भारतीय क्रिकेट संघाचा २९ वर्षीय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. रणजी ट्रॉफी २०१९-२० आणि आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करुनही त्याच्यावर दुर्लक्ष केले जात आहे. त्याच्यामागून मोहम्मद सिराज, टी नटराजन अशा युवा वेगवान गोलंदाजांना पदार्पणाची संधी देण्यात आली. परंतु लक्षणीय प्रदर्शनानंतरही पुनरागमनाच्या प्रतिक्षेत असलेल्या उनाडकटची निवड न करण्यात आल्याने त्याने नाराजी व्यक्त केली होती. आता भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू कारसन घावरी यांनी उनाडकटबद्दल खळबळजनक दावा केला आहे.
शानदार प्रदर्शन आणि कामगिरीतील सातत्यानंतरही उनाडकटला पुन्हा भारतीय संघात जागा मिळणार नसल्याचे घावरी यांनी सांगितले आहे. ते टाइम्स ऑफ इंडियाशी बोलत होते.
सौराष्ट्र संघाचे माजी प्रशिक्षक राहिलेल्या घावरी यांनी म्हटले की, “मी रणजी ट्रॉफी २०१९-२० अंतिम सामन्यादरम्यान संघ निवडकर्त्यांना अप्रत्यक्षपणे एक प्रश्न विचारला होता. जर एखादा वेगवान गोलंदाज १० सामन्यात ६० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेत असेल आणि आपल्या संघाला रणजी ट्रॉफी अंतिम फेरीत पोहोचवत असेल, तर त्याची भारत अ संघात निवड केली जावी का? यावर निवडकर्त्यांनी उत्तर दिले होते की, भावा, आता उनाडकटची भारतीय संघात निवड होणार नाही. साधे त्याचे नाव ३० खेळाडूंमध्येही गणले जाणे अशक्य आहे. कारण तो आता ३०-३२ वर्षांचा झाला आहे आणि हीच गोष्ट त्याच्याविरोधात उभारली आहे.”
“भारतीय संघ वाढत्या वयाच्या खेळाडूंवर का विश्वास ठेवेल? ते २१-२२ किंवा २३ वर्षांच्या खेळाडूंना निवडतील. जेणेकरुन तो खेळाडू पुढील ८ ते १० वर्षे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करू शकेल. जर आज उनाडकटची निवड केली गेली तर तो पुढे किती वर्षे भारतीय संघाकडून खेळू शकेल?,” असे त्या निवडकर्त्यांनी घावरी यांना म्हटले असल्याचे त्यांनी सांगितले.
उनाडकटने २०१९-२० रणजी ट्रॉफी हंगामात शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले होते. त्याने या पूर्ण हंगामात तब्बल ६७ विकेट्स घेतल्या होत्या. १० सामन्यातील १६ डावात गोलंदाजी करताना त्याने हा पराक्रम केला होता. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका हंगामात कोणत्या वेगवान गोलंदाजाने घेतलेल्या त्या सर्वाधिक विकेट्स ठरल्या होत्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर सौराष्ट्र संघाने रणजी ट्रॉफी जिंकली होती.
परंतु मागील ११ वर्षांपासून भारतीय कसोटी संघात आणि ८ वर्षांपासून वनडे आणि २ वर्षांपासून टी२० संघात पुनरागमन करण्याची त्याची प्रतिक्षा कधीही संपणार नाही असे दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आयपीएल २०२२मध्ये धोनी स्वत:च सीएसकेला म्हणेल, मला जाऊ द्या!’
मिताली राज आणि वडील बनले रिक्षाचालकांचे देवदूत, वर्षभरापासून ‘अशी’ करतायत भरघोस मदत
चिन्नप्पापट्टी ते टीम इंडिया असा प्रवास करणारा ‘टी नटराजन’