---Advertisement---

इंग्लंड दौऱ्यातील सराव सामन्यात दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरला भारतीय संघ, ‘हे’ आहे कारण

---Advertisement---

भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या संघाला ४ ऑगस्टपासून यजमान इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा २० ते २२ जुलैदरम्यान काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना डरहॅम येथे होत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दंडाला काळी पट्टी बांधली होती.

म्हणून भारतीय खेळाडूंनी बांधली काळी पट्टी
भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे १३ जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून भारतीय खेळाडू सराव सामन्यादरम्यान दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले.

यशपाल शर्मा यांनी १९८३ च्या विश्वचषक विजयात दिले महत्त्वाचे योगदान
भारतीय संघाने १९८३ साली विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले होते. हे विजेतेपद मिळवण्यात भारतीय संघासाठी यशपाल शर्मा यांनीही महत्त्वाचे योगदान दिले होते. या विश्वचषकातील वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्यांनी ८९ धावांची खेळी केली होते. तसेच उपांत्य फेरीतील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही ६१ धावांचे योगदान दिले होते.

सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेले रवी शास्त्री हे यशपाल शर्मा यांच्यासह अनेक सामने खेळले आहेत. तसेच १९८३ च्या विश्वचषकात शास्त्री आणि यशपाल शर्मा संघसहकारी होते.

यशपाल शर्मा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द –
यशपाल शर्मा यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत ३७ कसोटी सामने खेळले होते. ज्यामध्ये त्यांनी ३३.५ च्या सरासरीने १६०६ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्यांनी २ शतकं आणि ९ अर्धशतकं झळकावली. तसेच ४२ वनडे सामन्यात त्यांनी २८.५ च्या सरासरीने त्यांनी ८८३ धावा केल्या होत्या. यामधे ४ अर्धशतकांचा समावेश होता.

खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर यशपाल यांनी डिसेंबर २००५ पर्यंत राष्ट्रीय निवडकर्ता म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर पुन्हा २००८ मध्ये त्यांची निवड समीतीत नियुक्ती झाली होती. (Team India are sporting black armbands to mourn the sad demise of former India cricketer Yashpal Sharma)

सराव सामन्यात भारतीय संघाची प्रथम फलंदाजी
मंगळवारपासून (२० जुलै) काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध सुरु झालेल्या सराव सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारताच्या ११ जणांच्या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. भारताच्या ११ जणांच्या संघात नियमित कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा सहभाग नाही. तसेच रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांच्या अनुपस्थितीत केएल राहुल यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे.

काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्धच्या सराव सामन्यासाठी भारताचा ११ जणांचा संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

महत्त्वाच्या बातम्या – 

अटक केलीय राज कुंद्राला, सोशल मीडियावर ट्रोल होतोय अजिंक्य रहाणे, पाहा काय आहे नक्की प्रकरण

तब्बल १४४ किमी दर ताशी वेगाच्या चेंडूवर बटलरचा खणखणीत षटकार, पाहा Video

भारीच! केवळ पस्तीस मिनीटांत एक टीम इंडिया टाॅस हारली, तर दुसरी जिंकली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---