मासिक पाळी हा जवळपास प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. त्यामुळे स्त्रीयांना प्रत्येक महिन्यात मासिक पाळीला सामोरे जावे लागते. रोजच्या धावपळीच्या कामांमध्ये अनेकदा महिलांना मासिक पाळीच्या दिवसात काही समस्यांना सामोरे जावे लागते. महिला खेळाडूंनाही अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. आजकाल अनेकदा याविषयी उघडपणे चर्चा केली जाते. नुकतेच इंग्लंडची क्रिकेटपटू टॅमी ब्यूमॉन्ट हिने याबद्दल आपला अनुभव सांगितला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये पाढंरी जर्सी घालून खेळावे लागत असल्याने अनेकदा महिला खेळाडूंना त्यावर मासिक पाळीमुळे रक्तस्त्रावाचे डाग पडण्याची भीती असते. अशीच भीती ब्यूमॉन्टलाही होती. तिने नुकताच भारताविरुद्ध कसोटी सामना खेळला. ज्यादिवशी कसोटी सामना सुरु होणार होता. त्याचदिवशी तिच्या मासिक पाळीचा पहिला दिवस होता. त्यामुळे तिला चिंता होती की सामना लाईव्ह दाखवला जात आहे, अशा वेळी मासिक पाळीचा डाग दिसला तर काय होईल.
याबद्दल तिने द स्टफशी बोलताना सांगितले की ‘मी सलामीला फलंदाजी करते. त्यामुळे मी पंचांना विचारले की ड्रिंक्स ब्रेकचे नियम काय आहेत? ती एक महिला पंच होती, त्यामुळे मी तिला सांगितले की हा पहिला दिवस आहे. त्यावेळी पंच मला म्हणाली की ‘मी समजू शकते, ही कोणतीही समस्या नाही, आपण याचा सामना करु शकतो.’ दुसऱ्याच दिवशी एक भारतीय फलंदाजही याच कारणामुळे मैदानाबाहेर गेली होती. मला वाटते त्यावेळी प्रत्येकजण आगामी आठवड्यात त्यांचे पिरियड्स कधी येणार आहेत, याबद्दल माहिती घेत होते. आमच्यातील अनेकांसाठी कसोटीसाठी पांढरे कपडे घालणे कठीण होते, कारण चहूबाजूंनी चिंता होती.’
पाच कसोटी सामने खेळलेली ब्यूमॉन्ट पुढे म्हणाली, त्या पाच दिवसात इंग्लंडचा जवळपास अर्धा संघ पिरियड्सवर होता. तसेच नेट स्कीवरला सामन्याच्या चौथ्या दिवशी पिरियड्स आले. तिच्याकडे मागील सामन्याचा अनुभव होता. कारण २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळताना तिने रक्तस्त्रावाचा सामना केला होता. त्यामुळे स्कीवरच्या मते अंडरशॉर्ट्स गरजेच्या आहेत. त्याचबरोबर तिने सांगितले की त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना रक्तस्त्राव कमी होण्यासाठी काही औषधे दिली होती.
अनेकदा मासिक पाळीबद्दल बोलणे खेळांमध्ये निषिद्ध मानले जाते. पण इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूंना आरोग्याच्या बाबत दृष्टीकोन बदलावा असे वाटत आहे. त्यांनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डासह एक महिला आरोग्य समूह स्थापित करण्यासाठी मदतही केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“तू कोच आहेस, तेवढेच काम कर”, पाँटिंगवर बरसला भारतीय दिग्गज
वुमेन्स बीबीएलमध्ये भारतीय महिलांचा बोलबाला; दोन दिवसात सात खेळाडू करारबद्ध






