसरी फेरी – 25-26 जून – सुरथ्थानी
तिसरी फेरी – 1-2 ऑक्टोबर – काम्फाएंगपेट
चौथी फेरी – 19-20 नोव्हेंबर – कांचनाबुरी